wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 शमुवेल 1धडा 23
  • 1 लोकांनी दावीदला सांगितले, पलिष्टी कईला विरुद्ध लढत आहेत. तेथील खळ्यावरचे धान्य ते लुटून नेत आहेत.
  • 2 दावीदाने परमेश्वराला विचारले, “पलिष्ट्यांवर मी हल्ला करु का?”परमेश्वराने सांगितले, “जरुर पलिष्ट्यांवर हल्ला कर आणि कईलाचे रक्षण कर.”
  • 3 पण दावीद बरोबरचे लोक त्याला म्हणाले, “जरी आपण यहूदात आहोत. तरी किती भीतीच्या वातावरणात आपण इथे आहोत. मग प्रत्यक्ष पालिष्टी सैन्याजवळ गेल्यावर आपले काय होईल?”
  • 4 दावीदाने पुन्हा परमेश्वराला विचारले, परमेश्वराने पुन्हा सांगितले, “कईला येथे जा. पलिष्ट्यांचा पाडाव करायला मी तुम्हाला मदत करतो.”
  • 5 तेव्हा दावीद आपल्या लोकांबरोबर कईला येथे गेला. त्यांनी पलिष्ट्यांशी युध्द केले. पलिष्ट्यांचा पराभव करुन त्यांची गुरे पळवली. अशाप्रकारे कईलाच्या लोकांचे त्यांनी रक्षण केले.
  • 6 (अब्याथार दावीदाकडे पळून आला तेव्हा त्याने आपल्याबरोबर एफोद आणाला होता.)
  • 7 दावीद कईला येथे असल्याचे लोकांनी शौलला सांगिते. शौल म्हणाला, “परमेश्वरानेच दावीदला माझ्या हाती दिले आहे. दावीद आता चांगला अडकला आहे. दरवाजे आणि अडसर असलेल्या नगरात तो आता कोंडला गेला आहे.”
  • 8 शौलने मग युध्दासाठी आपल्या सैन्याला पुकारले. दावीदला आणि त्याच्या लोकांना घेरण्यासाठी ते कईलाला जायला निघाले.
  • 9 शौलची आपल्याविरुध्द मसलत चाललेली आहे हे दावीदला कळले. तेव्हा दावीदाने अब्याथार याजकाला एफोद आणण्याच सांगितले.
  • 10 मग दावीदाने प्रार्थना केली, “परमेश्वरा, इस्राएलच्या देवा! कईला येथे येऊन माझ्यामुळे संपूर्ण नगराचा विध्वंस करायचा शौलचा बेत आहे असे मी ऐकले.
  • 11 खरोखरच शौल येथे येईल का? येथील लोक मला शौलच्या हवाली करतील का? इस्राएलच्या परमेश्वर देवा, तुझ्या सेवकाला नीट सांग.”
  • 12 पुन्हा दावीदाने विचारले, “कईलाचे लोक मला आणि माझ्या साथीदारांना शौलच्या ताब्यात देतील का?” परमेश्वराने याचेही होय असे उत्तर दिले.
  • 13 तेव्हा दावीद आणि त्याच्या बरोबर आलेली सुमारे साहशे माणसे यांनी कईला सोडले. ते गावोगाव भटकंत राहिले, दावीद निसटल्याचे शौलला कळले. त्यामुळे तो तेथे आलाच नाही.
  • 14 दावीद मग वाळवंटातील गढ्या, किल्ले यांच्या आश्रयाने राहू लागला. झीफच्या वाळवंटातील डोंगराळ भागातही तो राहिला. शौल दावीदाचा माग काढायचा प्रयत्न करत होता. पण परमेश्वराने दावीदला त्याच्या हाती लागू दिले नाही.
  • 15 झीफच्या वाळवंटात होरेश येथे असताना शौल आपल्या पाठलागावर येत आहे हे पाहून दावीद घाबरला.
  • 16 शौलचा मुलगा योनाथान दावीदला होरेश येथे भेटायला गेला. त्याने दावीदची परमेश्वरावरची श्रद्धा आणखी दृढ केली.
  • 17 योनाथान दावीदला म्हणाला, “घाबरु नको. माझ्या वडीलांकडून तुला दुखापत होणार नाही. तू इस्राएलचा राजा होशील. मी तुझ्या खालोखाल असेन. माझ्या वडीलांनाही हे माहीत आहे.”
  • 18 मग त्या दोघांनी परमेश्वरासमोर करार केला. तिथून योनाथान आपल्या घरी गेला. दावीद होरेश येथेच राहिला
  • 19 झीफचे लोक गिबा येथे शौल कडे येऊन म्हणाले, “दावीद आमच्या भागात लपून बसलेला आहे. यशीमोनच्या दक्षिणेला हकीला पर्वतावरील होरेशच्या गढीत तो आहे.
  • 20 हे राजा तू आता केव्हाही तिकडे ये, दावीदला तुझ्या हवाली करणे हे आमचे कर्तव्यच आहे.”
  • 21 शौल त्यांना म्हणाला, “या मदतीबद्दल परमेश्वर तुमचे भले करो.
  • 22 आता त्याच्या बद्दल अधिक माहिती काढा. तो कुठे आहे, त्याला कोणीकोणी पाहिले आहे याचा पत्ता लावा.” शौलने विचार केला. ‘दावीद फार धूर्थ आहे, तो माझ्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करत आहे.’
  • 23 पुढे तो म्हणाला, त्याच्या दबा धरुन बसायच्या सर्व जागा हेरुन ठेवा आणि मग इथे येऊन मला सगळ्याची खबर द्या. मी मग तुमच्याबरोबर येईन. त्या भागात दावीद असेल तर त्याला शोधून काढीन. मग यहूदातील घराघरात शोधायची वेळ आली तरी बेहत्तर.”
  • 24 झीफचे लोक मग परत गेले. शौल तेथे नंतर गेला. दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक यशीमोनच्या दक्षिणेला मावोनच्या वाळवंटात होते.
  • 25 शौल आणि त्याची माणसे दावीदचा मागोवा काढत निघाली. पण लोकांनी त्याबद्दल दावीदला सावध केले. तेव्हा तो मावोनच्या वाळवंटातील खडका कडे गेला. शौलला तो मावोनच्या वाळवंटात असल्याचे कळले म्हणून शौल तिकडे गेला.
  • 26 शौल डोंगराच्या एका बाजूला तर दावीद आणि त्याची माणसे त्याच डोंगराच्या दुसऱ्या बाजूला होती. दावीद शौलपासून निसटून जाण्याच्या घाईत होता. शौल आणि त्याचे सैनिक दावीदला पकडण्यासाठी डोंगराला वेढा घालत होते.
  • 27 तेवढ्यात एक निरोप्या शौलकडे आला. “पलिष्टी आपल्यावर हल्ला करायला आले आहेत. ताबडतोब चला” असा त्याने निरोप आणला.
  • 28 तेव्हा शौलने दावीदचा पाठलाग थांबवून पलिष्ट्यांकडे कूच केले. म्हणून त्या खडकाला “निसटून जाण्याचा खडक” (सेला हम्मालकोथ) असे नाव पडले.
  • 29 दावीद मग मावोनचे वाळवंट सोडून एन गेदीच्या गडावर राहिला.