wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


मार्क धडा 7
  • 1 काही परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक जे यरूशलेमेहून आले होते ते येशूभोवती जमले.
  • 2 आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध (म्हणजे हात न धुता) हातांनी जेवताना पाहिले.
  • 3 (कारण परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांच्या रुढी पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत.)
  • 4 बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालारीति ते पाळतात आणि प्याले, घागरी, तांब्याची भांडी धुणे अशा दुसऱ्या इतर रुढीही पाळतात.
  • 5 मग परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूला विचारले, “तुझे शिष्य वाडवडिलांच्या रुढी का पाळत नाहीत? हात न धुता का जेवतात?”
  • 6 येशू त्यांना म्हणाला, “यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो,‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्याची अंत:करणे माझ्यापासून दूर आहेत,
  • 7 ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते लोकांना शास्त्र म्हणून जे शिकवितात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’ यशया 29:13
  • 8 तुम्ही देवाच्या आज्ञा पाळत नाही, तर आता तुम्ही मनुष्याची शिकवण पाळता आहात.”
  • 9 आणखी’तो त्यांना म्हणाला, “आपल्या स्वत:च्या रूढी प्रस्थापित करण्यासाठी देवाच्या आज्ञा दूर करण्यात तुम्ही पटाईत आहात.
  • 10 मोशे म्हणाला, “तू आपल्या आईवडिलांचा सन्मान कर.”जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्याला ठार मारलेच पाहिजे.
  • 11 परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या आईला व वडिलांना असे म्हणू शकतो की, तुम्हांला मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडेफार आहे. परंतु तुम्हाला मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही. मी ते देवाला देईन.’
  • 12 तुम्ही त्याला त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी कही करू देत नाही.
  • 13 तुम्ही अशा रूढी पाळण्याचे शिकवून रुढींनी देवाचे वचन रद्द करता आणि तुम्ही अशा प्रकारच्या अनेक गोष्टी करता.
  • 14 येशूने लोकांना आपल्याकडे पुन्हा बोलावून म्हटले, “प्रत्येकाने माझे ऐका व हे समजून घ्या.
  • 15 बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्याला अपवित्र करील असे काही नाही. ज्या कुणाला ऐकायला कान आहेत तो ऐको.”
  • 16
  • 17 लोकसमुदायाला सोडून येशू घरात गेला तेव्हा शिष्यांनी त्याला या दाखल्याविषयी विचारले,
  • 18 तो त्यांना म्हणाला, “तुम्हांलादेखील हे समजत नाही काय?” जे बाहेरून मनुष्याच्या आत जाते ते त्याला अपवित्र करीत नाही हे तुम्हांला समजत नाही का?
  • 19 कारण ते त्याच्या अंत:करणात जात नाही तर त्याच्या पोटात जाते. नंतर ते शरीराबाहेर जाते. असे सांगून सर्व अन्न त्याने शुद्ध घोषित केले.
  • 20 आणखी तो म्हणाला, “जे माणसाच्या आतून बाहेर पडते ते माणसाला अपवित्र करते. कारण आतून म्हणजे अंत:करणातून वाईट विचार बाहेर पडतात.
  • 21 जारकर्म, चोरी, खून,
  • 22 व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा,
  • 23 या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि माणसाला अपवित्र करतात.”
  • 24 येशू त्या ठिकाणाहून निघाला आणि सोर प्रांताच्या आसपासच्या प्रदेशात गेला. तो एका घरात गेला व हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती. परंतु तो त्याची उपस्थिती लपवू शकला नाही. एका स्त्रीने ऐकले की येशू तेथे आहे. तिच्या मुलीला अशुद्ध आत्मा लागलेला होता.
  • 25 ती स्त्री आली व येशूच्या पाया पडली.
  • 26 ती स्त्री ग्रीक होती व सिरीयातील फिनीशिया येथे जन्मली होती. तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली.
  • 27 येशू तिला म्हणाला, “प्रथम मुलांना तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणे योग्य नव्हे.
  • 28 परंतु ती त्याला म्हणाली, “प्रभु, कुत्रीसुद्धा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.”
  • 29 येशू त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या या उत्तरामुळे तू शांतीने घरी जा. तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.”
  • 30 मग ती घरी आली तिची मुलगी अंथरुणावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे. असे तिने पाहिले.
  • 31 येशू सोर भोवतलच्या प्रदेशातून परतला आणि सिदोनाहून दकापलिसच्या वाटेने गालील समुद्राकडे आला.
  • 32 तेथे काही लोकांनी एका बहिऱ्या तोतऱ्या मनुष्याला येशूकडे आणले व आपण त्याच्यावर हात ठेवा अशी विनंति केली.
  • 33 येशूने त्याला लोेकांपासून एका बाजूस घेऊन त्याच्या कानात आपली बोटे घातली. नंतर तो थुंकला आणि त्या माणसाच्या जिभेला स्पर्श केला.
  • 34 त्याने स्वर्गाकडे पाहून मोठा उसासा टाकला व म्हणाला, “एफ्फात्था” म्हणजे मोकळा हो.
  • 35 आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले. त्याला बोलता येऊ लागले. त्याने कोणाला सांगू नका अशी आज्ञा केली.
  • 36 येशू नेहमी अशा गोष्टी न सांगण्याविषयी लोकांना सूचना देऊ लागला, (पण लोक त्याविषयी अधिकाअधिक सांगत गेले.)
  • 37 ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्व काही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.”