wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 राजे 1धडा 17
  • 1 गिलादमधील तिश्बी या गावात एलीया हा संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या सामर्थ्यावर मी हे सांगतो की येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. पाऊस पडलाच तर माझ्या आज्ञेने पडेल.”
  • 2 मग परमेश्वर एलीयाला म्हणाला,
  • 3 “हा भाग सोड आणि पूर्वेला जा. करीथ या ओहोळापाशी लपून राहा. यार्देन नदीच्या पूर्वेला हा ओहोळ आहे.
  • 4 त्या ओहोळाचे पाणी तू पी. कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे.”
  • 5 तेव्हा एलीया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करीथ या ओहोळा जवळ राहायला गेला.
  • 6 रोज सकाळ संध्याकाळ त्याला कावळे जेवण आणून देत. ओहोळाचे पाणी एलीया पीत असे.
  • 7 पाऊस नव्हताच, तेव्हा काही काळानंतर ओहोळ सुकला.
  • 8 तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला,
  • 9 “सिदोनमधील सारफथ येथे जाऊन राहा तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे.”
  • 10 तेव्हा एलीया सारफथ येथे गेला. तो वेशीजवळ जातो तर त्याला एक बाई भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलीया तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला मिळेल का?”
  • 11 ती पाणी आणायला निघाली तेव्हा एलीया तिला म्हणाला, ‘मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!”
  • 12 तेव्हा ती बाई म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा मुलगा आणि मी जेवू आणि मग भुकेने मरु.”
  • 13 तेव्हा एलीया तिला म्हणाला, “काही काळजी करु नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे त्याची लहानशी भाकर करुन मला आणून दे मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर.
  • 14 इस्राएलचा परमेश्वर देव म्हणाला आहे, “तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल.”
  • 15 तेव्हा ती घरी गेली. एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलीया, ती आणि तिचा मुलगा यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले.
  • 16 पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले.
  • 17 काही दिवसांनंतर या बाईचा मुलगा आजारी पडला. त्याचे दुखणे वाढत गेले शेवटी त्याचा श्र्वास थांबला.
  • 18 तेव्हा ती बाई म्हणाली, “एलीया, तू तर संदेष्टा आहेस मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायलाच तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस?”
  • 19 एलीया तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत, आपल्या बिछान्यावर त्याने त्याला ठेवले.
  • 20 एलीयाने मग प्रार्थना केली, “परमेश्वर देवा, या विधवेने मला तिच्या घरी आश्रय दिला आहे. तिच्यावर ही वेळ का आणतोस? तिच्या मुलाला तू मारणार का?”
  • 21 मग एलीयाने तीनदा त्याच्यावर पाखार घातल्यासारखे करुन प्रार्थना केली, “परमेश्वर देवा याला वाचव.”
  • 22 एलीयाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा श्र्वासेच्छवास पुन्हा झाला तो जिवंत झाला.
  • 23 एलीयाने मुलाला खाली आणले. त्याच्या आईकडे त्याला सोपवून एलीया म्हणाला, “बघ, तुझा मुलगा जिवंत आहे.”
  • 24 ती बाई म्हणाली, “तू खरोखरच देवाचा माणूस आहेस हे मला पटले. खरोखरच परमेश्वर तुझ्यामार्फत बोलतो हे आता मला कळले.”-