wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 शमुवेल 1धडा 1
  • 1 एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील रामा येथला, एलकाना नावाचा एक गृहस्थ होता. हा एलकाना सूफ घराण्यातला असून यरोहाम (किंवा यरामील) याचा मुलगा. यरोहाम एलिहूचा मुलगा आणि एलिहू तोहूचा. तोहू, एफ्राईम घराण्यातील सूफचा मुलगा होय.
  • 2 एलकानाला दोन बायका होत्या. एकीचे नाव हन्ना आणि दुसरीचे पनिन्ना. पनिन्नाला मुलंबाळं होती, पण हन्नाला मात्र अजून मूल झाले नव्हते.
  • 3 एलकाना दरवर्षी रामा या आपल्या गावाहून शिलो येथे जात असे. तेथे तो यज्ञ आणि सर्वशक्तीमान परमेश्वराची भक्ती करत असे. तेथे हफनी आणि फिनहास हे एलीचे मुलगे याजक म्हणून पौरोहित्य करीत होते.
  • 4 एलकाना दर यज्ञाच्या वेळी पनिन्ना आणि तिची मुले यांना त्यांच्या वाटचे अन्न देई.
  • 5 हन्नालाही तो समान वाटा देई. परमेश्वराने तिची कूस उजवलेली नसतानाही तो देई, कारण हन्नावर त्याचे खरेखुरे प्रेम होते.
  • 6 पनिन्ना दर वेळी काहीतरी बोलून हन्नाला दु:खवी. मूलबाळ नसल्यावरुन दूषणे देई.
  • 7 असे दरवर्षी चालायचे. शिलो येथील परमेश्वराच्या मंदिरात सर्व कुटुंबीय जमले की पनिन्नाच्या बोलण्यामुळे हन्ना कष्टी होई. एकदा असेच एलकाना यज्ञ करीत असताना हन्ना दु:खीकष्टी होऊन रडू लागली. ती काही खाईना.
  • 8 एलकाना ते पाहून म्हणाला, “तू का रडतेस? तू का खात नाहीस? तू का दु:खी आहेस? तुला मी आहे-मी तुझा नवरा आहे. तू असा विचार कर की मी दहा मुलांपेक्षा अधिक आहे.”
  • 9 सर्वांचे खाणे पिणे झाल्यावर हन्ना गूपचूप उठली आणि परमेश्वराची प्रार्थना करायला गेली. एली हा याजक तेव्हा परमेश्वराच्या पवित्रस्थानाच्या दरवाजाजवळ आपल्या आसनावर बसला होता.
  • 10 हन्ना अतिशय खिन्न होती. परमेश्वराची प्रार्थना करताना तिला रडू कोसळले.
  • 11 परमेश्वराला ती एक नवस बोलली. ती म्हणाली, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझे दु:ख तू बघतोच आहेस. माझा विसर पडू देऊ नकोस. तू मला मुलगा दिलास तर मी तो तुलाच अर्पण करीन. तो परमेश्वराचा नाजीर होईल. तो मद्यपान करणार नाही. त्याचे आम्ही जावळ काढणार नाही.”
  • 12 हन्नाची प्रार्थना बराच वेळ चालली होती. त्यावेळी एलीचे तिच्या तोंडाकडे लक्ष होते.
  • 13 ती मनोमन प्रार्थना करत होती त्यामुळे तिचे ओठ हलत होते पण शब्द बाहेर फुटत नव्हते. त्यामुळे ती दारुच्या नशेत आहे असे एलीला वाटले.
  • 14 एली तिला म्हणाला, “तू फार प्यायलेली दिसतेस. आता मद्यापासून दूर राहा.”
  • 15 हन्ना म्हणाली, “महाशय, मी कोणतेही मद्य घेतलेले नाही. मी अतिशय त्रासलेली आहे. परमेश्वराला मी माझी सर्व गाऱ्हाणी सांगत होते.
  • 16 मी वाईट बाई आहे असे समजू नका. मी फार व्यभित आहे, मला फार दु:खं आहेत म्हणून मी खूप वेळ प्रार्थना करीत होते इतकंच.”
  • 17 तेव्हा एली म्हणाला, “शांती ने जा. इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो तुला देवो.”
  • 18 “तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात अशी आशा आहे.” असे त्याला म्हणून हन्ना निघाली. तिने नंतर थोडे खाल्लेही. आता तिला उदास वाटत नव्हते.
  • 19 दुसऱ्या दिवशी पहाटे उठून परमेश्वराची भक्ती करुन एलकानाचे कुटुंबीय रामा येथे आपल्या घरी परतले.पुढे एलकाना आणि हन्नाचा संबंध आला तेव्हा परमेश्वराला तिचे स्मरण झाले.
  • 20 यथावकाश तिला दिवस राहिले व मुलगा झाला. हन्नाने त्याचे नाव शमुवेल ठेवले. ती म्हणाली, “मी परमेश्वराकडे त्याला मागितले म्हणून त्याचे नाव शमुवेल.”
  • 21 एलकाना त्या वर्षी यज्ञ करण्यासाठी आणि देवाला बोललेले नवस फेडण्यासाठी शिलो येथे सहकुटुंब गेला
  • 22 हन्ना मात्र गेली नाही. ती म्हणाली, “मुलगा जेवण खाऊ शकेल इतपत मोठा झाला की मी त्याला शिलोला घेऊन जाईन. त्याला परमेश्वराला वाहीन. तो नाजीर होईल. मग तो तिथेच राहील.”
  • 23 हन्नाचा पती एलकाना त्यावर म्हणाला, “तुला योग्य वाटेल तसे कर. तो खायला लागेपर्यंत तू हवी तर घरीच राहा. परमेश्वराने दिलेला आशीर्वाद खरा ठरो“. तेव्हा हन्ना घरीच राहिली कारण शमुवेल अंगावर पीत होता. त्याचे दूध तुटेपर्यंत ती राहिली.
  • 24 तो पुरेसा मोठा झाल्यावर हन्ना त्याला शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात घेऊन आली. तिने तीन वर्षाचा एक गोऱ्हा वीस पौंड पीठ आणि द्राक्षरसाचा बुधला हे ही आणले.
  • 25 ते सर्व परमेश्वरासमोर गेले. एलकानाने नेहमी प्रमाणे परमेश्वरासमोर गोऱ्ह्याचाबळी दिला.मग हन्नाने मुलाला एलीच्या स्वाधीन केले.
  • 26 ती एलीला म्हणाली “महाशय, माझ्यावर कृपादृष्टी असू द्या मी खरे तेच सांगते. मीच इथे तुमच्याजवळ बसून पूर्वी परमेश्वराजवळ याचना केली होती.
  • 27 परमेश्वराकडे मी मुलगा मागितला आणि परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण केली. परमेश्वराने हा मुलगा मला दिला.
  • 28 आता मी तो परमेश्वराला अर्पण करते. तो आयुष्यभर परमेश्वराची सेवा करील.” हन्नाने मग मुलाला तिथेच ठेवलेआणि परमेश्वराची भक्ती केली.