wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


अनुवाद धडा 7
  • 1 “जो देश वतन करुन घ्यायला तुम्ही निघाला आहात तेथे तुमचा देव परमेश्वर तुम्हाला नेईल. आणि हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य अशा सात राष्ट्रांना तेथून घालवून देईल.
  • 2 तुमचा देव परमेश्वर त्यांना तुमच्या अधिपत्याखाली आणेल आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ विध्वंस करा. त्यांच्याशी कुठलाही करार करु नका. त्यांना दया दाखवू नका.
  • 3 त्यांच्याशी सोयरीक जुळवू नका. आपल्या मुली त्यांना देऊ नका. त्याच्या मुली आपल्या मुलांना करुन घेऊ नका.
  • 4 कारण हे लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलीत करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजनपूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल व तो तात्काळ तुमचा नाश करील.खोट्या देवांचा नाश करा
  • 5 “त्या देशात तुम्ही असे करा. त्यांच्या वेद्या पाडून टाका. त्यांचे स्मारकस्तंभ फोडून टाका. अशेरा दैवताचे स्तंभउपटून टाका, मूर्ती जाळून टाका.
  • 6 कारण तुम्ही परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमचीच निवड केली आहे.
  • 7 परमेश्वराने प्रेमाने तुम्हालाच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे. उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता.
  • 8 पण सर्व सामर्थ्यानिशी तुम्हाला दास्यातून मुक्त करुन परमेश्वराने तुम्हाला मिसर बाहेर आणले, फारोच्या अंमलातून सुटका केली. याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमच्या पूर्वजांना दिलेले वचन त्याला पाळायचे होते.
  • 9 “तेव्हा लक्षात ठेवा तुमचा देव परमेश्वर हाच एक देव आहे. त्यावर विश्वास ठेवा. तो आपला करार पाळतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पुढच्या हजार पिढ्यांवर तो दया करतो.
  • 10 पण त्याचा द्वेष करणाऱ्यांना तो शासन करतो. तो त्यांचा नाश करील. त्याचा द्वेष करणाऱ्यांना शासन करण्यास तो विलंब करणार नाही.
  • 11 जेव्हा ज्या आज्ञा व विधी, नियम आज मी सांगितले त्यांचे काळजीपूर्वक पालन करा.
  • 12 “हे नियम तुम्ही नीट ऐकून त्यांचे काटेकोर पालन केलेत तर तुमच्या पूर्वजांशी केलेला प्रेमाचा पवित्र करार तो पाळेल.
  • 13 तो तुमच्यावर प्रेम करील, तुम्हाला आशीर्वाद देईल. तुमच्या राष्ट्राची तो वाढ करील. तो तुमच्या मुलाबाळांना आर्शीवाद देईल. तुमची शेते पिके तो आशीर्वादीत करील. तो तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षारस व तेल देईल. तुमची गाया बैले, वासरे मेंढ्या व कोंकरे ह्यांना तो आशीर्वाद देईल. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशात हे सर्व आशीर्वाद तो तुम्हाला देईल.
  • 14 इतरांपेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादीत व्हाल. प्रत्येक दांपत्याला मुलंबाळं होतील. गाई वासरांना जन्म देतील.
  • 15 परमेश्वर सर्व आजार काढून टाकील. मिसर देशात तुम्हाला माहीत असलेली कोणतीही भयंकर रोगराई इथे होणार नाही. हे रोग परमेश्वर तुमच्या शत्रूंवर आणील.
  • 16 तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हाती सोपवलेल्या सर्वांचा तुम्ही पराभव करुन विध्वंस करा. त्यांच्याबाबतीत वाईट वाटून घेऊ नका. त्यांच्या दैवतांची पूजा करु नका. कारण ती दैवते म्हणजे तुम्हाला अडकवणारा सापळा आहे. त्याने तुमच्या आयुष्याचा नाश होईल.
  • 17 “हे देश आपल्यापेक्षा बलवान आहेत, त्यांना आम्ही कसे घालवून देऊ असा विचारही मनात आणू नका.
  • 18 त्यांची मुळीच भीती बाळगू नका. आपल्या परमेश्वर देवाने फारोचे आणि मिसर देशाचे काय केले ते आठवा.
  • 19 त्यांच्यावर कशी भयंकर संकटे आणली, काय चमत्कार केले हे तुम्ही पाहिलेले आहे. तुम्हाला मिसरबाहेर काढतानाचे त्याचे प्रताप व सामर्थ्य तुम्हाला माहीत आहेत. ज्या लोकांची तुम्हाला भीती वाटते आहे त्यांच्याविरुध्द तुमचा देव परमेश्वर असेच सामर्थ्य वापरील.
  • 20 “याशिवाय, जे तुमच्या तावडीतून निसटतील, लपून बसतील त्यांच्या मागावर परमेश्वर आपला देव गांधील माश्या पाटवील. त्यामुळे त्यांचाही नाश होईल.
  • 21 तेव्हा त्यांना घाबरु नका. कारण परमेश्वर आपला देव तुमच्या बरोबर आहे. तो महान आणि भययोग्य देव आहे.
  • 22 त्या राष्ट्रांना आपला देव परमेश्वर हळूहळू घालवून देईल. त्यांचा तुम्ही एकाच वेळी विध्वंस करणार नाही. कारण तसे झाले तर वन्यपशूंची संख्या प्रमाणाबाहेर वाढेल.
  • 23 पण त्या राष्ट्रांचा बिमोड करण्यात तुमचा देव परमेश्वर तुम्हाला साहाय्य करील. युद्धात त्यांच्यात गोंधळ माजवील आणि शेवटी त्यांचा नाश होईल.
  • 24 परमेश्वराच्या मदतीने तुम्ही त्यांच्या राजांचा पराभव कराल, त्यांना ठार कराल आणि जगाच्या आठवणीतूनही ते पुसले जातील. कोणीही तुम्हांला अडवू शकणार नाही. तुम्ही सर्वांचा विध्वंस कराल!
  • 25 “त्यांच्या दैवतांच्या मूर्ती तुम्ही आगीत टाकून जाळून टाका. त्या मूर्तीवरच्या चांदीसोन्याचा मोह धरु नका, ते घेऊ नका. कारण तो सापळाच आहे. त्याने तुमचे आयुष्य बरबाद होईल. परमेश्वर आपला देव मूर्तिद्वेष्टा आहे.
  • 26 त्या अमंगळ, हानिकारक मूर्ती तुम्ही घरीही आणू नका. त्यांची घृणा बाळगा आणि त्या नष्ट करुन टाका.’