wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 इतिहास धडा 19
  • 1 नाहाश हा अम्मोन्याचा राजा होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा गादीवर आला.
  • 2 तेव्हा दावीदाने विचार केला, “नाहाशचे माझ्याशी सलोख्याचे संबंध होते. म्हणून त्याचा मुलगा हानून याच्याशी मी प्रेमाचे संबंध ठेवीन.” असे म्हणून दावीदाने हानूनच्या सांत्वनासाठी आपले दूत पाठवले. दावीदाचे हे सेवक अम्मोनला हानूनकडे घेऊन गेले.
  • 3 तेव्हा अम्मोन्यांचे सरदार हानूनला म्हणाले, “या देखाव्याने फसू नकोस. तुझे सांत्वन करणे किंवा तुझ्या मृत वडीलांचा मान ठेवणे हा दावीदाचा हेतू नाही. दावीदाने या लोकांना तुझा प्रदेश पाहून ठेवायला आणि हेरगिरी करायला पाठवले आहे. त्याला तुझा प्रांत उद्ध्वस्त करायचा आहे.”
  • 4 हे ऐकून हानून ने दावीदाच्या दूतांना अटक केली आणि त्यांचे मुंडन केले.त्यांची कमरेपर्यंतची वस्त्रेही फाडली आणि त्यांना वाटेला लावले.
  • 5 दावीदाचे सेवक या गोष्टींमुळे इतके शरमिंदे झाले की त्यांच्याने घरी जाववेना. लोकांकडून दावीदाला ही बातमी समजली तेव्हा दावीदाने त्यांच्यासाठी पुढीलप्रमाणे निरोप पाठवला: “दाढी वाढेपर्यंत तुम्ही यरीही येथे रहा मग इकडे या.”
  • 6 आणि दावीदाचे वैर ओढवूत घेतले आहे हे अम्मोनी लोकांच्या लक्षात आले तेव्हा हानून आणि अम्मोनी लोक यांनी मेसोपटेम्या येथून रथ आणि सारथी आणवण्यासाठी 75,000 पौंड चांदी खर्च केली. माका व सोबा या अराममधील नगरांमधूनही त्यांनी रथ आणि स्वार यांची खरेदी केली.
  • 7 अम्मोन्यांनी 32,000 रथ विकत घेतले. माकाच्या राजालाही त्यांनी आपल्या सैन्यासह मदतीला बोलावले व त्याने मोल देऊ केले. तेव्हा त्यांनी येऊन मेदबा नगराजवळ तळ ठोकला. खुद्द अम्हमोनीही नगराबाहेर पडून वेशीजवळ लढायला आले.
  • 8 अम्मोनी लढाईला सज्ज झाले आहेत हे ऐकून दावीदाने यवाबाला इस्राएलच्या सर्व सैन्यासकट युध्दावर पाठवले.
  • 9 अम्मोनी लढायच्या जय्यत तयारीनिशी वेशीजवळ आले. त्यांच्या मदतीला आलेले राजे मैदानात स्वतंत्रपणे उभे होते.
  • 10 सैन्याच्या दोन तुकड्या आपल्याविरुध्द उभ्या ठाकलेल्या असून त्यातली एक आपल्या मागे व एक पुढे आहे हे यवाबने पाहिले. तेव्हा त्याने इस्राएली फौजेतील निवडक लढवय्यांना अरामी सैन्यासमोर नियुक्त केले.
  • 11 उरलेल्या इस्राएली फौजेला अबीशयच्या हाताखाली सोपवले. अबीशय हा यवाबचा भाऊ. हे सैन्य अम्मोन्याशी लढायला गेले.
  • 12 यवाब अबीशयला म्हणाला,’ अरामचे सैन्य जर मला भारी ठरले तर तू माझ्या मदतीला ये. आणि अम्मोनी तुझ्यापेक्षा प्रबळ ठरले तर मी तुला सहाय्य करीन.
  • 13 आपल्या लोकांसाठी आणि देवाच्या या नगरांसाठी लढताना आपण प्रयत्नांची शिकस्त करु, शौर्य गाजवू. मग परमेश्वराला जे योग्य वाटेल ते तो करो.”
  • 14 यवाब आपल्या सैन्यासह अरामी फौजेवर चालून गेला. तेव्हा अरामच्या सैन्याने त्यांच्यापुढून पळ काढला.
  • 15 अरामचे सैन्य माघार घेऊन पळून जात आहे हे पाहताच अम्मोन्यांनीही पलायन केले. अबीशय आणि त्याचे सैन्य यांच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. अम्मोनी आपल्या नगरात परतले आणि यवाब यरुशलेमला परत आला.
  • 16 इस्राएलपुढे आपला पराभव झाला आहे हे अरामी सरदारांनी पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून फरात नदीपलीकडील आपल्या लोकांना बोलवून घेतले. शोफख हा हदरेजरच्या अरामी फौजेचा सेनापती होता. त्याच्या नायकत्वाखाली ते आले.
  • 17 अरामी लढाईची जमवाजमव करत आहेत हे दावीदाने ऐकले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांना एकत्र जमवले आणि यार्देन नदीपलीकडे जाऊन आराम्यांच्या समोर व्यूह रचला. सर्व तयारीनिशी त्यांनी आरम्यांवर हल्ला केला.
  • 18 इस्राएल लोकांसमोरुन अराम्यांनी पळ काढला. दावीदाने व त्याच्या सैन्याने सात हजार अरामी सारथी आणि चाळीस हजार अरामी सैन्य यांना ठार केले. अरामी सैन्याचा नेता शोफख यालाही त्यांनी मारुन टाकले.
  • 19 इस्राएलाने आपला पाडाव केला आहे हे हदरेजरच्या अधिकाऱ्यांचा लक्षात आल्यावर त्यांनी दावीदाशी तह केला. ते दावीदाच्या अधिपत्याखाली आले. अराम्यांनी पुन्हा अम्मोनी लोकांना मदत केली नाही.