wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


अनुवाद धडा 9
  • 1 “हे इस्राएलांनो ऐका, तुम्ही आज यार्देन नदी पलीकडे जाणार आहात. तुमच्यापेक्षा मोठी आणि शक्तिशाली अशी राष्ट्रे ताब्यात घेणार आहात. तेथील नगरे मोठी आहेत. त्यांची तटबंदी आकाशाला भिडलेली आहे.
  • 2 तेथील अनाकी वंशाचे लोक उंच आणि धिप्पाड आहेत. हे तुम्हाला माहीत आहेच. त्यांचा पाडाव कोणी करु शकणार नाही असे त्यांच्याबद्दल आपल्या हेरांनी म्हटलेले तुम्ही ऐकलेले आहे.
  • 3 पण तुमचा देव परमेश्वर नदी उतरुन आधी तुमच्यापुढे जाणार आहे ह्याची खात्री बाळगा. आणि विध्वंस करणाऱ्या अग्नीसारखा तो आहे. तो राष्ट्रांचा विध्वंस करील. त्या राष्ट्रांना तुमच्यापुढे नमवेल. मग तुम्ही त्यांना घालवून द्याल, त्यांचा तात्काळ पराभव कराल. हे घडणार आहे, असे परमेश्वराने वचनच दिले आहे.
  • 4 “तुमचा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुमच्यापुढून हुसकावून लावेल. पण ‘आमच्या पुण्याईमुळेच परमेश्वराने हा प्रदेश आमच्या ताब्यात दिला’ असे मनात आणू नका. कारण ते खोटे आहे. परमेश्वराने त्यांना घालवले ते त्यांच्या दुष्टपणामुळे, तुमच्या सात्विकपणामुळे नव्हे.
  • 5 तुम्ही फार चांगले आहा आणि योग्य मार्गाने जगता म्हणून तुम्ही येथे राहायला जाणार आहात असे नाही. त्यांच्या दुष्टपणामुळे तुमचा देव परमेश्वर त्यांना घालवून देत आहे आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या पूर्वजांना दिलेला शब्द तो पाळत आहे.
  • 6 तेव्हा तुमचा चांगूलपणा याला कारणीभूत नाही. उलट, खरे सांगायचे तर तुम्ही फार हटृ लोक आहात.
  • 7 “रानात असताना तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाचा कोप ओढवून घेतला होता. मिसर सोडल्या दिवसापासून ते इथे येईपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड करीत आलेले आहात.
  • 8 होरेबात तुम्ही त्याला क्रुद्ध केलेत. तेव्हाच तो तुमचा नाश करणार होता.
  • 9 त्याचे असे झाले. परमेश्वराने तुमच्याशी केलेला पवित्र करार दगडी पाट्यांवर खोदून शब्दबद्ध केला होता. त्या पाट्या आणायला मी डोंगरावर चढून गेलो. तेथे मी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री अन्नपाणी न घेता राहिलो.
  • 10 परमेश्वराने त्या पाट्या माझ्या हवाली केल्या. परमेश्वराने आपल्या हाताने त्या पाट्यांवर त्याच्या आज्ञा लिहिल्या. तुम्ही पर्वतापाशी जमलेले असताना देव अग्नीतून तुमच्याशी जे बोलला ते सर्व त्याने लिहिले
  • 11 “चाळीस दिवस, चाळीस रात्रीअखेर त्याने त्या आज्ञापटाच्या पाठ्या मला दिल्या.
  • 12 तो म्हणाला, ‘ऊठ आणि ताबडतोब खाली जा. मिसरहून तू आणलेले लोक बिघडले आहेत. इतक्यातच ते माझ्या आज्ञांपासून ढळले आहेत. त्यांनी सोने वितळवून मूर्ती केली आहे.’
  • 13 “तो असेही म्हणाला, ‘त्यांचे मी एक पाहून ठेवले आहे. ते फार हट्टी आहेत.
  • 14 त्यांची नावनिशाणीही राहणार नाही असा मला त्यांचा नाश कुरु दे. मग मी तुझे, त्यांचाहून श्रेष्ठ आणि समर्थ असे दुसरे राष्ट्र उभारीन.’
  • 15 “मग मी मागे फिरुन डोंगर उतरुन आलो. डोंगरावर आग धगधगत होती. माझ्या हातात आज्ञापटाच्या दोन पाट्या होत्या.
  • 16 “मी पाहिले की तुमचा देव परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागून तुम्ही पाप केले होते. तुम्ही वासराची सोन्याची ओतीव मूर्ती केली होती. तुम्ही परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळण्याचे थांबविलेत!
  • 17 तेव्हा मी धरलेल्या त्या आज्ञापटाच्या पाट्या हातातून फेकून दिल्या आणि तुमच्या समोर त्यांच्या ठिकाऱ्या ठिकाऱ्या केल्या.
  • 18 मग मी परमेश्वरापुढे जमिनीवर डोके टेकून पूर्वीप्रमाणेच चाळीस दिवस अन् चाळीस रात्र पालथा पडून राहिलो. तुमच्या घोर पापामुळे मी हे केले. परमेश्वराच्या दृष्टिने तुम्ही हे फार वाईट केले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतलात.
  • 19 परमेश्वराच्या कोपाची मला भिती वाटत होती कारण संतापाच्या भरात त्याने तुमचा संहार केला असता. पण या ही वेळी परमेश्वराने माझे ऐकले.
  • 20 अहरोनला तर तो संतापाने ठारच करणार होता. पण मी त्याच्यांसाठी प्रार्थना केली.
  • 21 मग तुमचे ते पापीकृत्य-तुम्ही केलेली वासराची मूर्ती-मी आगीत जाळून टाकली. नंतर तिचे तुकडे तुकडे करुन भस्म करुन टाकले व डोंगरावरुन वाहाणाऱ्या ओढ्यात फेकून दिले.
  • 22 “नंतर तबेरा, मस्सा व किब्रोथ-हत्तव्वा येथेही तुम्ही परमेश्वराला संतप्त केलेत.
  • 23 परमेश्वराने तुम्हाला कादेश-बर्ण्या सोडण्यास सांगितले तेव्हाही तुम्ही त्याचे ऐकले नाहीत. त्याने तुम्हाला तो देत असलेला प्रदेश काबीज करायला सांगितले पण त्याचे सांगणे ऐकले नाहीत. त्याच्यावर भरवसा ठेवला नाहीत. त्याची आज्ञा पाळली नाहीत.
  • 24 जेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो तेव्हापासून तुम्ही परमेश्वराचे ऐकण्यासाठी नेहमीच नकार दिलेला आहे.
  • 25 “तेव्हा मी त्याच्या पायाशी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री पडून राहिलो. कारण तुमचा नाश करीन असे तो म्हणाला होता.
  • 26 मी त्याची विनवणी केली की हे प्रभो तुझ्या प्रजेचा नाश करु नकोस. ती तुझीच आहे. तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना मिसरमधून मुक्त करुन बाहेर आणले आहेस.
  • 27 अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुझ्या सेवकांना तू शब्द दिला आहेस तो आठव. त्यांचा ताठरपणा विसरुन जा. त्यांची पापे किंवा दुराचार यांच्याकडे दुर्लक्ष कर.
  • 28 तू त्यांना शासन केलेस तर मिसरमधील लोकं म्हणतील, ‘परमेश्वर त्यांना स्वत:च कबूल केलेल्या प्रदेशात नेऊ शकला नाही. त्यांचा तो द्वेष करत होता. म्हणून मारुन टाकण्यासाठीच त्याने त्यांना रानात आणले.’
  • 29 पण हे लोक तुझेच आहेत. तू त्यांना महासामर्थ्याने आपण होऊन मिसर मधून बाहेर आणले आहेस.