wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 इतिहास धडा 22
  • 1 दावीद म्हणाला, “हेच ते परमेश्वर देवाचे मंदिर. इस्राएल लोकांनी होमबली अर्पण करण्याची वेदीही इथेच बांधली जाईल.”
  • 2 इस्राएलमध्ये जे परदेशी लोक राहत होते त्या सर्वाना दावीदाने एक फर्मान काढून बोलवून घेतले. पाथरवटांची निवड त्याने त्यांच्यातून केली. देवाच्या मंदिरासाठी दगडाचे चिरे घडवण्याचे काम त्यांचे होते.
  • 3 दरवाजांसाठी लागणारे खिळे आणि बिजागऱ्या यांच्यासाठी दावीदाने लोखंड आणवले. पितळेचाही फार मोठा साठा त्याने केला.
  • 4 सीदोन आणि सोर या नगरांतील लोकांनी गंधसरुचे लाकूड दावीदाला दिले. ते ओंडके तर एवढे आले की त्यांची मोजदाद करणे कठीण.
  • 5 दावीद म्हणाला, “आपण परमेश्वरासाठी भव्यमंदिर उभारले पाहिजे. पण माझा मुलगा शलमोन अजून लहान आहे. त्याचे शिक्षणही अद्याप पुरे झालेले नाही. परमेश्वराचे मंदिर मात्र उत्कृष्ट झाले पाहिजे. असे देखणे आणि भव्य की सगळ्या राष्ट्रांमध्ये त्याची कीर्ती व्हायला हवी. त्यदृष्टीनेच मी परमेश्वराच्या मंदिराची योजना आखीन.” असे म्हणून दावीदाने आपल्या मृत्यूपूर्वी मंदिर उभारणीची बरीच तयारी केली.
  • 6 मग त्याने आपला मुलगा शलमोन याला जवळ बोलावले. इस्राएलचा परमेश्वर देव याच्यासाठी मंदिर बांधण्याची दावीदाने त्याला आज्ञा केली.
  • 7 दावीद शलमोनला म्हणाला, “मुला, परमेश्वर देवासाठी मंदिर बांधायची मला फार इच्छा होती.
  • 8 पण परमेश्वर मला म्हणाला, ‘दावीदा, तू बऱ्याच लढाया केल्यास आणि त्यात अनेक लोक मारले गेले. तेव्हा तुला माझ्सासाठी मंदिर बांधता येणार नाही.
  • 9 मात्र तुझा मुलगा शांतताप्रिय आहे. मी त्याच्या कारकिर्दीत शांतता लाभू देईन. त्याचे शत्रू त्याला त्रास देणार नाहीत. त्याचे नाव शलमोन म्हणजे शांतताप्रिय असेल. इस्राएलला त्याच्या काळात शांतता आणि स्वस्थता लाभेल.
  • 10 तो माझ्याप्रीत्यर्थ मंदिर उभारील. तो माझा पुत्र आणि मी त्याचा पिता होईन त्याचे राज्य मी बळकट करीन. इस्राएलवर त्याच्या वंशजा पैकी एकजण सर्वकाळ राज्य करील.”
  • 11 दावीद म्हणाला, “मुला, तुला परमेश्वराची अखंड साथ लाभो. तुला यश मिळो. परमेश्वर देवाने भाकीत केल्याप्रमाणे तुझ्याहातून त्याचे मंदिर बांधून होवो.
  • 12 तो तुला इस्राएलचा राजा करील. लोकांचे नेतृत्व करायला आणि परमेश्वर देवाचे नियम पाळायला तो तुला ज्ञान आणि शहाणपण देवो.
  • 13 इस्राएलसाठी परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र सांगितले ते तू कसोशीने पाळ म्हणजे तू यशस्वी होशील. घाबरु नको. दृढ राहा. हिंमत बाळग.
  • 14 “शलमोन, परमेश्वराच्या मंदिराच्या वास्तूसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. 3,750 टन सोने आणि 37,500 टन चांदी मी जमवली आहे. लोखंड आणि पितळ, तर मोजदाद करणे कठीण इतके आहे. दगड, लाकूड यांचाही साठा मी केलाच आहे. शलमोन, त्यात तू भर घालू शकतोस.
  • 15 पाथरवट आणि सुतार तुझ्या दिमतीला आहेत. खेरीज प्रत्येक कामात कुशल अशी माणसे आहेत.
  • 16 सोने, चांदी, पितळ, लोखंड यांच्या कारागिरीत ते निपुण आहेत. शिवाय हे कारागिर काही थोडे थोडके नाहीत. असंख्य आहेत. तेव्हा आता कामाला सुरवात कर. तुला परमेश्वराची साथ मिळो.”
  • 17 दावीदाने मग इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळींना शलमोनला सहकार्य करण्याची आज्ञा केली.
  • 18 दावीद त्यांना म्हणाला, “खुद्द परमेश्वर देवच तुमच्याबरोबर आहे. त्याच्या कृपेने तुम्हाला शांतता लाभली आहे. आपल्या भोवतालच्या शत्रूंना पराभूत करण्यात परमेश्वराने मला साहाय्य केले. आता हा देश परमेश्वराच्या आणि तुमच्या ताब्यात आहे.
  • 19 तेव्हा अंत:करणपूर्वक तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाला शरण जा आणि त्याचे ऐका. परमेश्वर देवाचे पवित्र मंदिर बांधा. मग मंदिरांत पवित्र करारकोश आणि इतर पवित्र वस्तू आणून ठेवा.”