wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


2 राजे धडा 25
  • 1 सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुध्द बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्या सैन्यासह यरुशलेमवर चाल करुन गेला. सिद्कीया राज्यावर आल्याचे ते नववे वर्ष, दहावा महिना, दहावा दिवस होता. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमला वेढा देऊन लोकांची ये जा रोखली. मग त्याने नगराभोवती कचऱ्याचे अडसर निर्माण केले.
  • 2 सिद्कीयाच्या कारकिर्दीचे अकरावे वर्ष उजाडेपर्यंत हा वेढा चालू राहिला.
  • 3 दुष्काळाने परिस्थिती बिकट झाली होती. चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवसापर्यंत नगरातील सामान्य माणसाची अन्नान्नदशा झाली.
  • 4 नबुखद्नेस्सरच्या सैन्याने शेवटी तटाला खिंडार पाडले. त्या रात्री राजा सिद्कीया आणि त्याचे सैन्य यांनी पलायन केले. त्यांनी पळून जाण्यासाठी दुहेरी तटबंदीमधल्या गुप्त वाटेचा आश्रय घेतला. ही वाट राजाच्या बागेजवळ होती नगराभोवती शत्रूसैन्याचा वेढा होता पण सिद्कीया आणि त्याचे सैन्य वाळवंटाच्या दिशेने निसटले.
  • 5 बाबेलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना यरीहोजवळ गाठले. तेव्हा सिद्कीयाचे सैन्य त्याला एकटा सोडून पळून गेले.
  • 6 बाबेलच्या लोकांनी राजा सिद्कीयाला धरुन रिब्ला येथे आपल्या राजाकडे नेले. या लोकांनी सिद्कीयाला जबर शासन करण्याचे ठरवले.
  • 7 त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्याला जेरबंद करुन बाबेलला नेले.
  • 8 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्यात सातव्या दिवशी नबुखद्नेस्सर यरुशलेमवर चाल करुन आला. नबुजरदान हा राजाच्या उत्तम, निवडक सैन्याचा नायक होता.
  • 9 या नबुजरदानने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा आणि यरुशलेममधील सर्व घरे जाळून टाकली. मोठमोठे वाडेही त्याने उद्ध्वस्त केले.
  • 10 मग बाबेलच्या सैन्याने यरुशलेमची तटबंदी पाडली.
  • 11 नगरात अजून असलेले लोक नबुजरदानने ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी जे शरण यायला तयार होते त्यांच्यासह सर्वांना कैदी म्हणून नेले.
  • 12 अगदीच दरिद्री लोकांना तेवढे त्याने तेथेच राहू दिले. द्राक्षमळे आणि शेतीची देखभाल करण्यासाठी त्याने त्यांना तिथे ठेवले.
  • 13 परमेश्वराच्या मंदिरातील सर्व पितळी पात्रांची बाबेलच्या सैन्याने मोडतोड केली. पितळी खांब, ढकलगाड्या, मोठमोठी पितळी घंगाळी यांची मोडतोड करुन ते पितळ त्यांनी बाबेलला नेले.
  • 14 इतर पात्रे, फावडी, वाती कापण्याच्या कात्र्या, पळ्या, पितळी थाळ्या ही परमेश्वराच्या मंदिरातली सर्व उपकरणेही त्यांनी घेतली.
  • 15 अग्निपात्रे, वाडगे, सोने-चांदीच्या लोभापायी सोन्यारुप्याची भांडीही नबुजरदानने हस्तगत केली.
  • 16 अशाप्रकारे, नबुजरदानने बळकावलेल्या वस्तू:दोन पितळी स्तंभ (प्रत्येक स्तंभाची उंची सत्तावीस फूट त्यावरील कळस साडेचार फूट उंचीचे तेही पितळी असून त्यावर जाळीकाम आणि डाळिंबाची नक्षी होती दोन्ही स्तंभ अगदी सारखेच होते.)एक मोठे पितळी घंगाळ परमेश्वराच्या मंदिरासाठी शलमोनने करवून घेतलेल्या ढकलगाड्या यांत इतके पितळ होते की त्याचे वजन करणे शक्य नव्हते.
  • 17
  • 18 नबुजरदानने मंदिरातून खालील लोकांना नेले मुख्य याजक सराया दुय्यम याजक सफन्या आणि तीन द्वारपाल
  • 19 आणि शहरातून एक सैन्याधिकारी अजूनही नगरात असलेले राजाचे पांच सल्लागार सैन्याधिकाऱ्याचा सचिव. हा जनगणना प्रमुख असून सैनिकांची निवड करत असे. शहरात सापडलेली साठ माणसेही त्याने घेतली.
  • 20 हमाथ प्रदेशातील रिब्ला येथे नबुजरदानने या सर्वांना राजासमोर हजर केले. राजाने त्या सर्वांची तेथे हत्या केली. अशाप्रकारे यहूदींना आपल्या भूमीतून बंदीवान म्हणून जावे लागले.
  • 21
  • 22 नबुखद्नेस्सरने काही लोकांना यहूदातच राहू दिले. त्यात एकजण होता त्याचे नाव गदल्या. हा अहीकामचा मुलगा आणि अहीकाम शाफानचा. या गदल्याला नबुखद्नेस्सरने यहूदा प्रांतावर अधिकारी म्हणून नेमले.
  • 23 नथन्याचा मुलगा इश्माएल, कोरहाचा मुलगा यहोहानान आणि नटोफाथी तन्हुमेथाचा मुलगा सराया व माकाथीचा मुलगा याजन्या हे सैन्यातील सरदार होते. त्यांनी बाबेलच्या राजाने गदल्याला अधिकारी केल्याचे ऐकले म्हणून ते त्याला भेटायला मिस्पा येथे आले.
  • 24 गदल्याने या सर्वाना अभय दिले आणि तो त्यांना म्हणाला, “बाबेलच्या अधिकाऱ्यांचे भय बाळगू नका. या देशातच राहून बाबेलच्या राजाशी एकनिष्ठ राहा. म्हणजे तुमचे भले होईल.”
  • 25 अलीशामचा मुलगा नथन्या याचा मुलगा इश्माएल हा राजसंतानांपैकी होता. त्याने आणखी दहाजणांसमवेत सातव्या महिन्यात गदल्यावर हल्ला केला आणि सर्व यहूदी तसेच खास्दी यांना मिस्पा येथे ठार केले.
  • 26 मग सर्व सैन्याधिकारी आणि लोक मिसरला पळून गेले. बाबेलच्या लोकांच्या धास्तीने कनिष्ठ पदावर असलेल्यापासून श्रेष्ठ पदावर असलेल्यांपर्यंत सर्व पळाले.
  • 27 पुढे अबील मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन याची कैदेतून सुटका केली. यहोयाखीनला तोपर्यत तुरुंगात पडून सदतीस वर्षे झाली होती. अबील मरोदखने सत्तेवर आल्यावर बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी हे सुटकेचे काम केले.
  • 28 यहोयाखीनच्या बाबतीत त्याचे धोरण मवाळपणाचे होते. त्याने यहोयाखीनला इतर राजांपेक्षा दरबारात उच्चासन दिले.
  • 29 अबील मरोदखने त्याला तुरुंगातले कपडे बदलायला लावले. पुढे आयुष्यभर यहोयाखीन अबील मरोदखच्या शेजारी मेजावर बसून जेवत असे.
  • 30 अबील मरोदखने त्याला पुढे त्याच्या आयुष्यभर रोज जेवण दिले.