wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


निर्गम धडा 14
  • 1 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
  • 2 “इस्राएल लोकांना असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल व (तांबडा) समुद्र यांच्यामध्ये व बालसफोना जवळ असलेल्या पी-हहीरोथ येथे तळ देऊन रात्री मुक्काम करावा.
  • 3 त्यामुळे इस्राएल लोक रानात वाट चुकले आहेत व गोंधळल्यामुळे राहण्यासाठी त्यांना जागा सापडत नाही असे फारोला वाटेल.
  • 4 मी फारोचे मन कठीण करीन व तो तुमचा पाठलाग करील परंतु मी फारो व त्याची सेना यांचा पराभव करून गौरवशाली होईन मग मिसरच्या लोकांना समजेल की मी परमेश्वर आहे.” तेव्हा इस्राएल लोकांनी देवाच्या आज्ञेप्रमाणे केले.
  • 5 इस्राएल लोक निसटून गेल्याचे फारोला समजले तेव्हा तो व त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले व आपण हे काय केले असे त्यांना वाटले. फारो म्हणाला, “आपण इस्राएली लोकांना आपल्या हातून पळून का जाऊ दिले? आता आपण आपल्या गुलामांना मुकलो आहोत!”
  • 6 तेव्हा फारोने आपला रथ तयार करण्यास सांगितले आणि आपल्या लोकांना घेऊन तो निघाला.
  • 7 त्याने सहाशे उत्तम योद्धे व सर्व रथ आपल्या बरोबर घेतले. प्रत्येक रथात एक अधिकारी होता.
  • 8 इस्राएल लोक तर मिसरहून मोठ्या अवसानाने चालले होते, परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने इस्राएल लोकांचा पाठलाग केला.
  • 9 मिसरच्या लष्करात पुष्कळ घोडेस्वार व रथ होते. त्यांनी इस्राएल लोकांचा पाठलाग करुन इस्राएलींनी लाल समुद्र व बालसफोनाच्या दरम्यान पीहहीरोथ येथे तळ दिला होता तेथे त्यांना गाठले.
  • 10 फारो व त्याचे सैन्य आपणाकडे येताना इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय घाबरले; आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करु लागले.
  • 11 ते मोशेला म्हणाले, “तू आम्हाला मिसरमधून येथे रानात मरावयास का आणले? आम्ही शांतीने मिसरमध्ये मरण पावलो असतो आणि आमच्या कबरांसाठी तेथे भरपूर जागा होती;
  • 12 असे होईल हे आम्ही तुला सांगितले होते! मिसरमध्ये आम्ही म्हणालो, ‘आमची चिंता करु नकोस; आम्ही येथेच राहून मिसरच्या लोकांची सेवाचाकरी करु;’ मिसरामधून येथे रानात येऊन मरण्यापेक्षा, आम्ही मिसरमध्ये गुलाम म्हणून राहिलो असतो तर बरे झाले असते.”
  • 13 परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थित उभे राहा आणि परमेश्वर आज तुम्हाला वाचवील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसरचे लोक तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाहीत.
  • 14 शांत राहण्यावाचून तुम्हाला काहीच करावे लागणार नाही. परमेश्वर तुमच्याकरिता त्यांच्याशी लढेल.”
  • 15 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुला माझा धावा करण्याची काही गरज नाही! इस्राएल लोकांना पुढे चालण्याची आज्ञा कर.
  • 16 तांबड्या समुद्रावर तुझ्या हातातली काठी उगार म्हणजे समुद्राचे दोन भाग होतील आणि इस्राएल लोक भर समुद्रातील कोरड्या भूमीवरून चालत जाऊन समुद्र ओलांडतील.
  • 17 मी मिसरच्या लोकांची मने कठीण केली आहेत म्हणून ते तुमचा पाठलाग करतील. परंतु फारो व त्याचे सर्व सैन्य, घोडेस्वार व रथ यांच्यापेक्षा मी अधिक सामर्थ्यवान आहे, असे माझे महात्म्य मी तुम्हाला दाखवून देईन.
  • 18 मग मिसरच्या लोकांना समजेल की मी गौरवशाली परमेश्वर आहे, फारो व त्याच्या घोडेस्वारांचा व रथांचा पराभव केल्यावर मिसरचे लोक मला मान देतील.”
  • 19 इस्राएल लोकांना घेऊन जाण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांच्या पुढे चालणारा परमेश्वराचा दूत इस्राएल लोकांच्या मागे जाऊन उभा राहिला, तेव्हा तो उंच मेघस्तंभ इस्राएल लोकांच्या आघाडीवरून त्यांच्या पिछाडीस गेला.
  • 20 अशा रीतीने तो उंच ढग मिसरचे लोक व इस्राएल लोक यांच्यामध्ये उभा राहिला; तेव्हा इस्राएल लोकांना प्रकाश मिळाला परंतु मिसरच्या लोकांभोंवती अंधार राहिला; त्यामुळे त्या रात्री मिसरचे लोक इस्राएल लोकांना गाठण्यासाठी जराही त्यांच्या जवळ जाऊ शकले नाहीत.
  • 21 मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला व परमेश्वराने पूर्वेकडून जोराचा वारा वाहावयास लाविला. तो रात्रभर वाहिला. तेव्हा समुद्र दुभंगला आणि त्यातील मार्ग वाऱ्यामुळे सुकून कोरडा झाला.
  • 22 आणि इस्राएल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंती सारखे उभे राहिले.
  • 23 त्यानंतर फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार यांनी समुद्रातून इस्राएल लोकांचा पाठलाग केला.
  • 24 तेव्हा त्या दिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्नीस्तंभातून खाली मिसरच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला.
  • 25 रथांची चाके रुतल्यामुळे रथावर ताबा ठेवणे मिसरच्या लोकांना कठीण झाले; तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “आपण येथून लवकर निघून जाऊ या! कारण परमेश्वर इस्राएलच्या बाजूने आम्हाविरुद्ध लढत आहे.”
  • 26 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी खाली पडून एकत्र होईल व ते फारोचे घोडे, रथ व स्वार यांना बुडवून टाकील.”
  • 27 म्हणून दिवस उजाडण्याच्या आत मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा पाणी पहिल्यासारखे समान पातळीवर आले; तेव्हा मिसरच्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु परमेश्वराने त्यांना पाण्यात बुडवून टाकले.
  • 28 पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे, रथ व स्वारांना गडप केले आणि इस्राएल लोकांचा पाठलाग करणाऱ्या सर्व सैन्याचा नाश झाला, त्यातले कोणीही वाचले नाही.
  • 29 परंतु इस्राएली लोक कोरड्या भूमिवरुन भरसमुद्र ओलांडून पार गेले. ते पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या हाताला भिंतीप्रमाणे उभे राहिले.
  • 30 तेव्हा अशा रीतीने त्या दिवशी परमेश्वराने मिसरच्या लोकांपासून इस्राएल लोकांना वाचविले व त्यांनी ताबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर मिसरच्या लोकांची प्रेते पडलेली पाहिली.
  • 31 तसेच परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने मिसरच्या लोकांचा पराभव केला तेही त्यांनी पाहिले; तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि त्यांनी त्याच्यावर व त्याचा सेवक मोशे याच्यावरही विश्वास ठेवला.