wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 शमुवेल 1धडा 30
  • 1 दावीद आणि त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलाग येथे आली. अमालेक्यांनी सिकलाग आणि नेगेव भागावर हल्ला चढवून सिकलाग शहर भस्मसात केलेले त्यांनी पाहिले.
  • 2 अमालेक्यांनी बायका, गावातील तरुण आणि वृध्द लोक यांना कैदी म्हणून नेले होते. त्यांनी कोणाला ठार केले नाही. पण धरुन मात्र नेले.
  • 3 दावीद आणि त्याच्या बरोबरची माणसे सिकलाग येथे येऊन पोचतात तो त्यांना शहर जळत असलेले दिसले. त्यांच्या बायका मुलेबाळे यांना नेण्यात आले होते. अमालेक्यांनी सर्वांना उचलून नेले होते.
  • 4 दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी खूप आक्रोश केला. आक्रोश करुन करुन त्यांची शक्ती संपुष्टात आली.
  • 5 इज्रेलची अहीनवास आणि कर्मेल येथील नाबालची बायको आबीगईल या दावीदाच्या बायकांनाही नेले होते.
  • 6 आपल्या सर्व मुलाबाळांना कैदी म्हणून धरुन नेलेले पाहून सर्व सैन्याला दु:ख आणि संतापाने घेरले. दावीदला दगडांनी ठेचून मारावे असा विचार लोक बोलून दाखवू लागले. त्यामुळे दावीद फार व्याथित झाला. पण तो परमेश्वरावर भरवंसा ठेवून खंबीर राहिला.
  • 7 अब्याथार या याजकाला त्याने आपला एफोद आणण्यास सांगितले.
  • 8 दावीदाने मग परमेश्वराला विचारले, “आमच्या कुटुंबियांना धरुन नेणाऱ्या शत्रूंचा पाठलाग करु का? शत्रू आमच्या तावडीत सापडेल का?” यावर परमेश्वराने सांगितले, “अवश्य त्यांच्या पाठलागावर जाऊन त्यांना पकड. आपल्या घरच्यांची तू सोडवाणूक करशील.”
  • 9 दावीदाने मग आपल्याबरोबर सहाशे जणांना घेतले आणि ते सर्व बसोर नदीजवळ पोचले. त्यांच्यापैकी दोनशेजण इतके थकले की त्यांना पुढे जाववेना. ते तिथेच राहिले. तेव्हा उरलेली चारशे माणसे दावीद बरोबर पुढे अमालेक्यांच्या पाठलागावर गेली.
  • 10
  • 11 त्यांना एका शेतात एक मिसरी आढळला. त्याला त्यांनी दावीदकडे नेले. त्याला खाऊ पिऊ घातले.
  • 12 अंजिराच्या ढेपेचा एक तुकडा आणि द्राक्षाचे दोन घड त्यांनी त्याला दिले. तेव्हा त्याला बरे वाटू लागले. तीन दिवस आणि रात्री त्याच्या पोटात अन्न पाणी गेले नव्हते.
  • 13 दावीदाने त्याला विचारले, “तुझा मालक कोण? तू आलास कुठून?”तो मिसरी म्हणाला, “मी मिसरी असून एका अमालेक्यांचा गुलाम आहे. तीन दिवसांपूर्वी मी आजारी पडलो तेव्हा माझ्या धन्याने मला सोडून दिले.
  • 14 करेथी राहतात त्या नेगेव प्रदेशावर, यहूदा प्रांतावर व कालेब लोकांच्या दक्षिण भागावर आम्ही हल्ले केले होते. सिकलागही आम्ही जाळले.”
  • 15 दावीद त्याला म्हणाला, “आमच्या बायकामुलांना तुम्ही नेलेत तिथे मला घेऊन जाशील का?”तेव्हा तो मिसरी दास म्हणाला, “तुम्ही परमेश्वरापुढे शपथ घेतलीत तर मी तुम्हाला मदत करीन. पण तुम्ही मला मारणार नाही किंवा माझ्या धन्याकडे देणार नाही असे मला वचन द्या.”
  • 16 त्या मिसरी माणसाने दावीदला अमालेक्यांच्या तळापर्यंत नेले. तेथे ते लोक खात पित आणि मौजमजा करत इतस्तत: पसरले होते. पलिष्टी आणि यहूदा प्रांतातून आणलेल्या लुटीचा ते मनसोक्त उपभोग घेत होते.
  • 17 दावीदाने त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना मारले. सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्यांच्यात लढाई झाली. अमालेक्यांपैकी चारशे तरुण आपापल्या उंटांवर स्वार होऊन पळून गेले. ते वगळता कोणीही वाचले नाही.
  • 18 आपल्या दोन बायकांसकट अमलेक्यांनी जे जे पळवले होते ते सर्व दावीदाने परत मिळवले.
  • 19 कोणीही गहाळ झाले नाही. मुलं, वृध्द, माणसं, मुलगे, मुली सर्व मैल्यावान वस्तू ज्याच्या त्याला मिळाल्या. अमालेक्यांच्या लूटीतील सर्व काही दावीदाने परत आणले.
  • 20 त्यांची सर्व शेरडे मेंढरे आणि गुरे दावीदाने आणली. दावीदाच्या माणसांनी त्यांना पुढे घातले आणि ते म्हणाले, “हे दावीदाने मिळवलेले बक्षीस आहे.”
  • 21 जे दमले भागलेले लोक दावीद बरोबर पुढे जाऊ शकले नाहीत आणि बसोर नदीपाशीच थांबले होते तेथे, त्या दोनशे जणांकडे दावीद आला. दावीद आणि त्याचे सैन्य येताना पाहून ते त्यांना सामोरे आले. त्यांनी दावीदाच्या सैन्याचे आगत स्वागत केले. दावीदाने त्यांचे क्षेम कुशल विचारले.
  • 22 दावीद बरोबर गेलेल्यांमध्ये काही विघन्नसंतोषी माणसे होती. ती म्हणाली, “ही दोनशे माणसे आपल्या बरोबर पुढे आली नाहीत. तेव्हा त्यांना आपल्या लुटीतील हिस्सा मिळाणार नाही. त्यांची बायका मुले तेवढी ज्याची त्याने घ्यावीत.”
  • 23 दावीद त्यांना म्हणाला, “नाही, असे वागू नका. परमेश्वराने आपल्याला काय दिले त्याचा विचार करा. परमेश्वरामुळे शत्रूचा पारभव आपण करु शकलो.
  • 24 तुम्ही म्हणता ते कोणी ऐकणार नाही. जे इथे सामानसुमानाजवळ थांबले ते आणि युध्दावर आले ते अशा सर्वांना सारखाच वाटा मिळेल. वाटण्या समान होतील.”
  • 25 तेव्हापासून इस्राएलसाठी हीच वहिवाट पडली; हाच नियम झाला. आजतागायत तो चालू आहे.
  • 26 दावीद सिकलाग येथे आला. त्याने अमालेक्यांकडून आणलेल्या लुटीतील काही वस्तू आपले मित्र, यहूदातील वडीलधारी मंडळी यांना पाठवल्या. त्याने सांगितले, “परमेश्वराच्या शत्रूकडून आणलेल्या लुटीतीला ही भेट”
  • 27 बेथेल, दक्षिणेकडील रामोथ, यत्तोर,
  • 28 अरोएर, सिफमोथ, एष्टमो,
  • 29 राखाल, येरहमेलीतील नगरे तसेच केनीची नगरे,
  • 30 हर्मा, कोर आशान, अथाख,
  • 31 आणि हेब्रोन अशा ज्या ज्या ठिकाणी दावीद आपल्या साथीदारांसह फिरत असे तेथील वडीलधाऱ्यांनाही त्याने या लुटीतील वस्तू पाठवल्या.