wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


निर्गम धडा 10
  • 1 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू फारोकडे जा. त्याचे व त्याच्यसेवकांची मने मी कठीण केली आहेत. मी हे यासाठी केले आहे की मला त्यांना माझ्या चमत्कारांचे सामर्थ्य दाखवावयाचे होते.
  • 2 तसेच तुम्ही तुमच्या मुलांना व नातवंडांना मी मिसरमध्ये केलेल्या चमत्कारांचे व अद्भुत गोष्टींचे वर्णन सांगावे. मग तुम्हा सर्वांना कळेल की मी परमेश्वर आहे.”
  • 3 मग मोशे व अहरोन फारोकडे गेले. त्यांनी त्याला सांगितले, “इस्राएल लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘अजून किती दिवस तू माझे ऐकणार नाहीस? माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे.
  • 4 जर तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारशील तर उद्या मी तुझ्या देशावर टोळ धाड आणिन.
  • 5 ते टोळ सर्व जमीन झाकून टाकतील. ते इतके असतील कि तुला जमीन दिसणार नाही. गारा व पावसाच्या तडाख्यातून जे काही वाचले असेल त्याला टोळ खाऊन टाकतील. शेतातील सर्व झाडांचा पाला ते खाऊन फस्त करतील.
  • 6 ते टोळ तुझा वाडा, तुझ्या सेवकांची घरे, व मिसरमधील घरे, वाडे या सर्वात भरून जातील. तुझ्या वाडवडीलांनी आज पर्यंत पाहिले असतील त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक ते असतील. मिसरमध्ये लोकवस्ती होऊ लागली त्या काळापासून आता पर्यंत कधीही नव्हते, तेवढे अधिक ते टोळ असतील.”‘ नंतर फारो समोरून मोशे निघून गेला.
  • 7 फारोच्या सेवकांनी फारोला विचारले, “कोठवर आम्ही ह्या इस्राएल लोकांच्या सापळयात अडकून राहावे? त्यांना आपल्या देव परमेश्वराची उपासना करण्याकरिता जाऊ द्यावे जर आपण त्यांना जाऊ देणार नाही तर मग आपणास समजण्यापूर्वी मिसर देशाचा नाश होईल.”
  • 8 तेव्हा फारोने मोशे व अहरोन यांना पुन्हा बोलावून आणण्यास आपल्या काही सेवाकांना सांगितले. फारो त्यांना म्हणाला, “जा व तुमचा देव परमेश्वर याची उपासना करा. परंतु नक्की कोण कोण जाणार आहे ते मला सांगा.”
  • 9 मोशेने उत्तर दिले, “आमची तरूण व म्हातारी मंडळी यांना तसेच आम्ही आमची मुलं, आमच्या मुली, आमची शेरडेमेंढरे व गाईगुरे यांनाही आमच्या बरोबर घेऊन जाऊ; आम्ही झाडून सर्वजण जाऊ कारण परमेश्वराचा उत्सव सर्वाकरिता आहे.”
  • 10 फारो त्यांना म्हणाला, “तुम्ही व तुमची मुलेबाळे यांना मिसरमधून जाऊ देण्यापूर्वी खरेच परमेश्वर मजपासून तुमचे रक्षण करो! हे पाहा, तुम्ही काही तरी वाईट असा कट करीत आहात.
  • 11 तुमच्यातील पुरुषांनी तुमच्या परमेश्वराची उपासना करावयास जावे. आणि हीच तर तुम्ही मला विंनती केली होती. तेव्हा तुम्हा सर्वाना मी जाऊ देणार नाही.” त्यानंतर फारोने मोशे व अहरोन यांना घालवून दिले.
  • 12 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपली काठी मिसर देशावर उगार म्हणजे मग मिसरवर टोळ धाड येईल! ते टोळ मिसर देशभर पसरतील आणि पाऊस व गारा यांच्या सपाट्यातून वाचलेल्या वनस्पती खाऊन टाकतील.”
  • 13 मग मोशेने आपल्या हातातील काठी मिसर देशावर उगारली तेव्हा परमेश्वराने एक दिवसभर व रात्रभर पूर्वेकडून वारा वाहविला, तेव्हा सकाळी वाऱ्याबरोबर टोळच टोळ आले.
  • 14 ते उडत आले व अवघ्या मिसर देशभर जमिनीवर पसरले. इतके टोळ ह्यापूर्वी मिसर देशावर कधी आले नव्हते व इतके येथून पुढेही कधी येणार नाहीत.
  • 15 त्या टोळांनी सर्व जमीन झाकून टाकली, आणि त्यांच्या आकाशात उडण्यामुळे सर्व देशभर अंधार पडला. गारांच्या तडाख्यातून वाचलेल्या वनस्पती आणि झाडावरील वाचलेली फळे त्यांनी खाऊन फस्त केली; आणि मिसरमधील कुठल्याच झाडांझुडपांवर एकही पान राहिले नाही.
  • 16 फारोने तातडीने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. तो म्हणाला, “मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे.
  • 17 तेव्हा ह्या वेळी माझ्या पापंबद्दल मला क्षमा करा आणि हे मरण (टोळ) माझ्यापासून दूर करण्याकरिता परमेश्वराकडे प्रार्थना करा.”
  • 18 मोशे फारोसमोरून निघून गेला व त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.
  • 19 तेव्हा परमेश्वराने वाऱ्यात बदल केला. त्याने पश्चिमेकडून जोराचा वारा वाहविला तेव्हा त्या वाऱ्याने सर्व टोळ वाहवून तांबड्या समुद्रात टाकले. मिसरमध्ये एकही टोळ राहिला नाही.
  • 20 तरी परंतु परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले आणि त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
  • 21 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हाला चाचपडत जावे लागेल.”
  • 22 तेव्हा मोशेने तसे कले आणि अंधाऱ्याढगाने अवघ्या मिसरदेशाला तीन दिवस गडप केले.
  • 23 कोणालाही दुसरे काहीही दिसेना आणि म्हणून कोणीही उठून तीन दिवस कोठेह गेले नाही; परंतु इस्राएल लोक जेथे राहात होते त्या सर्व भागावर म्हणजे गोशेन प्रांतात सर्वत्र भरपूर प्रकाश होता.
  • 24 तेव्हा पुन्हा फारोने मोशेला बोलावले. तो म्हणाला, “तुम्ही जा व तुमच्या परमेश्वराची उपासना करा. तुम्ही तुमची मुलेबाळेही बरोबर न्या. परंतु तुमची शेरडेमेंढरे व गुरेढोरे येथेच राहिली पाहिजेत.”
  • 25 मोशे म्हणाला, “आमचेच पशू नव्हे तर तू देखील आम्हांस यज्ञपशू व होमबळी देशील; आणि त्यांचा आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याला अर्पणासाठी उपयोग करु!
  • 26 यज्ञ व होमार्पणासाठी आम्ही आमचे पशूही आमच्या बरोबर नेऊ. जनावराचा एक खूरही आम्ही मागे ठेवणार नाही. आमच्या परमेश्वराला यज्ञ व होमर्पणासाठी काय लागेल हे आता येथून आम्हाला सांगता येणार नाही; परंतु तेथे गेल्यावरच आम्हाला काय हवे व काय नको हे समजेल. म्हणून ह्या सर्वगोष्टी आम्हाला आमच्या सोबत नेल्याच पाहिजेत.”
  • 27 परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले. तेव्हा फारो इस्राएली लोकांना जाऊ देईना!
  • 28 मग फारो मोशेवर ओरडला व म्हणाला, “तू येथून चालता हो! आपले तोंड मला पुन्हा दाखवू नकोस! यानंतर तू आपले तोंड मला दाखवशील त्या दिवशी तू मरशील!”
  • 29 मोशे म्हणाला, “तू एक गोष्ट बरोबर बोललास, मी तुझे तोंड पुन्हा कधीही पाहणार नाही!”