wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


2 शमुवेल धडा 1
  • 1 अमालेक्यांचा पाडाव करुन दावीद सिकलाग येथे परतला. शौलाच्या मृत्यूनंतर लगेचची ही घटना आहे. दावीदाला सिकलाग येथे येऊन दोन दिवस झाले होते.
  • 2 तिसऱ्या दिवशी तिथे एक तरुण सैनिक आला. तो शौलाच्या छापणीतला होता. त्याचे कपडे फाटलेले आणि डोके धुळीने माखलेले होते. सरळ दावीदापाशी येऊन त्याने लोटांगण घातले.
  • 3 दावीदाने त्याला “तू कोठून आलास?” म्हणून विचारले. त्याने आपण नुकतेच इस्राएलांच्या छावणीतून आल्याचे सांगितले.
  • 4 तेव्हा दावीद त्याला म्हणाला, “मग युध्दात कोणाची सरशी झाली ते सांग बरे!”तो म्हणाला, “लोकांनी लढाईतून पळ काढला. बरेच जण युध्दात कामी आले. शौल आणि त्याचा मुलगा योनाथान दोघेही प्राणाला मुकले.’
  • 5 दावीद त्या तरुणाला म्हणाला, “हे दोघे मेले हे तुला कसे कळले?”
  • 6 यावर तो तरुण सैनिक म्हणाला, “योगायोगाने मी गिलबोवाच्या डोंगरावरच होतो. तिथे शौल आपल्या भाल्यावर पडलेला मला दिसला. पलिष्ट्यांचे रथ आणि घोडेस्वार त्याच्या अगदी नजीक येऊन ठेपले होते.
  • 7 शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला मी दिसलो. त्याने मला बोलावले आणि मी ओ दिली.
  • 8 त्याने माझी चौकशी केली. मी अमालेकी असल्याचे त्याला सांगितले.
  • 9 तेव्हा शौल म्हणाला, “मला जबर दुखापत झाली आहे. तेव्हा मला मारुन टाक. एवीतेवी मी मरणाच्या दारातच उभा आहे.’
  • 10 त्याची जखमी अवस्था पाहता तो वाचणार नाही हे दिसतच होते, तेव्हा मी त्याचा वध केला. मग त्याचा मुकुट आणि दंडावरचे आभूषण काढून घेतले. स्वामी महाराज, त्याच वस्तू येथे तुमच्यासाठी मी आणल्या आहेत.”
  • 11 हे ऐकून दावीदाला इतके दु:ख झाले की त्या भरात त्याने आपले कपडे फाडले. त्याच्या सोबतच्या लोकांनीही त्याचे अनुसरण केले.
  • 12 दु:खाने त्यांनी आक्रोश केला. संध्याकाळ पर्यंत त्यांनी काही खाल्ले नाही. शौल, त्याचा मुलगा योनाथान त्याचप्रमाणे परमेश्वराचे लोक म्हणजे इस्राएलाचे लोक मृत्यु मुखी पडले या बद्दल त्यांनी शोक केला.
  • 13 शौलाच्या मृत्युची बातमी आणणाऱ्या त्या तरुण सैनिकाशी दावीद बोलला. त्याला दावीदाने विचारले, “तू कुठला?” त्याने सांगितले. “मी अमालेकी असून एका परदेशी माणसाचा मुलगा आहे.”
  • 14 दावीदाने त्याला विचारले, “देवाने निवडलेल्या राजाचा वध करताना तुला भीती कशी वाटली नाही?”
  • 15 पुढे दावीद त्याला म्हणाला, “तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला आपण मारले असे तू बोलून चुकला आहेस. तू अपराधी आहेस याची तूच आपल्या तोंडाने साक्ष दिली आहेस.” दावीदाने मग आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून या अमालेक्याचा वध करण्यास फर्मावले. त्याप्रमाणे त्या इस्राएली तरूणाने अमालेक्याला मारले.
  • 16
  • 17 शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांना उद्देशून दावीदाने एक शोकपूर्ण गीत म्हटले.
  • 18 त्याने यहूद्यांना एक शोकगीत शिकवायला सांगितले हे शोकगीत धनुर्विलाप या नावाने ओळखले जाते. याशारच्या पुस्तकात हे गीत लिहिलेले आहे.
  • 19 “हे इस्राएला, तुझे सौंदर्य तुझ्या डोंगरावर नष्ट झाले पाहा, हे शूर कसे धारातीर्थी पडले!
  • 20 ही बातमी गथ मध्ये सांगू नका अष्कलोनच्या रस्त्यांवर जाहीर करु नका. नाहीतर पलिष्ट्यांच्या त्या मुली (शहरे) आनंदित होतील. नाहीतर (सुंता न केलेल्या) त्या परकीयांच्या मुलींना (शहरांना) आनंद होईल.
  • 21 गिलबोवाच्या डोंगरावर पाऊस किंवा दव न पडो! तिथल्या शेतातून यज्ञात अर्पण करण्यापुरतेही काही न उगवो! कारण शूरांच्या ढालींना तिथे गंज चढला शौलची ढाल तेलपाण्यावाचून तशीच पडली
  • 22 योनाथानच्या धनुष्याने आपल्या वाटच्या शत्रुंचे पारिपत्य केले शौलाच्या तलवारीने ही आपले बळी घेतले. सक्ताचे पाट वाहवून त्यांनी लोकांना वधिले, बलदंडांची हत्या केली.
  • 23 शौल आणि योनाथान यांनी आयुष्यभर परस्परांवर प्रेम केले. एकमेकांना आनंद दिला मृत्यूनेही त्यांची ताटातूट केली नाही. गरुडांहून ते वेगवान् आणि सिंहापेक्षा बलवान् होते!
  • 24 इस्राएली कन्यांनो, शौलासाठी शोक करा. किरमिजी वस्त्रे त्याने तुम्हाला दिली वस्त्रांवरचे सोन्याचे जरीकाम त्याने दिले.
  • 25 युध्दात शूर पुरुष कामी आले गिलबोवाच्या डोंगरावर योनाथानला मरण आले.
  • 26 बंधो. योनाथान, मी अतिशय दु:खी असून तुझ्यासाठी फार अस्वस्थ आहे. तुझ्या सहवासाचा लाभ मला मिळाला. स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही तुझे माझ्यावरील प्रेम अधिक होते
  • 27 या युध्दात पराक्रमी पुरुषांचे पतन झाले त्यांची शस्त्रे नष्ट झाली.”