wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


याकोब धडा 5
  • 1 श्रीमंत लोकहो ऐका! तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा.
  • 2 तुमची संपति नाश पावली आहे. व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहेत.
  • 3 तुमच्या सोन्याचांदीवर गंज चढला आहे. त्याच्यावर चढलेला गंज तुमच्याविरुद्ध साक्ष देईल आणि तुमचे शरीर अग्नीसारखे खाऊन टाकील. अशा युगामध्ये तुम्ही तुमचे धन साठवून वेगळे ठेवले आहे, ज्याचा शेवट जवळ आला आहे!
  • 4 पहा! तुमच्या शेतात कापणी करणाऱ्या मजुरांची मजुरी जी तुम्ही अडवून धरलीत ती ओरडून दु:ख करीत आहे आणि कापणी करणाऱ्यांचे रडणे प्रभु परमेश्वारच्या सैन्याच्या कानी पोहोंचले आहे.
  • 5 जगात असताना तुम्ही ऐषरामात जगला आणि मन मानेल तसे वागला. वधावयाच्या दिवासासाठी खाऊनपिऊन तयार केलेल्या पशूसारखे तुम्ही पुष्ट झालात.
  • 6 जे लोक तुम्हांला काहीही विरोध करीत नाही अशा निरपराध लोकांना तुम्ही दोषी ठरविले आहे आणि त्यांची हत्या केली आहे.
  • 7 यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो.
  • 8 तुम्हीसुद्धा धीराने वाट पाहिली पाहिजे. धैर्य धरा, कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे.
  • 9 बंधूंनो, एकमेकांविरुद्ध कुरकुर करण्याचे थांबवा, यासाठी की तुम्ही दोषी ठरू नये. पहा! न्यायाधीश दाराजवळ आत येण्यासाठी तयारीत उभा आहे.
  • 10 बंधूंनो, दु:ख सहन करीत देवाच्या नावाने लोकांशी धीर धरून बोलणाऱ्या संदेष्ट्याचे उदाहरण तुम्ही आपल्यासमोर ठेवा.
  • 11 त्यांनी दु:ख सहन केले म्हणून आपण त्यांना धन्य समजतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि तुम्हांला माहीत आहे की, प्रभूने ईयोबाच्या वतीने त्याचा शेवट कसा केला. प्रभु दयाळू आणि खूप कनवाळू आहे, ह्या गोष्टीचे त्याने प्रात्यक्षिक दाखविले.
  • 12 याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे बंधूंनो, स्वर्गाच्या किंवा पृथ्वीच्या नावाने शपथ वाहायचे थांबवा किंवा इतर कोणत्याही प्रकारची शपथ वाहू नका. तुमचे “होय” हे “होयच” असू द्या. तुमचे “नाही” हे “नाहीच” असू द्या, यासाठी की तुम्ही देवाच्या परीक्षेत येऊ नये.
  • 13 तुमच्यातील कोणी संकटात आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्याने स्तुतिगान करावे.
  • 14 तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडिलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे, आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे
  • 15 विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्याला बरे करील व प्रभु त्याला उठविल. जर त्याने पापे केली असतील तर प्रभु त्याची क्षमा करील.
  • 16 म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.
  • 17 एलीया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतरची सोडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही.
  • 18 मग त्याने पुन्हा प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजविले.
  • 19 माझ्या बंधूंनो, जर तुमच्यापैकी कोणी चुकला किंवा सत्यापासून दूर भटकला असेल आणि जर कोणी त्याला परत आणले तर पापी मनुष्याला चुकीच्या मार्गावरून तो परत आणतो.
  • 20 तो त्याचा जीव मरणाच्या दाढेतून सोडवितो. आणि त्याच्या पुष्कळ पापांची क्षमा होते.