wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


मत्तय धडा 5
  • 1 येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले. म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला, मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.
  • 2 आणि त्याने त्यांना शिकविण्यास सरुवात केली. तो म्हणाला,
  • 3 “जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
  • 4 जे शोक करतात ते धन्य, कारण त्याचे सांत्वन करण्यात येईल.
  • 5 जे नम्र ते धन्य, कारण त्यांना वचनदत्त भूमीचे वतन मिळेल.
  • 6 ज्यांना नीतीने वागण्याची तहान व भूक लागली आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील.
  • 7 जे दयाळू ते धन्य, कारण त्यांचावर दया करण्यत येईल.
  • 8 जे अंत:करणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील.
  • 9 जे शांति करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल.
  • 10 नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
  • 11 “जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात.
  • 12 आनंद करा आणि उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण जे संदेष्टे तुमच्यापूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.(मार्क 9:50; लूक 14:34-35)
  • 13 “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा खारट बनवता येणार नाही व ते निरूपयोगी बनेल. ते फेकून देण्याच्या लायकीचे बनेल. माणसे ते पायदळी तुडवतील.
  • 14 “तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपत नाही.
  • 15 आणि दिवा लावून तो कोणी भांड्याखाली लपवून ठेवीत नाही. उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो.
  • 16 “तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा इतरांच्यासाठी प्रकाश असले पाहिजे. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.
  • 17 “मी नियमशास्त्र किंवा संदेष्ट्याचे लिखाण रद्द करायला आलो आहे असे समजू नका. मी ते रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला आलो आहे.
  • 18 मी तुम्हांला सत्य तेच सांगतो की, आकाश आणि पृथ्वीचा शेवट होईपर्यंत नियमशात्रातील एका शब्दात देखील फरक होणार नाही.
  • 19 म्हणून प्रत्येक व्यक्तीने लहानातील लहानाने सुद्धा आज्ञा पाळावी व जर त्याने पाळली नाही व इतरांनाही तसे करण्यास शिकविले नाही तर तो स्वर्गाच्या राज्यात लहान गणला जाईल, पण जो आज्ञा पाळील व इतरांना तसे करण्यास शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठे गणले जाईल.
  • 20 कारण मी तुम्हांस सांगतो की परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या नीतिमत्त्वापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक चांगले असल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही.
  • 21 “तुम्ही ऐकले असले की, फार पूर्वी आपल्या लोकांना असे सांगण्यात आले होते की, ‘खून करू नका व जो कोणी खून करतो तो न्यायदंडास पात्र ठरेल.’
  • 22 पण मी तुम्हांस सागतो की, जर एखादा आपल्या भावावर रागावला असेल तर तो न्यायदंडास पात्र ठरेल. पुन्हा जो आपल्या भावाला, अरे वेड्या, असे म्हणेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र ठरेल. आणि जो त्याला मूर्ख म्हणेल तो नरकातील अग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल.
  • 23 “म्हणून तू आपले दान अर्पण करण्यासाठी वेदीजवळ आणले असता जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे असे तुला तेथे आठवले,
  • 24 तर देवाला देण्यासाठी आणलेले दान तेथेच वेदीपुढे ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे.
  • 25 वाटेत तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी लगेच सलोखा कर नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाकडे नेईल व न्यायाधीश अधिकाऱ्याकडे नेईल आणि अधिकारी तुला तरुंगात टाकील.
  • 26 मी तुला खरे सांगतो तू शेवटचा पैसा देईपर्यंत तुझी सुटका मुळीच होणार नाही.
  • 27 “व्यभिचार करू नको’असे पूर्वी सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे,
  • 28 परंतु मी तुम्हांस सांगतो की, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.
  • 29 जर तुझा उजवा डोळा तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो काढून टाक व फेकून दे, संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एखादा अवयव गमावलेला बरा.
  • 30 जर तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करतो, तर तो तोडून फेकून दे, कारण संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक अवयव गमावलेला बरा.
  • 31 “‘जर एखादा मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तर त्याने तिला घटस्फोटाची लेखी सूचना द्यावी.’असे सांगितल्याचे तुम्ही जाणता.
  • 32 पण मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय इतर कारणामुळे टाकून देतो, तो तिला व्यभिचार करण्यास प्रवृत्त करतो आणि जो कोणी अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह करतो तो व्यभिचार करतो.शपथ घेण्याविषयी येशूची शिकवन
  • 33 “जेव्हा तू शपथ घेतोस तेव्हा ती तोडू नको. जी शपथ देवाला वाहिली आहे ती खरी कर,असे सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे.
  • 34 परंतु मी तुम्हाला सांगतो की, शपथ वाहूच नका, आकाशाची शपथ वाहू नका कारण ते देवाचे आसन आहे.
  • 35 पृथ्वीचीही शपथ वाहू नका कारण ती त्याच्या पायाचे आसन आहे; आणि यरूशलेमाचीही शपथ वाहू नका, कारण त्या नगरीचा राजा देव आहे.
  • 36 आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण त्याचा एखादा केसही पांढरा किंवा काळा होणे तुमच्या हाती नाही.
  • 37 म्हणून तुमचे बोलणे ‘होय’ तर होय किंवा ‘नाही’ एवढेच असावे. त्यापेक्षा जास्त जर असेल तर ते सैतानापासून आहे.
  • 38 “तुम्ही ऐकले आहे की असे सांगितले होते, ‘डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात.’
  • 39 पण मी तुम्हांला सांगतो, जो दुष्ट आहे त्याला अडवू नका, जर कोणी तुमच्या उजव्या गालावर तुम्हांला मारील त्याच्यासमोर दुसराही गाल पुढे करा.
  • 40 आणि जो कोणी फिर्याद करून तुमचा अंगरखा घेऊ पाहतो त्याला तुमचा झगाही द्या.
  • 41 जर कोणी तुम्हांला सक्तीने त्याच्याबरोबर कांही अंतर घेऊन जाऊ इच्छितो तर त्याच्याबरोबर त्याच्या दुप्पट अंतर जा.
  • 42 जो तुमच्याजवळ मागतो त्याला द्या आणि जो तुमच्याकडून उसने घेऊ इच्छितो त्याला नकार देऊ नका.
  • 43 “असे सांगिलते होते की, ‘आपल्या शोजाऱ्यावर प्रेम करा अणि आपल्या शत्रूचा द्वेष करा,असे तुम्ही ऐकले आहे.
  • 44 पण मी तुम्हांला सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रेम करा. तुमचे जे वाईट करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
  • 45 जर तुम्ही असे कराल, तर तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे खरे पुत्र व्हाल. तुमचा पिता चांगल्यावर आणि वाईटावर अशा दोघांवरही सूर्य उगवितो. चांगल्यावरही आणि वाईटावरही पाऊस पाडतो.
  • 46 कारण जे तुमच्यावर प्रीति करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीति करीत असाल तर तुम्हांला प्रतिफळ मिळणार नाही. जकातदारही असेच करतात.
  • 47 आणि जर तुम्ही तुमच्या मित्रांशी चांगले वागत असाल तर तुम्ही इतरांपेक्षा फार चांगले आहात असे समजू नका. देवाला न मानणारे लोकही असेच करतात.
  • 48 म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा.