wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


प्रेषितांचीं कृत्यें धडा 25
  • 1 मग त्या प्रांतात फेस्त आला. आणि तीन दिवसांनी तो कैसरीयाहून वर यरुशलेमला गेला.
  • 2 मुख्य याजकांनी आणि यहूदी पुढाऱ्यांनी फेस्तच्या पुढे पौलावरील आरोप सादर केले.
  • 3 आणि पौलाला यरुशलेमला पाठवून द्यावे, अशी त्याला विनंति केली. पौलाला वाटेत ठार मारण्याचा ते कट करीत होते.
  • 4 फेस्तने उत्तर दिले, “पौल कैसरीया येथे बंदिवासात आहे आणि मी स्वत: लवकरच कैसरीयाला जाणार आहे.
  • 5 तुमच्यातील काही पुढाऱ्यांनी माझ्याबरोबर तिकडे खाली यावे, आणि जर त्या मनुष्याने काही चूक केली असेल तर त्याच्यावर दोषारोप ठेवावा.”
  • 6 त्यांच्याबरोबर आठ ते दहा दिवस घालविल्यानंतर फेस्त खाली कैसरीयाला परत गेला. दुसऱ्या दिवशी फेस्त न्यायालयात बसला आणि त्याने आपल्यासमोर पौलाला हजर करण्याचा आदेश दिला.
  • 7 जेव्हा पौल तेथे हजर झाला, तेव्हा यरुशलेमहून तेथे आलेले यहूदी लोकही पौलाच्या सभोवती उभे राहिले, त्यांनी त्याच्यावर पुष्कळ गंभीर आरोप ठेवले, परंतु ते आरोप यहूदी लोक सिद्ध करु शकले नाहीत.
  • 8 पौल आपला बचाव करण्यासाठी असे म्हणाला, “मी यहूदी लोकांच्या नियमशास्त्राच्या, मंदिराच्या किंवा कैसराच्या विरुद्ध काही गुन्हा केलेला नाही.”
  • 9 फेस्तला यहूदी लोकांना खूष करायचे होते म्हणून तो पौलाला म्हणाला, “यरुशलेम येथे जाऊन माइयासमोर तुझी चौकशी व्हावी अशी तुझी इच्छा आहे काय?”
  • 10 पौल म्हणाला, “मी आता कैसराच्या न्यायासनासमोर उभा असून त्याच्यासमोर माझा न्यायनिवाडा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. मी यहूदी लोकांचा काहीही अपराध केलेला नाही, हे आपणांस चांगले माहीत आहे.
  • 11 मी जर काही गुन्हा केला असेल तर मला मरणदंड झाला पाहिजे. आणि त्यापासून सुटका व्हावी असा प्रयत्न मी करणार नाही. परंतु जे आरोप हे लोक माझ्यावर करीत आहेत, ते खरे नसतील तर मला कोणी यांच्या हाती देऊ शकणार नाही, मी आपले गाऱ्हाणे कैसरासमोर मांडू इच्छितो.”
  • 12 यावर फेस्तने आपल्या सभेशी सल्लामसलत केली. मग त्याने पौलाला सांगितले, “तू कैसरापुढे आपला न्यायनिवाडा व्हावा अशी इच्छा दाखविली आहे, म्हणून तुला कैसरासमोर पाठविण्यात येईल.”
  • 13 काही दिवसांनंतर फेस्ताचे स्वागत करण्याच्या हेतूने राजा अग्रिप्पाआणि बर्णीकाकैसरीयाला येऊन त्याला भेटले.
  • 14 ती दोघे तेथे बरेच दिवस राहिल्यावर फेस्तने पौलाचे प्रकरण राजाला समजावून सांगितले. तो म्हणाला, “फेलिक्सने तुरुंगात ठेवलेला एक कैदी येथे आहे.
  • 15 जेव्हा मी यरुशलेम येथे होतो, तेव्हा यहूदी लोकांचा मुख्य याजक आणि वडीलजन यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद केली. आणि त्याला दोषी ठरवावे अशी मागणी केली.
  • 16 वादी व प्रतिवादी यांना एकमेकांसमोर आणल्याशिवाय आणि आरोपीला आपला बचाव करण्याची संधि मिळेपर्यंत, त्याला इतरांकडे सोपविण्याची रोमी लोकांची रीत नाही. असे मी यहूदी लोकांना सांगितले.
  • 17 म्हणून ते जेव्हा माझ्याबरोबर येथे आले, तेव्हा मी उशीर न करता दुसऱ्याच दिवशी न्यायासनावर बसलो, आणि त्या मनुष्याला समोर आणण्याची आज्ञा केली.
  • 18 त्याच्यावर आरोप करणारे जेव्हा त्याच्याविरुद्ध बोलण्यास उभे राहिले, तेव्हा माझ्या अपेक्षेप्रमाणे कसल्याही गुन्ह्याबाबत त्यांनी त्याच्यावर आरोप केले नाहीत.
  • 19 उलट आपल्या धर्माविषयी आणि कोणा एका मनुष्याविषयी ज्याचे नाव येशू आहे, त्याच्यावरुन यहूदी लोकांनी त्या माणसाशी वाद केला. येशू हा जरी मेलेला असला, तरी पौलाचा असा दावा आहे की, येशू जिवंत आहे.
  • 20 या प्रश्नाची चौकशी कशी करावी हे मला समजेना. तेव्हा त्या यहूदी मनुष्याविरुद्ध यहूदी लोकांचे जे आरोप आहेत, त्याबाबत त्याला यरुशलेम येथे नेऊन त्याचा न्याय केला जावा अशी त्याची इच्छा आहे काय, असे मी त्याला विचारले.
  • 21 सम्राटाकडून आपल्या न्यायनिवाडा होईपर्यंत आपण कैदेत राहू असे जेव्हा पौल म्हणाला, तेव्हा मी आज्ञा केली की, कैसराकडे पाठविणे शक्य होईपर्यंत त्याला तुरुंगातच ठेवावे.”
  • 22 यावर अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “मला स्वत:ला या मनुष्याचे म्हणणे ऐकावेसे वाटते.” फेस्तने त्याला उत्तर दिले, “उद्या त्याचे म्हणणे तुम्ही ऐकू शकाल.”
  • 23 म्हणून दुसल्या दिवशी अग्रिप्पा आणि बर्णीका मोठ्या थाटामाटात आले, व लष्करी सरदार व शहरातील मुख्य नागरिकांसह दरबारात प्रवेश केला. तेव्हा फेस्तच्या आज्ञेनुसार पौलाला तेथे आणण्यात आले.
  • 24 मग फेस्त म्हणाला, “राजे अग्रिप्पा महाराज आणि आमच्याबरोबर येथे उपस्थित असलेले सर्वजण, या मनुष्याला पाहा! याच्याच विषयी यरुशलेम व कैसरिया येथील सर्व यहूदी लोकांनी माइयाकडे अर्ज दिलेला आहे. याला जिवंत राहू देऊ नये, असा आकांत ते करतात.
  • 25 परंतु याला मरणदंड द्यावा असे याने काहीही केले नाही, असे मला आढळून आले. आणि त्याने स्वत:च आपणांला सम्राटाकडून (कैसराकडून) न्याय मिळावा अशी मागणी केली, म्हणून मी त्याला कैसरासमोर न्यायासाठी पाठविण्याचे ठरविले आहे.
  • 26 परंतु सम्राटाला याच्याविषयी निशिचत असे कळवावे, असे माइयाकडे काही नाही, म्हणून मी याला तुमच्यापुढे आणि विशेषत: राजा अग्रिप्पापुढे आणून उभे केले आहे. ते अशाकरिता की, या चौकशीनंतर मला या मनुष्याविषयी काहीतरी लिहिता यावे.
  • 27 शेवटी एखाद्या कैद्याला कसलाही आरोप न ठेवता कैसराकडे पाठविणे मला योग्य वाटत नाही!”