wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


2 शमुवेल धडा 24
  • 1 इस्राएलवर परमेश्वराचा पुन्हा एकदा कोप झाला. आणि त्याने दावीदाला इस्राएलांविरुध्द चेतवले. दावीद म्हणाला, “आधी इस्राएल आणि यहूदा यांची शिरगणती करा.”
  • 2 राजा दावीद सेनापती यवाबाला म्हणाला, “दानपासून बैरशेबापर्यंत इस्राएलच्या झाडून सर्व वंशातील लोकांची मोजदाद करा. म्हणजे मग मला लोकसंख्या किती आहे ते कळेल.”
  • 3 पण यवाब राजाला म्हणाल. “आपले लोक कितीही असोत देव परमेश्वर त्यांना शतगुणित करो. तुम्हाला हे सर्व पाहायला मिळो पण तुम्हाला असे का करावेसे वाटते?”
  • 4 पण राजा दावीदाचे शब्द यवाबाच्या शब्दांपेक्षा प्रभावी ठरले आणि त्यांनी यवाबाला आणि इतर सैन्याधिकाऱ्यांना इस्राएल प्रजेची मोजदाद करण्यास सांगितले. तेव्हा ते सर्व या कामाला लागले.
  • 5 यार्देन ओलांडून त्यांनी आरोएर येथे तळ दिला. ही जागा नगराच्या उजवीकडे होती. (नगर याजेरच्या वाटेवर, गादच्या खोऱ्याच्या मध्यावर आहे.)
  • 6 तेथून ते गिलादला आणि पुढे तहतीम होदशी या प्रदेशात गेले. दान्यात आणि तिथून वळसा घेऊन सीदोन येथे गेले.
  • 7 सोर (तायर) हा गड आणि हिव्वी व कनानी यांची नगरे इकडे ते गेले. तेथून यहूदा देशाच्या दक्षिण दिशेला बैर-शेबा इथपर्यंत गेले.
  • 8 सगळा पालथा घालून ते नऊ महिने वीस दिवसांनी यरुशलेम येथे पोचले.
  • 9 यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली. इस्राएलमध्ये तलवारधारी पुरुष आठ लक्ष होते. यहूदात ही संख्या पाच लक्ष होती.
  • 10 हे काम पार पाडल्यावर मात्र दावीदाला मनोमन लाज वाटली. तो परमेश्वराला म्हणाला, “माझ्याहातून हे मोठे पाप घडले आहे. या माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर. माझा हा मोठाच मूर्खपणा झाला आहे.”
  • 11 दावीद सकाळी उठला तेव्हा दावीदाचा संदेष्टा गाद याला देववाणी ऐकू आली.
  • 12 परमेश्वर त्याला म्हणाला, “दावीदाला जाऊन सांग, “परमेश्वर म्हणतो, तुझ्यापुढे मी तीन गोष्टी ठेवतो त्यापैकी एकीची निवड कर.”’
  • 13 गादने दावीदाकडे येऊन त्याला हे सर्व सांगितले. तो दावीदाला म्हणाला, “तिन्हीपैकी एकीची निवड कर. तुझ्या देशात सात वर्षे दुष्काळ पडावा, किंवा शत्रूंनी तीन महिने तुझा पाठलाग करावा की तीन दिवस रोगराई पसरावी? विचार कर आणि मी परमेश्वराला काय सांगावे ते सांग.”
  • 14 दावीद गादला म्हणाला, “मी पेचात सापडलो आहे खरा! पण परमेश्वर दयाळू आहे. परमेश्वरच मला शिक्षा देवो. लोकांच्या हाती मी पडू नये.”
  • 15 तेव्हा परमेश्वराने इस्राएलवर रोगराई ओढवू दिली. सकाळी तिची सुरुवात होऊन नेमलेल्या काळपर्यंत ती राहिली. दान पासून बैरशेबापर्यंत सत्तर हजार माणसे मृत्युमुखी पडली.
  • 16 यरुशलेमच्या संहारासाठी देवदूताचा हात उंचावला पण झाल्या गोष्टीबद्दल परमेश्वराला फार वाईट वाटले. लोकांचा संहार करणाऱ्या देवदूताला परमेश्वर म्हणाला, “आता पुरे तुझा हात खाली घे.” तेव्हा हा देवदूत अरवना यबूसी याच्या खळ्याजवळ होता.
  • 17 लोकांना मारणाऱ्या देवदूताला दावीदाने पाहिले. दावीद परमेश्वराला म्हणाला, “माझे चुकले माझ्या हातून पाप घडले आहे. पण हे लोक मेंढरांसारखे माझ्या मागून आले. त्यांचे काहीच चुकले नाही. तेव्हा तू मला आणि माझ्या कुटुंबियांना शिक्षा कर.”
  • 18 त्या दिवशी गाद दावीद कडे आला. तो म्हणाला, “अरवना यबूसीच्या खळ्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांध”
  • 19 दावीदाने मग परमेश्वराच्या इच्छेनुसार गादच्या म्हणण्याप्रमाणे केले. तो अरवनाला भेटायला गेला.
  • 20 अरवनाने राजाला आणि त्याच्या सेवकांना येताना पाहिले. त्याने पुढे होऊन जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला.
  • 21 अरवना म्हणाला, “माझे स्वामी का बरे आले आहेत?”दावीद म्हणाला, “तुझे खळे विकत घ्यायला. म्हणजे मग मी परमेश्वरा प्रीत्यर्थ इथे एक वेदी बांधीन. मग रोगराई संपुष्टात येईल.”
  • 22 अरवना म्हणाला, “स्वामीनी मनाला येईल ते अर्पण करण्यासाठी घ्यावे. होमबलीसाठी हे बैल आहेत. इंधनासाठी मळणीची औते आणि बैलांचे सामान आहे.
  • 23 महाराज, हवे ते मी तुम्हाला देईन.” महराजांवर परमेश्वराची मर्जी असावी अशीही कामना त्याने पुढे व्यक्त केली.
  • 24 पण राजा अरवनाला म्हणाला, “नाही, तुला मी खरे सांगतो, मी ही जमीन विकतच घेणार आहे. फुकटात मिळालेले मी होमबली म्हणून परमेश्वर देवाला अर्पण करणार नाही.”तेव्हा दावीदाने खळे आणि बैल पन्नास शेकेल चांदी देऊन विकत घेतले.
  • 25 मग तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली. होमबली आणि शांत्यार्पणे केली.परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. इस्राएलवरील रोगराई परमेश्वराने संपुष्टात आणली.