wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 इतिहास धडा 5
  • 1 रऊबेन इस्राएलाचा थोरला मुलगा होता. तेव्हा थोरल्या मुलाला मिळणारे सगळे विशेषाधिकार त्याला मिळायला हवे होते. पण रऊबेनने आपल्या वडीलांच्या पत्नीशीच शरीरसंबंध ठेवले त्यामुळे हे अधिकार योसेफच्या मुलांना दिले गेले. या घराण्याच्या वंशावळीच्या नोंदीत रऊबेनची थोरला मुलगा म्हणून नोंद नाही. यहूदा आपल्या भावंडांपेक्षा पराक्रमी निघाला म्हणून पुढारीपण त्याच्या घराण्यात गेले. मोठ्या मुलाला मिळायचे ते इतर सर्व अधिकार मात्र योसेफाच्या घराण्याला मिळाले. हनोख, पल्लू, हस्रोन आणि कर्मी हे रऊबेनचे मुलगे.
  • 2
  • 3
  • 4 योएलचे वंशज असे: योएलचा मुलगा शमाया. शमायाचा मुलगा गोग. गोगचा शिमी.
  • 5 शिमीचा मुलगा मीखा. मीखाचा मुलगा राया. रायाचा मुलगा बाल.
  • 6 बालचा मुलगा बैरा. अश्शूरचा राजा तिल्गथ-पिल्नेसर याने बैराला आपल्या घरातून पिटाळून लावले. आणि कैद केले. बैरा हा रऊबेनी घराण्याचा अधिकारी पुरुष होता.
  • 7 योएलचे भाऊ आणि त्यांची त्यांची घराणी यांची नोंद वंशावळींच्या नोंदीवरुनच येथे केली आहे: ईयेल सर्वांत मोठा, मग जखऱ्या
  • 8 आणि बेला. बेला हा आजाजचा मुलगा. आजाज हा शमाचा मुलगा. शमा योएलचा मुलगा. नबो आणि बाल मौन येथपर्यंत ते अरोएर प्रांतात राहत होते.
  • 9 फरात नदीच्या जवळ अगदी पूर्वेला वाळवंटाच्या कडेपर्यंत बेलाच्या लोकांची वस्ती होती. गिलाद प्रांतात आपली गाई-गुरे फार झाल्यामुळे त्यांना या बाजूला सरकावे लागले.
  • 10 शौलच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हग्री लोकांशी लढाई करुन त्यांचा पाडाव केला. त्यांच्याच तंबूत बेलाच्या लोकांनी मुक्काम केला. तेथे राहून त्यांनी गिलादच्या पर्वेकडील सर्व प्रदेश पालथा घातला.
  • 11 रऊबेनी लोकांच्या शेजारीच गाद घराण्यातील लोकांची वस्ती होती. बाशान प्रांतात सलका नगरापर्यंत गाद घराण्यातील लोक राहत होते.
  • 12 योएल हा बाशान मधला पहिला नायक. शाफाम दुसरा. मग यानयने त्याची जागा घेतली.
  • 13 मीखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया आणि एबर हे त्यांच्या घराण्यातील सात भाऊ.
  • 14 हे अबीहईलचे वंशज. अबीहईल हूरीचा मुलगा. हूरी यारोहाचा मुलगा आणि यारोहा गिलादचा. गिलाद मीखाएलचा. मीखाएल यशीशायाचा मुलगा. यशीशाया यहदोचा मुलगा. यहदो बूजाचा मुलगा.
  • 15 अही हा अब्दीएलचा मुलगा. अब्दीएल गूनीचा मुलगा. अही हा त्या घराण्याचा प्रमुख.
  • 16 गाद घराण्यातील लोक गिलाद प्रांतात राहत होते. बाशान, बाशानच्या आसपासची खेडी, शारोनच्या आसपासची शिवारे एवढ्या भागात थेट सीमेपर्यंत राहत होते.
  • 17 योथाम आणि यराबाम यांच्या काळात या लोकांच्या नावांच्या नोंदी गाद वंशावळीमध्ये केल्या गेलेल्या आहेत. योथाम यहूदाचा आणि यराबाम इस्राएलचा राजा होता.
  • 18 मनश्शेच्या वंशातील अर्धे लोक आणि रऊबेनी व गादी लोकांमधून 44,760 शूर सैनिक युध्दाला सज्ज असे होते. लढाईमध्ये ते प्रवीण होते. ढाली, तलवारी ते बाळगून होते. एवढेच नव्हे तर धनुष्य-बाण चालवणेही त्यांना अवगत होते.
  • 19 हगरी, यतूर, नाफीश, नोदाब या लोकांशी त्यानी लढाया केल्या.
  • 20 मनश्शे, रऊबेन आणि गाद वंशातील लोक लढाईच्या वेळी देवाची प्रार्थना करीत. देवावर भरवंसा असल्यामुळे ते मदतीची याचना करीत. देव त्यांना साहाय्य करी. त्यामुळे त्यांना हग्री लोकांचा पराभव करता आला. या लोकांबरोबरच्या इत्तर लोकांचाही त्यांनी पाडाव केला.
  • 21 50,000 उंट, 2,50,000 शेळ्यामेंढ्या, 2,000 गाढवे आणि 1,00,000 माणसे एवढे त्यांनी हग्री लोकांकडून बळकावले.
  • 22 बरेच हग्री लोक मारले गेले कारण देवाने रऊबेनींना लढाई जिंकायला मदत केली. यानंतर मनश्शे, रऊबेन आणि गाद लोक हग्री लोकांच्या भूप्रदेशात राहू लागले. बाबिलोन लोकांनी इस्राएलांवर विजय मिळवून त्यांना कैद करुन नेईपर्यंत हे लोक तिथेच राहिले.
  • 23 बाशानपासून बाल-हर्मेान, सनीर आणि हर्मेान डोंगर येथपर्यंत मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी वस्ती केली. तेथे त्यांची संख्या बरीच वाढली.
  • 24 मनश्शेच्या अर्ध्या (वंशातील घराण्याचे) प्रमुख पुढीलप्रमाणे: एफेर, इशी, अलीएल, अज्रीएल, यिर्मया, होदव्या, यहदीएल, हे सर्व शूर, वीर आणि नामांकित होते. आपापल्या घराण्यांचे ते प्रमुख होते.
  • 25 पण आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या देवाशी त्यांनी गैरवर्तन केले. देवाने ज्यांना नेस्तनाबूत केले होते त्या लोकांच्याच खोट्या देवतांची त्यांनी उपासना केली.
  • 26 इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल याच्या मनात लढाईवर जाण्याची इच्छा जागवली. पूल म्हणजेच तिल्गथ -पिल्नेसर. त्याने मनश्शे, रऊबेन आणि गाद घराण्यातील लोकांशी लढाई केली. त्यांना त्याने ते होते तिथून हुसकावून लावले आणि कैदी केले. पूलने मग त्यांना हलह, हाबोर, हारा आणि गोजान नदीजवळ आणले. तेव्हा पासून आजतागायत इस्राएलाच्या त्या घराण्यांतील लोक तेथे राहत आहेत.