wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


2 शमुवेल धडा 20
  • 1 शबा नावाचा एक माणूस तेथे होता. हा बिक्रीचा मुलगा. बन्यामीन घराण्यातील हा शबी अगदी कुचकामी पण खोडसाळ प्रवृत्तीचा होता. त्याने एकदा रणशिंग फुंकले आणि लोकांना गोेळा केले आणि त्यांना म्हणाला,“दावीदाकडे आपला भाग नाही. या इशायच्या मुलात आपला वाटा नाही इस्राएलींनो, चला आपापल्या डेऱ्यात परत.”
  • 2 हे ऐकून सर्व इस्राएल लोक दावीदाला सोडून बिक्रीचा मुलगा शबा याच्या मागे गेले. पण यहूदी लोक मात्र यार्देन नदीपासून यरुशलेमपर्यंत राजाच्या पाठीशी राहिले.
  • 3 दावीद यरुशलेममधील आपल्या घरी परतला. आपल्या दहा दासींना त्याने घराच्या निगराणीसाठी मागे ठेवले होते. त्यांना त्याने एका खास घरांतठेवले. त्यांच्यावर पहारा ठेवला. मरेपर्यंत या बायका तेथेच राहिल्या दावीदाने त्यांच्या उदरनिर्वाहाची सगळी नीट व्यवस्था केली पण पुन्हा त्यांच्याशी संबंध ठेवले नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांची स्थिती विधवेसारखी होती.
  • 4 राजा अमासाला म्हणाला, “यहूदाच्या लोकांना तीन दिवसात येऊन मला भेटायला सांग. त्यावेळी तूही बरोबर राहा.”
  • 5 तेव्हा अमासा यहूदांना बोलवून आणायला रवाना झाला. पण राजाने सांगितल्यापेक्षा जास्त वेळ लागला.
  • 6 दावीद अबीशयला म्हणाला, “अबशालोमपेक्षाही हा बिक्रीचा मुलगा शबा आपल्या दृष्टीने धोकादायक आहे. तेव्हा माझ्या हाताखालच्यांना घेऊन त्याचा पाठलाग कर. तटबंदी असलेल्या नगरात तो जायच्या आधीच त्याला गाठायला हवे. एकदा तो मजबूत बंदोबस्त असलेल्या नगरात शिरला की त्याला पकडणे अवघड जाईल.”
  • 7 तेव्हा यवाब, बिक्रीचा मुलगा शबा याच्या पाठलागासाठी यरुशलेमहून निघाला. त्याने बरोबर आपली माणसे, करेथी, पलेथी तसेच इतर सैनिक घेतले.
  • 8 यवाब आणि त्याचे सैन्य गिबोनजवळच्या मोठ्या पहाडाशी आले तेव्हा अमासा त्यांना सामोरा आला. यवाबाच्या अंगावर चिलखत होते. त्याने कमरबंद बांधला होता आणि म्यानात तलवार होती. यवाब आमासाच्या दिशेने चालू लागला तेव्हा त्याची तलवार म्यानातून निसटून पडली. यवाबाने ती उचलली आणि हातात धरली.
  • 9 त्याने अमासाला विचारले, “तुझे सर्व कुशल आहेना?”आणि अमासाचे चुंबन घेण्यास यवाबाने आपला उजव्या हाताने अमासाची दाढी धरुन त्याला पुढे खेचले.
  • 10 यवाबाच्या डाव्या हातातील तलवारीकडे अमासाचे लक्ष नव्हते. पण तेवढ्यात यवाबाने अमासाच्या पोटात तलवार खुपसली, आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. यवाबाला पुन्हा वार करावा लागलाच नाही. अमासा गतप्राण झाला.यवाब आणि त्याचा भाऊ अबीशय यांनी बिक्रीचा मुलगा शबा याचा शोध चालूच ठेवला.
  • 11 यवाबाच्या सैन्यातील एक तरुण सैनिक अमासाच्या मृतदेहाजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “यवाब आणि दावीदाला ज्यांचा पाठिंबा आहे त्यांनी यवाबामागे जावे.”
  • 12 अमासा रस्त्याच्या मध्याभागी सक्ताच्या थारोळ्यात पडला होता. येणारा जाणारा प्रत्येकजण थांबून हे दृष्य पाहतोय हे त्या तरुण सैनिकाच्या लक्षात आले. तेव्हा त्याने ते प्रेत रस्त्यावरुन ढकलत शेतात नेऊन टाकले. त्याच्यावर एक कापड अंथरले.
  • 13 अमासाचा देह तिथून हलवल्यावर लोक ते सरळ ओलांडून यवाबाच्या मागे चालू लागले. मग त्यांनी यवाबाबरोबर शबाचा पाठलाग सुरु केला.
  • 14 इस्राएलांच्या सर्व वंशांमधून जात शबा आबेल व बेथ माका येथे गेला. सर्व बेरीही एकत्र येऊन शबाला मिळाले.
  • 15 यवाब आपल्या माणसांसहित आबेल बेथ माका येथे पोचला. त्याच्या सैन्याने नगराला वेढा दिला. तटबंदीभोवती त्यांनी माती कचऱ्याचा ढीग रचला. त्याच्यावरुन भिंत पार करणे त्यांना सोयीस्कर ठरले असते. त्याचबरोबर त्यांनी भिंत पाडण्यासाठी भिंतीतील दगड फोडायला सुरुवात केली.
  • 16 नगरात एक चाणाक्ष बाई राहात होती. तिने नगरातून मोठ्याने ओरडून सांगितले, “माझे ऐका. यवाबाला येथे यायला सांगा. मला त्याच्याशी काही बोलायचे आहे.”
  • 17 यवाब तिच्याशी बोलायला गेला. तिने त्याला तूच यवाब का म्हणून विचारले.यवाबाने होकार भरला. तेव्हा ती म्हणाली, “माझे ऐक.” यवाब म्हणाला, “सांग मी ऐकतोय.”
  • 18 मग ती बाई म्हणाली, “पूर्वी लोक म्हणत गरज पडली की आबेलमध्ये यावे म्हणजे मागाल ते मिळते.
  • 19 इस्राएलमधील शांतताप्रिय, विश्वासू लोकांपैकी मी एक आहे. इस्राएलच्या एका महत्वाच्या शहराची तुम्ही नासधूस करत आहात. परमेश्वराच्या मालकीच्या वस्तुची तुम्ही मोडतोड का करता?”
  • 20 यवाब म्हणाला, “मला कशाचाच नाश करायची इच्छा नाही. तुमच्या नगराची नासधूस मी करु इच्छित नाही.
  • 21 पण एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शबा नावाचा एक माणूस तुमच्या नगरात आहे. दावीद राजाविरुध्द त्याने बंड केले आहे. त्याला माझ्यापुढे हजर केलेत तर नगराला धक्कालावणार नाही.”तेव्हा ती बाई यवाबाला म्हणाली, “ठीक आहे. त्याचे मुंडके भिंतीवरुन तुझ्याकडे टाकण्यात येईल.”
  • 22 मग तिने गावातील लोकांना शहाणपणाने आपले म्हणणे पटवून दिले. तेव्हा लोकांना शबाचे मुंडके धडावेगळे करुन ते यवाबाकडे तटबंदी पलीकडे फेकले.यवाबाने रणशिंग फुंकले आणि सैन्याने नगर सोडले. जो तो आपल्या घरी परतला आणि यवाब यरुशलेम येथे राजाकडे आला.
  • 23 यवाब इस्राएलचा सेनापती होता. यहोयादचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता.
  • 24 अदोराम हा कष्टकरीलोकांचा प्रमुख होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस होता.
  • 25 शवा कार्यवाह होता. सादोक आणि अब्याथार हे याजक होते.
  • 26 आणि याईरी ईरा हा दावीदाचा मुख्य सेवक होता.