wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


इब्री लोकांस धडा 11
  • 1 आता विश्वास म्हणजे, आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरंवसा असणे.
  • 2 यासाठीच म्हणजे त्यांच्या विश्वासासाठीच देवाने पूर्वीच्या लोकांना उंचावले होते.
  • 3 विश्वासामुळेच आम्हांला समजते की, या जगाची निर्मिती देवाच्या आज्ञेने झाली. म्हणून जे काही आता दिसते ते जे दिसत नव्हते त्यापासून निर्माण केले गेले.
  • 4 विश्वासामुळेच हाबेलाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला. देवाने हाबेलाची दाने मान्य केल्यामुळे विश्वासाच्याद्वारे तो धार्मिक म्हणून उंचावण्यात आला, आणि जरी तो मेला असला तरी तो आपल्या विश्वासामुळे अजून बोलतो.
  • 5 विश्वासमुळे हनोखाला देवाकडे नेण्यात आले, यासाठी की, त्याला मरणाचा अनुभव आला नाही व तो कोणाला सापडला जाऊ नये म्हणून देवाने त्याला दूर नेले. पण तो वर घेतला जाण्यापूर्वी त्याच्याबद्दल साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीत असे.
  • 6 आणि विश्वासाशिवाय देवाला संतोषविणे अशक्य आहे. कारण जो कोणी देवाकडे येतो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की देव आहे आणि जे त्याला शोधतात त्यांना तो बक्षीस देतो.
  • 7 ज्या गोष्टी अजून पाहिल्या नव्हत्या, अशा गोष्टींच्या बाबतीत नोहाला सावधान करण्यात आले होते तेव्हा त्याने विश्वासाने त्याची दखल घेतली. आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी जहाज बांधले, विश्वासामुळेच त्याने जगाचा धिक्कार केला आणि विश्वासामुळे लाभणाऱ्या धार्मिकतेचा तो वारस बनला.
  • 8 जेव्हा देवाने अब्राहामाला पाचारण केले तेव्हा विश्वासानेच त्याने आज्ञापालन केले. आणि त्याला वतन म्हणून जी जागा मिळणार होती त्या जागेकडे तो गेला. आपण कोठे जात आहोत हे त्याला ठाऊक नसतानादेखील तो बाहेर पडला.
  • 9 विश्वासाने तो वचनदत्त देशात एखाद्या उपऱ्यासारखा राहिला. इसहाक व याकोब यांच्यासारखा तोदेखील तंबूत राहिला. कारण ते दोघेही अब्राहामाला दिलेल्या त्याच वचनाचे वारसदार होते.
  • 10 ज्या नगराला मजबूत पाया आहे व ज्याचा प्रयोजक बांधकाम कारागीर स्वत:देव आहे अशा नगराची ते वाट पाहात होते.
  • 11 आपण दिलेल्या वचनाबाबत देव विश्वासू आहे हे जाणून सारा ही जरी वांझ होती आणि अब्राहामाचे वय लेकरे होण्याच्या अगदी मर्यादेपलीकडे गेले होते, तरी विश्वासाने मुलाला जन्म देण्याची शक्ति त्यांना मिळाली.
  • 12 आणि जवळजवळ मरावयास टेकलेल्या अशा एका अब्राहामापासून आकाशातील ताऱ्यांच्या संख्येएवढी आणि समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या कणांइतकी अगणित संतति जन्मास आली.
  • 13 हे सर्व लोक विश्वासात मरण पावले. देण्यात आलेल्या वचनांचे प्रतिफळ त्यांना प्राप्त झाले नव्हते. परंतु त्यांनी विश्वासाने ते दुरूनच पाहिले व त्याचे स्वागत केले आणि त्यांनी उघडपणे कबूल केले की ते परके आणि प्रवासी आहेत.
  • 14 जे लोक अशा गोष्टी बोलतात ते हेच दर्शवितात की ते त्यांच्या वतनासाठी देश पाहत आहेत.
  • 15 ते जर आपण सोडून आलेल्या देशाबद्दल विचार करीत असते तर त्यांना त्या देशात परत जाण्याची संधी मिळाली असती
  • 16 परंतु ते लोक त्याहून अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गाच्या वतनाची इच्छा धरुन होते. म्हणून देवाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला लाज वाटली नाही. कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.
  • 17 जेव्हा देवाने अब्राहामाची परीक्षा पाहिली, तेव्हा विश्वासाने आपला पुत्र इसहाक याला अर्पण केले. होय, ज्याला अभिवचने दिली होती, तो आपला एकुलता एक पुत्र अर्पण करण्यास तयार झाला होता.
  • 18 आणि देवाने त्याला सांगितले होते की, “इसहाकाकडूनच तुइया वंशाची वाढ होईल.”
  • 19 अब्राहामाचा असा विश्वास होता की, देव मनुष्याला मरणातून पुन्हा उठवू शकतो आणि अलंकारिक भाषेत बोलायचे झाले तर इसहाक त्याला जसा काय मरणातून परत मिळाला.
  • 20 इसहाकाने विश्वासाने याकोबाला व एसावाला पुढील काळासाठी आशीर्वाद दिले.
  • 21 विश्वासाने याकोब, जेव्हा तो मरत होता, तेव्हा त्याने योसेफाच्या प्रत्येक मुलाला आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीवर तो टेकला असताना त्याने देवाची उपासना केली.
  • 22 आपल्या आयुष्याच्या शेवटी योसेफ विश्वासाने इस्राएल लोक इजिप्त देशाच्या बाहेर जाण्याबाबत बोलला आणि त्याच्या अस्थिसंबंधी काय करायचे याच्या सूचना त्याने दिल्या.
  • 23 जेव्हा मोशे जन्मला तेव्हा विस्वासाने त्याच्या आईवडिलांनी त्याला तीन महिने लपवून ठेवले कारण त्यांनी पाहिले की ते बाळ सुंदर आहे आणि राजाज्ञेची त्यांना भीति वाटली नाही.
  • 24 विश्वासाने मोशेने जेव्हा तो मोठा झाला, तेव्हा फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवून घेण्याचे नाकारले.
  • 25 पापाचे अल्पकाळ टिकणारे सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोवर त्रास सहन करण्याचे त्याने निवडले.
  • 26 इजिप्त देशातील संपत्तीपेक्षा ख्रिस्तासाठी अपमान सहन करणे हे अधिक मौल्यावान आहे, असे त्याने मानले. कारण तो पुढे मिळणाऱ्या बक्षीसाकडे पाहत होता.
  • 27 राजाच्या रागाची भिति व बाळगता, मोशेने इजिप्त देश सोडला. जणू काय न दिसणाऱ्या देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.
  • 28 नाश करणाऱ्याने (देवदूताने) इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या मुलांपैकी एकालाही हात लावू नये म्हणून त्याने विश्वासाने वल्हांडण सण पाळला आणि रक्त शिंपडले.
  • 29 विश्वासाने त्यांनी जणू काय कोरड्या जमिनीवरुन चालावे, तसा तांबडा समुद्र पार केला. पण जेव्हा इजिप्तच्या लोकांनी तसे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते बुडाले.
  • 30 लोकांनी विश्वासाने सात दिवस फेऱ्या मारल्यावर यरीहोची भिंत पडली.
  • 31 राहाब वेश्येच्या विश्वासामुळेच ज्या लोकांनी आज्ञा मोडली त्यांच्याबरोबर ती मारली गेली नाही कारण तिने हेरांचे शांतीने स्वागत केले.
  • 32 मी आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आदि संदेष्टे यांच्याबाबत सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही.
  • 33 लोकांनी विश्वासाने राज्ये जिंकली, न्याय स्थापित केला, आणि त्यांना देवाची अभिवचने मिळाली, त्यांनी सिंहांची तोडे बंद केली.
  • 34 त्यांनी अग्निचे सामर्थ्य नष्ट केले. तरवारीने मरण्यापासून बचावले. अशक्तपणात त्यांनी सामर्थ्य मिळविले. ते लढाईत सामर्थ्यशाली ठरले. आणि त्यांनी परकी सेना मागे हटविली.
  • 35 स्त्रियांना त्यांचे मरण पावलेले पुन्ही जिवंत असे मिळाले, इतरांना वेदना सोसाव्या लागल्या कारण त्यांनी अधिक चांगले पुनरुत्थान मिळावे म्हणून सुटका करून घेण्यास नकार दिला.
  • 36 काहींना निंदा व चाबकाचा मार सहन करावा लागला. तर काहींना बेड्या व तुरूगंवास भोगावे लागले.
  • 37 त्यांना दगडमार झाला. करवतीने त्यांना चिरण्यात आले, त्यांना तरवारीने मारण्यात आले. ते मेंढ्यांचे व बकऱ्यांचे कातडे पांघरून फिरत राहिले. ते निराधार झाले. त्यांना अती दबावाखाली भारी पीडा देण्यात आल्या.
  • 38 त्यांच्यासाठी जग योग्य नव्हते, ते जंगलात, डोंगरकपारीत, गुहांमधून व जमिनीतील बिळांतून लपून फिरत राहिले.
  • 39 या लोकांना त्यांचा विश्वासाविषयी चांगले बोलण्यात आले पण देवाने त्यांना जे अभिवचन दिले होते ते त्यांना मिळाले नाही.
  • 40 देवाने आमच्यासाठी काहीतरी अधिक चांगली योजना तयार केली होती यासाठी की आमच्याबरोबर त्यांनाही परिपूर्ण करावे.