wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


अनुवाद धडा 21
  • 1 “तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात एखाद्याचा उघड्यावर खून झालेला आढळला आणि मारेकऱ्याचा पत्ता लागला नाही
  • 2 तर तुमच्यापैकी वडीलधारे आणि न्यायाधीश यांनी पुढे येऊन मृतदेहापासून सभोवर पसरलेल्या गावांचे अंतर मोजावे.
  • 3 मग जो गाव प्रेताच्या सर्वात जवळचा असेल तेथील वडिलधाऱ्यांनी आपल्या कळपातील एक गाय निवडावी. कधीही कामाला न जुंपलेली व अजून न व्यायलेली अशी ती गाय असावी.
  • 4 मग तिला वाहता झरा असलेल्या खोऱ्यांत आणावी. हे खोरे कधी पेरणी, नांगरणी न झालेले असावे. अशा ठिकाणी त्या गायीची मान कापावी.
  • 5 लेवी वंशातील याजकांनी या वेळी तिथे असावे. (आपली सेवा करुन घ्यायला आणि आपल्या वतीने लोकांना आशीर्वाद द्यायला तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांची याजक म्हणून निवड केली आहे. प्रत्येक वादात किंवा मारामारीत ते निवाडा करतील.)
  • 6 त्या खोऱ्यात, मृताच्या जवळच्या नगरातील वडील माणसांनी, गाय मारल्यावर तिच्या मानेतून वाहणाऱ्या रक्ताने आपले हात धुवावे.
  • 7 व म्हणावे ‘या व्यक्तीला आमच्या हातून मरण आले नाही. ही घटना घडताना आम्ही पाहिली नाही. परमेश्वरा तू इस्राएलाल वाचवलं आहेस.
  • 8 आम्हाला तू आपलस केल आहेस. आमचा उद्धार केला आहेस. आम्हाला शुद्ध कर. एका निरपराध व्यक्तीच्या हत्त्येबद्दल आम्हाला दोषी धरु नकोस. असे केले असता त्या निरपराध व्यक्तीच्या हत्येचे पाप या लोकांना लागणार नाही.’
  • 9 याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टिने जे योग्य ते करुन तुम्ही आपल्यामधून या पापाचा निचरा करा.
  • 10 “शत्रूशी युद्ध करायला गेल्यावर तुमचा देव परमेश्वर ह्याच्या साहाय्याने तुम्ही शत्रूला पराभूत कराल व त्याच्या सैनिकांना बंदीवान कराल.
  • 11 तेव्हा बंदिवानात एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्याशी लग्न करावे असे एखाद्याला वाटेल.
  • 12 तेव्हा त्याने तिला आपल्या घरी आणावे. तिने आपले केशवपन करावे व नखे कापावी.
  • 13 तिचे पहिले, युद्धकैदीचे द्योतक असलेले वस्त्रही काढून टाकावे. आपल्या आईवडलांपासून दुरावल्याबद्दल तिने पूर्ण महिनाभर त्याच्या घरी शोक करावा. मग त्याने तिच्याजवळ जावे. म्हणजे तो तिचा पती व ती त्याची पत्नी होईल.
  • 14 पुढे त्याला ती आवडली नाही तर त्याने घटस्फोट देऊन तिला मुक्त करावे. पण तिची विक्री करु नये. तिला गुलाम म्हणूनही त्याने वागवता कामा नये. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवला होता.
  • 15 “एखाद्याला दोन बायका असतील आणि त्याचे एकीवर दुसरीपेक्षा जास्त प्रेम असेल. दोघींना मुले असतील. पण नावडतीचा मुलगा सगळ्यात मोठा असेल.
  • 16 अशा परिस्थितीत, आपल्या मालमत्तेची वाटणी करताना ज्येष्ठ मुलाच्या वाटणीचे, आवडतीच्या मुलाला देऊ नये.
  • 17 त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्राचा नावडतीचा मुलगा असला तरी स्वीकार केला पाहिजे. तसेच आपल्या एकंदर मालमत्तेतील दुप्पट वाटा त्याला दिला पाहिजे. कारण तो ज्येष्ठ पुत्र आहे. व त्यालाच जेष्ठपणाचा हक्क आहे.
  • 18 “एखाद्याचा मुलगा हट्ठी अजिबात न ऐकणारा, आईबापांना न जुमानणारा निघतो. शिक्षा केली तरी काही फरक पडत नाही.
  • 19 अशावेळी आईवडलांनी त्याला गावच्या चावडीवर वडीलधाऱ्यांपुढे न्यावा.
  • 20 त्यांनी सांगावे की, हा उद्दाम आहे. आमचे ऐकत नाही. तसेच तो खादाड व मद्यपी आहे.
  • 21 यावर त्या गावातील माणसांनी या मुलाला दगडांनी मरेपर्यंत मारावे. असे केल्याने तुम्ही हे पाप आपल्यामधून काढून टाकाल. इस्राएलमधील इतर लोकांच्या कानावर ही गोष्ट गेली की ते घाबरुन राहतील.
  • 22 “एखाद्याचा अपराध मुत्युदंड मिळण्याइतका मोठा असेल. अशावेळी त्याच्या देहान्ता नंतर लोक त्याचे प्रेत झाडाला टांगतील.
  • 23 तेव्हा ते रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नका. त्याचदिवशी कटाक्षाने त्याचे दफन करा. कारण झाडाला टांगलेल्या त्या मृतदेहाला देवाचा शाप असतो. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेली भूमी अशी विटाळू नका.