wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


2 शमुवेल धडा 11
  • 1 वसंत ऋतूमध्ये ज्यावेळी राजे युध्द मोहिमांवर जातात त्यावेळी दावीदाने यवाबाला सर्व नोकरा चाकरांचा लवाजमा आणि समस्त इस्राएलांना अम्मोन्यांच्या संहारासाठी पाठवले. यवाबाच्या सैन्याने अम्मोन्यांच्या राब्बा या राजधानीच्या शहराला वेढा घातला. दावीद मात्र यरूशलेम येथेच राहिला.
  • 2 संध्याकाळी तो आपल्या पलंगावरुन उठला आणि राजमहालाच्या छतावरुन फिरु लागला. तिथून त्याला एक बाई स्नान करताना दिसली. ती अतिशय रुपवान होती.
  • 3 तेव्हा दावीदाने आपल्या सेवकवर्गाला बोलवून तिची माहिती काढली. सेवकाने सांगितले, “ती अलीयमची मुलगी बथशेबा उरीया हित्ती याची ती पत्नी.”
  • 4 तिला आपल्याकडे घेऊन यायला दावीदाने निरोप्याला पाठवले. ती आल्यावर दावीदाने तिच्याशी शरीरसंबंध केला. नंतर स्नान करुन शुध्द होऊन ती पुन्हा आपल्या घरी परतली.
  • 5 पण बथशेबा गर्भवती राहिली. दावीदाला तिने निरोप पाठवला. तिने सांगितले, “मी गरोदर आहे.”
  • 6 दावीदाने यवाबाला निरोप पाठवला की उरीया हित्तीला माझ्याकडे पाठवा. तेव्हा यवाबाने उरीया हित्तीला दावीदकडे पाठवले.
  • 7 उरीया आल्यावर दावीद त्याच्याशी बोलला. उरीयाला त्याने यवाब, सर्व सैन्य, लढाई यांचे वर्तमान विचारले.
  • 8 मग म्हणाला, “घरी जा आणि आराम कर.” उरीया महालातून बाहेर पडला त्यानंतर त्याच्यासाठी राजातर्फे भेट पाठवण्यात आली
  • 9 पण उरीया घरी गेला नाही. तो महालाच्या बाहेरच दाराशी झोपून राहिला. राजाच्या सेवकवर्गा प्रमाणेच तो तिथे झोपला.
  • 10 उरीया घरी परतला नसल्याचे सेवकांनी दावीदाला सांगितले.तेव्हा दावीद उरीयाला म्हणाला, “तू लांबून प्रवास करुन आला आहेस तू घरी का गेला नाहीस?”
  • 11 उरीया दावीदाला म्हणाला, “पवित्र करारकोश, इस्राएलचे सैनिक आणि यहूदा हे राहूट्यांमध्ये राहात आहेत. माझा धनी यवाब आणि महाराजांचे (दावीदाचे) सेवक ही खुल्या मैदानात तळ देऊन आहेत. अशा वेळी मीच तेवढे घरी जाऊन खाणे-पिणे, बायकोच्या सहवासात झोपणे योग्य होणार नाही.”
  • 12 दावीद उरीयाला म्हाणाला, “आजच्या दिवस इथे राहा. उद्या मी तुला युध्दभूमीवर पाठवतो.”उरीयाने त्या दिवशी यरुशलेममध्येच मुक्काम केला.
  • 13 दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने त्याला भेटायला बोलावले. दावीदाबरोबर उरीयाने जेवणखाण केले. दावीदाने त्याला बेहोश होईपर्यंत मद्य पाजले. पण तरी उरीया घरी गेला नाही. त्या संध्याकाळी तो राजाच्या सेवकांबरोबरच महालाच्या दाराशी झोपायला गेला.
  • 14 दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने यवाबासाठी एक पत्र लिहून ते उरीयाला न्यायला सांगितले.
  • 15 त्या पत्रात दावीदाने लिहिले होते. “आघाडीवर जेथे तुंबळ युध्द चालले असेल तेथे उरीयाला पाठव. त्याला एकट्याला तेथे सोडा म्हणजे तो युध्दात कामी येईल.”
  • 16 यवाबाने नगराची टेहेळणी करुन सर्वात लढवय्ये अम्मोनी कोठे आहेत ते पाहिले आणि उरीयाला तेथे नेमले.
  • 17 राब्बा नगरातील लोक यवाब विरुद्ध चालून आले. दावीदाची काही माणसे मारली गेली. उरीया हित्ती हा त्यापैकी एक होता.
  • 18 नंतर यवाबाने युध्दातील हकिकतींचे साद्यंतवृत्त दावीदाला पाठवले.
  • 19 युध्दात जे जे झाले ते सर्व सांगायला त्याने आपल्या नोकराला सांगितले.
  • 20 यवाब सेवकाला म्हणाला, “कदाचित राजा संतापून म्हणेल, “यवाबाचे सैन्य नगराच्या इतके जवळ भिडले कसे? शत्रू तटाच्या भितीवरुन शिरसंधान करतील हे त्याला ठाऊक असायला हवे.
  • 21 तेबेसमध्ये यरुब्बेशेथचा मुलगा अबीमलेख याला एका बाईने मारले हे आठवते ना? तिने तटबंदीवरुन जात्याची तळी उचलून अबीमलेखवर टाकली. असे असताना हा इतकया जवळ का गेला?’ राजा दावीद असे काही म्हणाला तर त्याला हे ही म्हणावे, “उरीया हित्ती हा तुमचा सेवकही यात मारला गेला.”’
  • 22 निरोप्याने दावीदाकडे जाऊन यवाबाने जे जे सांगयला सांगितले ते सर्व कथन केले.
  • 23 तो म्हणाला, “अम्मोन्यांनी आमच्यावर मैदानात हल्ला केला. आम्ही त्यांचा सामना करुन त्यांना नगराच्या वेशीपर्यंत पळवून लावले.
  • 24 मग तटबंदीवरील काही लोकांनी आपल्या शिपायांवर बाणांचा वर्षाव केला. त्यात काही जण ठार झाले. उरीया हित्ती हा तुमचा सेवकही प्राणाला मुकला.”
  • 25 दावीद त्या निरोप्याला म्हणाला, “यवाबाला सांग, “निराश होऊ नको, हिंमत सोडू नको. तलवारीने कोणाचाही संहार होऊ शकतो. राब्बावर आणखी जोरदार हल्ला चढवा. तुम्ही जिंकाल.’ यवाबाला माझा हा निरोप सांगून प्रोत्साहन दे.”
  • 26 उरीया मरण पावल्याचे बथशेबाला कळले. तिने पतिनिधनाबद्दल शोक केला.
  • 27 काही काळाने तिचे दु:ख ओसरल्यावर दावीदाने सेवकांकरवी तिला आपल्याकडे आणवले. ती त्याची पत्नी झाली आणि त्याच्या मुलाला तिने जन्म दिला. पण दावीदाचे हे नीच कृत्य परमेश्वराला पसंत पडले नाही.