wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


आमोस धडा 9
  • 1 मी प्रभूला वेदीजवळ उभे असल्याचे पाहिले तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यावर मार मग इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल. खांब लोकांच्या डोक्यावर पाड. कोणी जिवंत राहिल्यास, मी त्याला तलवारीने ठार मारीन. एखादा पळून जाईल, पण सुटणार नाही. लोकांपैकी एकही सुटून पळू शकणार नाही.
  • 2 त्यांनी जमिनीत खोल खणले, मी त्यांना तेथून ओढून काढीन. ते आकाशात उंच गेले, तरी मी त्यांना तेथून खाली आणीन.
  • 3 ते जरी कर्मेल पर्वताच्या लपले, तरी तेथून मी त्यांना शोधून काढीन. व तेथून उचलून घेईन. जर त्यांनी माझ्यापासून लपण्यासाठी समुद्राचा तळ गाठला, तर मी सापाला आज्ञा करीन. व तो त्यांना चावेल.”
  • 4 जर ते पकडले गेले. आणि त्यांचे शत्रू त्यांना घेऊन गेले. तर मी तलवारीला आज्ञा करीन. आणि ती त्यांना तेथे ठार मारील. मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन हे खरे, पण त्यांना त्रास कसा होईल हे मी पाहीन. त्यांचे भले कसे होईल, हे मी पाहणार नाही.”
  • 5 माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेशवर, जमिनीला स्पर्श करील आणि ती वितळेल. मग देशात राहणारे सर्व लोक मृतांसाठी शोक करतील मिसरमधील नील नदीप्रमाणे भूमीवर उठेल व खाली पडेल.
  • 6 आकाशाच्यावर परमेश्वराने माड्या बांधल्या. तो त्याचे आकाश पृथ्वीवर ठेवतो. तो समुद्राच्या पाण्याला बोलवितो. आणि पावसाच्या रूपात जमिनीवर ओततो. त्याचे नाव याव्हेआहे.
  • 7 परमेश्वर असे म्हणतो: “इस्राएल, तू मला कूशी लोकांप्रमाणे आहेस. मी इस्राएलला मिसर देशातून बाहेर आणले. पलिष्ट्यांना मी कफतोरमधून आणि अरामींना कीर मधून आणले.”
  • 8 परमेश्वर, माझा प्रभू, पापी राज्यावर (इस्राएलवर) लक्ष ठेवीत आहे. परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलला पृथ्वीतळावरून पुसून टाकीन. पण याकोबच्या घराण्याचा मी संपूर्ण नाश करणार नाही.
  • 9 इस्राएल राष्ट्रांच्या नाशाची आज्ञा मी देत आहे. सर्व राष्ट्रांमध्ये मी इस्राएलच्या लोकांना पांगवीन. पण पीठ चाळण्यासारखे ते असेल. चाळणीतील पीठ हलविल्यावर, चांगले पीठ खाली पडते. व चाळ चाळणीतच राहते. याकोबच्या घराण्याचे तसेच होईल.
  • 10 माझ्या लोकांतील पापी म्हणतात, “आमचे काही वाईट होणार नाही.’ पण त्या सर्वांना तलवारीने ठार मारले जाईल.”
  • 11 दाविदचा तंबू पडला आहे. पण त्या वेळी, मी तो तंबू पुन्हा उभारीन. मी भिंतींतील भगदाडे बुजवीन. उद्ध्वस्त झोलेल्या वास्तू मी पुन्हा बांधीन. मी त्या पूर्वाे होत्या, तशाच बांधीन.
  • 12 मग अदोममध्ये जिवंत असलेले लोक आणि माझे नाव लावणारे लोक परमेश्वराकडे मदतीच्या आशेने पाहतील.” परमेश्वर असे म्हणाला व तो तसेच घडवून आणील.
  • 13 परमेश्वर म्हणतो, “असे दिवस येत आहेत की नांगरणी करणारा कापणी करणाऱ्याला, द्राक्षे तुडविणारा द्राक्षे तोडणाऱ्याला, गाठील. टेकड्यां-डोंगरांतून गोड द्राक्षरस ओतला जाईल,
  • 14 मी माझ्या लोकांना, इस्राएलला, कैदेतून सोडवून परत आणीन. ते उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा वसवतील. आणि त्यांत वस्ती करतील. ते द्राक्षांचे मळे लावतील. आणि त्यापासून मिळणारा द्राक्षरस पितील. ते बागा लावतील. व त्यापासून मिळणारे पीक खातील.
  • 15 मी माझ्या लोकांना त्यांच्या देशात रुजवीन. आणि मी त्यांना दिलेल्या भूमीतून ते पून्हा उपटले जाणार नाहीत. परमेश्वराने, तुमच्या परमेश्वराने, हे सांगितले आहे.