wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


2 शमुवेल धडा 13
  • 1 दावीदाचा मुलगा अबशालोम याला तामार नावाची बहीण होती. ती दिसायला फार सुरेख होती. दावीदाला अम्नोन नावाचा आणखी एक मुलगा होता.
  • 2 त्याचे तामारवर प्रेम होते. तामार कुमारिका होती. तिच्याशी वावगे वागण्याची त्याची छाती नव्हती. पण तिच्याविषयी त्याच्या मनात अभिलाषा होती. तिच्याविषयी विचार करून करून तो आजारी पडला.
  • 3 अम्नोनला योनादाब नावाचा मित्र होता. दावीदाचा भाऊ शिमा याचा हा मुलगा. योनादाब धूर्त होता.
  • 4 तो अम्नोनला म्हणाला, “दिवसेंदिवस तू क्षीण होत चालला आहेस. तू तर राजपुत्र! खायची प्यायची रेलचेल असताना तू असा अशक्त का होत आहेस? माझ्यापाशी मनमोकळे कर.”तेव्हा अम्नोन योनादाबला म्हणाला, “माझे तामार वर प्रेम आहे, पण ती माझा सावत्र भाऊ अबशालोमची बहीण आहे.”
  • 5 योनादाब यावर अम्नोनला म्हणाला, “आता तू आजारी पडल्याचे सोंग कर आणि झोपून जा. मग वडील भेटायला आले की त्यांना सांग, “तामारला माझ्याकडे येऊ द्या. तिने मला खायला घालू द्या. माझ्या समोरच तिला एखादा खाद्य पदार्थ तयार करु द्या. मग तो तिच्या हातून मी खाईन”
  • 6 तेव्हा अम्नोन आजारी असल्याचे भासवून बिछान्यावर झोपून राहिला. राजा दावीद त्याच्या समाचाराला आला. त्याला तो म्हणाला, “तामारला माझ्याकडे पाठवा. तिला इथे माझ्यादेखत दोन पोव्व्या करु द्या आणि मला भरवू द्या. मग मी त्या खाईन.”
  • 7 दावीदाने तामारच्या दालनात तसा निरोप पाठवायची व्यवस्था केली. तामारला नोकराने निरोप दिला, “आपला भाऊ अम्नोन याच्या घरी जाऊन त्याच्यासाठी खायला कर.”
  • 8 तामार तेव्हा आपला भाऊ अम्नोन कडे गेली. तो पलंगावरच होता. तिने थोडी कणीक घेऊन ती चांगली मळून पोव्व्या केल्या अम्नोन हे सर्व पाहात होता.
  • 9 पोव्व्या तयार झाल्यावर तव्यावरून काढून तिने त्या अम्नोनसाठी ताटात मांडल्या पण अम्नोन ते काही केल्या खाईना. मग आपल्या नोकारांना त्याने बाहेर निघून जाण्याची आज्ञा देऊन तिथून घालवले. सर्व नोकर बाहेर पडले.
  • 10 यानंतर आम्नोन तामारला म्हणाला, “ताट घेऊन शयनगृहात ये आणि तेथे मला तू भरव.”तेव्हा ती ताट घेऊन भावाच्या शयनगृहात गेली.
  • 11 त्याला ती भरवू लागली तोच त्याने तिचा हात धरला. तिला तो म्हणाला, “हे बाहिणी, ये आणि माझ्याजवळ झोप.”
  • 12 तामार त्याला म्हणाली, “भाऊ नको! अशी बळजबरी तू माझ्यावर करु नकोस. ही मोठी शरमेची गोष्ट आहे. असल्या भयंकर गोष्टी इस्राएलमघ्ये कदापि घडता कामा नयेत.
  • 13 मला कायम या लाजिरवाण्या गोष्टीचा कलंक लागेल. लोकांच्या दृष्टीने तू इस्राएलामधल्या अनेक मूर्खांपैकी एक ठरशील. तू कृपा करुन राजाशी बोल. तो तुला माझ्याशी लग्न करायला अनुमती देईल.”
  • 14 पण अम्नोनने तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले. शारीरिक दृष्ट्याही तो तिच्यापेक्षा शकतीवान होता. तिला न जुमानता त्याने तिच्यावर बलात्कार केला.
  • 15 मग तिच्याबद्दल त्याच्या मनात तिटकारा निर्माण झाला. पूर्वी त्याचे तिच्यावर जेवढे प्रेम होते त्यापेक्षा अधिक तो आता तिचा द्वेष करु लागला. त्याने तिला तात्काळ तिथून निघून जायला सांगितले.
  • 16 तामार त्याला म्हणाली, “नाही, आता माझी अशी रवानगी करू नकोस. ते तर तुझ्या या आत्ताच्या कृत्यापेक्षाही वाईट होईल.”पण त्याने तिचे म्हणणे झिटकारून टाकले.
  • 17 नोकरांना बोलावून तो म्हणाला, “हिला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा आणि दार बंद करून टाका.”
  • 18 तेव्हा अम्नोनच्या नोकराने तिला तेथून बाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला.तामरने रंगीबेरंगी, पट्टट्यापट्ट्यांचा पायघोळ अंगरखा घातला होता. राजकन्या लग्नापूर्वी असा पोषाख करत असत.
  • 19 तामारने उद्विग्न मन:स्थितीत आपले कपडे फाडले आणि डोक्यात राख घालून घेतली. डोक्यावर हात आपटून ती शोक करु लागली.
  • 20 तेव्हा अबशालोम या तिच्या भावाने तिला विचारले, “तू अम्नोनकडे गेली होतीस का? त्याने तुला त्रास दिला का? आता तू शांत हो. तो तुझा भाऊ आहे. तेव्हा त्याचे काय करायचे ते आम्ही पाहू. तू याचा त्रास करुन घेऊ नकोस.” यावर तामार काही बोलली नाही. ती शांतपणे अबशालोमच्या घरी राहायला गेली.
  • 21 हे सर्व राजा दावीदाच्या कानावर गेले. तो संतापला.
  • 22 अबशालोमला अम्नोनचा तिरस्कार वाटू लागला. तो अम्नोनशी एक चकार शब्द बोलेना. अम्नोनने आपल्या बहिणीशी जो अतिप्रसंग केला त्याने अबशालोम द्वेषाने पेटून उठला होता.
  • 23 दोन वर्षानंतर, मेंढरांची लोकर कातरणारे अबशालोमचे काही लोक एफ्राइम जवळील बालहासोरमध्ये आलेले होते. अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ते पाहायला बोलावले.
  • 24 अबशालोम राजाकडे जाऊन म्हणाला, “मेंढ्यांची लोकर कातरायला माझी माणसे आलेली आहेत. आपल्या नोकरासहित येऊन हे दृश्य पाहा.”
  • 25 तेव्हा राजा दावीद त्याला म्हणाला, “मुला आम्ही सर्व जण येणं काही शक्य नाही. तुझ्यावरही त्याचा भार पडेल.” अबशालोमने दावीदाची खूप आर्जवे केली. दावीद गेला नाही पण त्याने आपले आशीर्वाद दिले.
  • 26 अबशालोम म्हणाला, “तुम्ही नाही तर निदान माझा भाऊ अम्नोन याला तरी पाठवा.” राजा दावीद म्हणाला, “तो तरी तुला कशासाठी बरोबर यायला हवा आहे?”
  • 27 पण अबशालोमने आपला हटृ सोडला नाही. शेवटी, अम्नोन आणि इतर सर्व मुले यांना अबशालोम बरोबर जायला राजा दावीदाने संमती दिली.
  • 28 अबशालोमने आपल्या नोकरांना आज्ञा दिली. तो म्हणाला, “अम्नोनवर नजर ठेवा. मद्याचा आनंद घेत घेत त्याला जेव्हा त्याची नशा चढेल तेव्हा मी तुम्हाला संकेत करीन. मग त्याच्यावर हल्ला करुन तुम्ही त्याला ठार करा. शिक्षेची भीती बाळगू नका. अखेर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करत आहात. धैर्याने आणि खंबीरपणाने वागा.”
  • 29 तेव्हा अबशालोमच्या नोकरांनी त्याचा शब्द पाळला. अम्नोनला त्यांनी ठार केले. पण दावीदाची बाकीची सर्व मुले निसटली. आपापल्या खेचरावर बसून ती पळाली.
  • 30 राजाचे मुलगे नगराच्या वाटेवर असतानाच राजा दावीदाला या घडामोडीची खबर मिळाली, ती अशी, “अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ठार केले. कोणालाही त्यातून वगळले नाही.”
  • 31 राजा दु:खाने आपले कपडे फाडून जमिनीवर पडून राहिला. राजाच्या जवळ असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनीही आपली वस्त्रे फाडली.
  • 32 पण, दावीदाचा भाऊ शिमा याचा मुलगा योनादाब राजाला म्हणाला, “सर्व मुले गेली असे समजू नकोस. फक्त अम्नोन मरण पावला आहे. अम्नोनने तामार या आपल्या बहिणीवर बलात्कार केला तेव्हा पासूनच अबशालोमच्या डोक्यात ही योजना तयार होत होती.
  • 33 स्वामी, सर्व मुले मरण पावली असे कृपा करुन समजू नका. फक्त अम्नोन गेला.”
  • 34 अबशालोमने पळ काढला नगराच्या वेशीवर एक पहारेकरी उभा होता. त्याने डोंगरापलीकडून बऱ्याच लोकांना येताना पाहिले.
  • 35 तेव्हा योनादाब राजाला म्हणाला, “बघा, मी म्हटले ते खरे आहे की नाही? हे पाहा राजपुत्र येत आहेत.”
  • 36 योनादाबचे बोलणे संपत आले तोच राजपुत्र समोर आले. ते सुध्दा मोठ्याने आक्रोश करत होते. दावीद आणि त्याचे आधिकारीही शोक करु लागले. रडण्याचा हलकल्लोळ उडाला.
  • 37 दावीद अम्नोनसाठी रोज अश्रू ढाळे.अम्मीहूरचा मुलगा तलमय गशूरचा राजा होता. अबशालोम त्याच्याकडे आश्रयाला आला.
  • 38 गशूर येथे तो तीन वर्षे राहिला.
  • 39 राजा दावीद अम्नोनच्या दु:खातून सावरला. पण अबशालोमच्या आठवणीने तो व्याकुळ होत असे.