wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 शमुवेल 1धडा 18
  • 1 शौलशी चाललेले दावीदचे बोलणे झाल्यावर योनाथान मनाने दावीदाच्या निकट आला. दावीदवर तो स्वत:इतकेच प्रेम करु लागला.
  • 2 त्या दिवसापासून शौलने दावीदला आपल्याजवळच ठेवून घेतले. त्याला तो आपल्या वडीलांकडे परत जाऊ देईना.
  • 3 योनाथानचे दावीदवर अपार प्रेम होते. त्याने दावीदशी एक करार केला.
  • 4 योनाथानने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून दावीदला दिला. आपला गणवेष इतकेच नव्हे तर धनुष्य, तलवार कमरबंद हे ही दिले.
  • 5 शौलने मग दावीदला अनेक लढायांवर पाठवले. सगळीकडे त्याने विजय मिळवला. तेव्हा शौलने दावीदला सेनापतिपद दिले. याने शौलच्या अधिकाऱ्यांसह सर्वजण खूश झाले.
  • 6 दावीद पलिष्ट्यांचा सामना करायला लढाईवर जाई तेव्हा मुक्कामावर परतताना इस्राएलमधल्या सर्व गावातल्या स्त्रिया त्याच्या स्वागताला समोर येत. त्या आनंदाने गात नाचत. डफ, वीणा वाजवत. शौलच्या समोरच हे चाले.
  • 7 त्या म्हणत,“शौलने हजार शत्रूंना ठार केले तर, दावीदाने लाखो मारले.”
  • 8 या गीतामुळे शौलची मर्जी फिरली आणि त्याला संताप आला. “दावीद लाखो शत्रूंना ठार करतो आणि मी फक्त हजारोंना मारतो असे या म्हणतात काय”
  • 9 तेव्हा पासून तो दावीदकडे असूयेने आणि ईर्ष्येने पाहू लागला.
  • 10 दुसऱ्याच दिवशी शौल मध्ये दुष्ट आत्म्याचा संचार झाला. शौल बेफाम होऊन बडबड करु लागला. दावीद तेव्हा नित्याप्रमाणे वीणा वाजवत होता.
  • 11 शौलच्या हातात तेव्हा भाला होता. शौलला वाटले, “याला आपण भिंतीशी खिळवावे.” शौलने मग दोनदा भाला नेम धरुन मारला पण दोन्ही वेळा दावीद निसटला.
  • 12 दावीदला परमेश्वराची साथ होती. आणि शौलचा त्याने त्याग केला होता. तेव्हा दावीदबद्दल शौलच्या मनात धास्ती होती.
  • 13 शौलने दावीदला दूर पाठवले. हजार सैनिकांचा अधिकारी म्हणून त्याला नेमले. दावीदाने या सैन्याचे लढाईत नेतृत्व केले.
  • 14 परमेश्वर दावीदाच्या पाठीशी होता. तेव्हा दावीदला सर्व ठिकाणी यश मिळाले.
  • 15 जिकडे तिकडे त्याची सरशी होताना पाहून शौलाला दावीदची आणखीच धास्ती वाटू लागली.
  • 16 पण इस्राएल आणि यहूदामधील सर्व लोकांचे मात्र दावीदवर प्रेम होते. युध्दात त्यांच्या पुढे राहून त्यांच्यासाठी त्याने लढाया केल्यामुळे त्यांचा दावीदवर जीव होता.
  • 17 शौल मात्र दावीदाच्या जिवावर उठला होता. त्याला पेचात पकडण्यासाठी शौलने एक योजना आखली. तो दावीदला म्हणाला, “ही मेरब माझी मोठी मुलगी. तू हवे तर हिच्यशी लग्न्न कर. मग तू आणखीच सामर्थ्यवान होसील. तू माझ्या मुलासारखाच होशील. मग तू परमेश्वराच्या वतीने लढाया कर.” ही एक युक्ती होती. प्रत्यक्षात शौलचा विचार वेगळाच होता. ‘आता मला त्याचा जीव घ्यायला नको. परस्पर पलिष्टीच त्याचा काटा काढतील’ असा त्याचा बेत होता.
  • 18 पण दावीद म्हणाला, “माझे घराणे तुमच्या तोलामोलाचे नाही. मीही काही मोठा माणूस नव्हे. तेव्ही मी राजकन्येशी कसा विवाह करु?”
  • 19 त्यामुळे जेव्हा मेरबचा विवाह दावीदशी व्हायचा तो महोलाच्या अद्रीएलशी झाला.
  • 20 शौलची दुसरी मलुगी मीखल हिचे दावीदवर प्रेम होते. लोकांनी ही गोष्ट शौलच्या कानावर घातली. तेव्हा त्याला फारच आनंद झाला.
  • 21 त्याने विचार केला. “आता मीखलमुळे माझा बेत सफल होईल. तिचे लग्न मी दावीदशी करुन देतो. मग पलिष्टी त्याचा वध करतील.” आणि दुसऱ्यांदा शौलने दावीदला लग्न्नाची अनुमती दिली.
  • 22 शौलने आपल्या अधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. त्यांना तो म्हणाला, “त्याला विश्वासात घेऊन हळूच सांगा, ‘राजाला तू आवडतोस. तू त्याच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतला आहेस. तेव्हा राजाच्या मुलीशी तू लग्न्न कर.”
  • 23 शौलच्या अधिकाऱ्यांनी दावीदला हे सर्व सांगितले. पण तो म्हणाला, “राजाचा जावई होणं सोपं आहे अस तुम्हाला वाटतं का? मी सामान्य, निर्धन माणूस, तिच्यासाठी खर्च कुठून करणार?”
  • 24 दावीदचे मनोगत शौलच्या अधिकाऱ्यांनी शौलला सांगितले.
  • 25 शौल त्यांना म्हणाला, “त्याला सांगा, राजाला तुझ्याकडून हुंडा नको आहे. फक्त शत्रूंचा सूड उगवावा म्हणून त्याला पलिष्ट्यांच्या शंभर अग्रत्वचा तेवढ्या हव्या आहेत.” हे अर्थात कपट होते. अशाने पलिष्टी दावीदचा काटा काढतील असे त्याला वाटले.
  • 26 अधिकाऱ्यांनी हे सर्व दावीदला सांगितले. दावीदला राजाचा जावई होणे पसंत पडले. तेव्हा त्याने भराभर पावले उचलली.
  • 27 तो काही लोकांना बरोबर घेऊन पलिष्ट्यांवर चालून गेला. त्याने दोनशेपलिष्ट्यांना मारले. त्यांच्या अग्रत्वचा काढून दावीदाने त्या शौलला दिल्या. कारण राजाचा जावई व्हायचे त्याच्या मनात होते.
  • 28 शौलने दावीदशी मीखलचे लग्न्न करुन दिले. दावीदला परमेश्वराची साथ आहे आणि आपल्या मुलीचे, मीखलचे, त्याच्यावर प्रेम आहे हे शौलच्या लक्षात आले.
  • 29 तेव्हा तो मनातून आणखी धास्तावला. तो दावीदला सतत पाण्यात पाहात होता.
  • 30 पलिष्ट्यांचे सरदार सतत इस्राएलींवर चालून जात. पण दावीद दरवेळी त्यांना पराभूत करी. शौलचा तो एक यशस्वी अधिकारी होता. त्यामुळे दावीदची ख्याती पसरली.