wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


मत्तय धडा 7
  • 1 “तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही इतरांचा न्याय करु नका.
  • 2 कारण ज्या न्यायाने तुम्ही इतरांचा न्याय करता त्याचा न्यायाने तुमचा न्याय केला जाईल, आणि ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुम्हांला परत माप घालतील.
  • 3 तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस?
  • 4 किंवा ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तुझ्या भावाला कसे म्हणू शकतोस? कारण पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे.
  • 5 अरे ढोंग्या, पहिल्यांदा तू आपल्या डोळ्यातील मुसळ काढ म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढायला तुला स्पष्ट दिसेल.
  • 6 “जे पवित्र ते कुत्र्यांना टाकू नका, ती उलटून तुम्हांला फाडतील आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर ती त्यांना पायदळी तुडवतील.
  • 7 “मागा म्हणजे तुम्हांला ते देण्यात येईल. शोधा आणि तुम्हांला ते सापडेल, ठोका आणि तुमच्यासाठी दार उघडले जाईल,
  • 8 कारण प्रत्येकजण जो मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, आणि जो ठोकावतो, त्याच्यासाठी दार उघडले जाते.
  • 9 “तुमच्यापैकी असा कोण मनुष्य आहे की, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला दगड देईल?
  • 10 किंवा मासा मागितला, तर त्याला साप देईल?
  • 11 वाईट असूनही जर तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील?
  • 12 “यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्या असे तुम्हांला वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा. कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टेयांच्या शिकवणीचे सार हेच आहे.(लूक 13:24)
  • 13 “अरूंद दरवाजाने आत जा. कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद आहे, व मार्ग पसरट आहे. आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत.
  • 14 पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरूंद व मार्ग अडचणीचा आहे, आणि फारच थोडयांना तो सापडतो.
  • 15 “खोट्या संदेष्ट्याविषयी सावध असा. ते गरीब मेंढराचे रूप घेऊन तुमच्याकडे येतात. पण प्रत्यक्षात ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत.
  • 16 त्यांच्या करणीवरून तुम्ही त्यास ओळखाल. ज्याप्रमाणे काटेरी झाडाला द्राक्षे लागत नाहीत, किंवा रिंगणीच्या झाडाला अंजिरे येत नाहीत, त्याचप्रमाणे वाइटाला चांगले फळ येत नाही.
  • 17 प्रत्येक चांगले झाड चांगली फळे देते, पण वाईट झाड वाईट फळे देते.
  • 18 चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत, आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत.
  • 19 जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते.
  • 20 म्हणून अशा धोकेबाज लोकांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल.
  • 21 जो कोणी मला वरवर ‘प्रभु, प्रभु’ म्हणतो, तो प्रत्येक जण स्वर्गच्या राज्यात जाईलच असे नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागेल तोच स्वर्गाच्या राज्यात जाईल.
  • 22 त्या दिवशी मला अनेक जण म्हणतील, ‘हे प्रभु, आम्ही तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले.
  • 23 तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हांला ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.
  • 24 “जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या माणसासारखा आहे, अशा सुज्ञ माणसाने आपले घर खडकावर बांधले.
  • 25 मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही. कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता.
  • 26 जो कोणी माझे हे शब्द ऐकूनत्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणा एका मूर्ख माणासासारखा आहे, त्याने आपले घर वाळूवर बांधले.
  • 27 मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”
  • 28 जेव्हा ह्या बोधकथा सांगण्याचे येशूने संपविले तेव्हा लोकांचा समुदाय त्याच्या शिकवण्याने थक्क झाला.
  • 29 कारण येशू त्यांना त्यांच्या धर्मशिक्षकांप्रमाणे नव्हे, तर अधिकारवाणीने शिकवीत होता.