wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


निर्गम धडा 28
  • 1 परमेश्वर मोशेला म्हणाला, “याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी तुझा भाऊ अहरोन व त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांना इस्राएल लोकांतून वेगळे होऊन तुजकडे यावयास सांग.
  • 2 “तुझा भाऊ अहरोन याच्यासाठी विशेष वस्त्रे तयार कर त्यामुळे त्याला मान व आदर मिळेल
  • 3 ही वस्त्रे बनविणारे कारागीर इस्राएल लोकात आहेत; ही विशेष कला मीच त्यांना दिलेली आहे; ह्या वस्त्रामुळे अहरोन माझी याजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल मग त्याने याजक या नात्याने माझी सेवा करावी.
  • 4 तुझा भाऊ अहरोन व त्याची मुले ह्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून कारागिरांनी त्यांच्यासाठी ही वस्त्रे बनवावीत: न्यायाचा ऊरपट, एफोद, झगा, चौकड्याचा अंगरखा, मंदिल किंवा फेटा व कमरबंद,
  • 5 त्या कारागिरांनी सोन्याची जर आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड वापरून ही वस्त्रे तयार करावीत.
  • 6 “सोन्याची जर व निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत तसेच कातलेल्या तलम सणाचे कापड घेऊन कुशल कारागिराकडून त्यांचे एफोद तयार करुन घ्यावेत;एफोद व कमरबंद
  • 7 एफोदाच्या दोन्ही खांद्यावर दोन खांदपटृ्या असाव्यात, या खांदपट्ट्या एफोदाच्या दोन्ही कोपऱ्यांना जोडाव्यात.
  • 8 “एफोद बांधण्यासाठी कारागिरांनी फार काळजीपूर्वक एक पट्टी विणावी; ही एफोदाप्रमाणेच म्हणजे सोन्याची जर, व निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाचे सूत व कातलेल्या तलम सणाच्या कापडाने विणावी.
  • 9 “मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांच्यावर इस्राएलाच्या मुलांची बारा नांवे कोरावीत.
  • 10 एकावर सहा नांवे व दुसऱ्यावर सहा अशी त्यांच्या जन्माच्या क्रमाप्रमाणे कोरावीत.
  • 11 कोरीव काम करणारा कारागीर ज्याप्रामाणे कुशलतेने एखादी मुद्रा कोरतो त्याप्रमाणे दोन्ही रत्नावर इस्राएलाच्या मुलांची नांवे कोरावी आणि ती सोन्याच्या कोंदणात बसवावीत.
  • 12 ती दोन्ही रत्ने एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर लावावीत; परमेश्वरासमोर उभे राहताना अहरोन हा खास रत्ने जडलेला एफोद घालून जाईल आणि त्या रत्नावर कोरलेल्या नांवामुळे देवाला इस्राएल लोकांची आठवण होईल.
  • 13 एफोदावर ती रत्ने पक्की रहावीत म्हणून त्यांच्यासाठी शुद्ध सोन्याची कोंदणे बसवावीत;
  • 14 पीळ घातलेल्या दोरी सारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळया कराव्यात व त्या कोंदणात बसवाव्यात.
  • 15 “न्यायाचा ऊरपटही तयार करून घ्यावा; कुशल कारागिरांनी जसा एफोद तयार केला, तसाच तो करावा. तो सोन्याच्या जरीचा, आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा;
  • 16 तो चौरस दुमडलेला दुहेरी असावा; व त्याची लांबी व रुंदी एक एक वीत म्हणजे नऊ नऊ इंच असावी.
  • 17 त्यात सुंदर रत्ने खोचलेल्या चार रांगा असाव्यात; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
  • 18 दुसऱ्या रांगेत पाचू, नीलमणी व हिरा;
  • 19 तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्यराग;
  • 20 आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात खोचावीत.
  • 21 न्यायाच्या ऊरपटावर इस्राएलच्या प्रत्येक मुलामागे एक या प्रमाणे बारा रत्ने, प्रत्येक मुलाचे नांव कोरलेली अशी असावीत.
  • 22 “न्यायाच्या ऊरपटावर लावण्यासाठी दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळया कराव्यात.
  • 23 न्यायाच्या ऊरपटावर सोन्याच्या दोन कड्या कराव्यात; त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावाव्यात;
  • 24 ह्या दोन कड्यात पीळ घातलेल्या सोन्याच्या साखव्व्या घालाव्यात.
  • 25 पीळ घातलेल्या दोन्ही साखळयांची दुसरी टोके दोन्ही कोंदणात खोचून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या बाजूस लावाव्यात.
  • 26 सोन्याच्या आणखी दोन गोल कड्या करुन न्यायाच्या ऊरपटाच्या आतल्या दोन्ही कोपऱ्यांना एफोदाच्या बाजूला लावाव्यात.
  • 27 सोन्याच्या आणखी दोन गोल कड्या करून त्या खांदपटृ्यांखालील एफोदाच्या समोर त्याच्या जोडाजवळील पटृवर लावाव्यात.
  • 28 न्यायाच्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळया फितींनी बांधाव्यात; त्यामुळे ऊरपट एफोदाच्या घट्ट धरून राहील, घसरणार नाही.
  • 29 “अहरोन पवित्र स्थानात प्रवेश करील तेव्हा त्याच्या न्यायाच्या ऊरपटावर म्हणजे आपल्या हृदयावर त्याने इस्राएलच्या मुलांची नांवे कोरलेली असतील त्यामुळे परमेश्वराला इस्राएलच्या बारा पुत्रांची सतत आठवण राहील.
  • 30 न्यायाच्या ऊरपटात तू उरीम व थूम्मीम ठेव अहरोन परमेशवरासमोर जाईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असतील. त्यामुळे इस्राएल लोकांचा न्याय करण्याचा मार्ग तो नेहमी आपल्या हृदयावर घेऊन जाईल.
  • 31 “एफोदाबरोबर घालावयाचा झागा संपूर्ण निळया रंगाचा करावा;
  • 32 त्याच्या मध्याभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे आणि त्याच्या भोंवती कापडाचा गोट शिवावा म्हणजे झग्याचा तो भाग फाटणार नाही.
  • 33 निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडाची डाळिंबे काढून ती त्या झग्याच्या खालच्या घेराभोंवती लावावीत आणि दोन डाळिंबाच्या मधील जागेत सोन्याची घुंगरे लावावीत;
  • 34 त्यामुळे झग्याच्या घेराच्या खालच्या बाजूला एक डाळिंब व एक घुंगरु अशी क्रमावर ती असावीत.
  • 35 याजक या नात्याने माझी सेवा करताना अहरोनाने हा झगा घालावा; जेव्हा जेव्हा तो पवित्रस्थानात परमेश्वरासमोर जाईल किंवा तेथून बाहेर पडेल तेव्हा तेव्हा त्या घुंगरांचा आवाज ऐकू येईल; त्यामुळे तो मरावयाचा नाही.
  • 36 “शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि मुद्रा कोरतात त्याप्रमाणे तिच्यावर ‘परमेश्वरासाठी पवित्र’ ही अक्षरे कोरावीत.
  • 37 ही सोन्याची पट्टी अहरोनाच्या मंदिलाला (फेट्याला) समोरील बाजूस निव्व्या फितीने बांधावी;
  • 38 ती अहरोनाच्या कपाळावर सतत असावी ह्यासाठी की ज्या भेटी इस्राएल लोक परमेश्वराला अर्पण करतील त्यात जर काही दोष असेल तर तो त्याने काढावा; त्यामुळे ती दाने परमेश्वराला मान्य ठरतील व अर्पिण्यास ती पात्र होतील.
  • 39 “कातलेल्या तलम सणाच्या पांढऱ्या कापडाचा एक अंगरखा विणावा एक मंदिल-फेटा-व एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा.
  • 40 अहरोनाच्या मुलांसाठीही अंगरखे, कमरबंद व फेटे करावेत; त्यामुळे त्या मुलांचा मान व आदर राखला जाईल.
  • 41 तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्या मुलांना ही वस्त्रे घाल, त्यांच्या डोक्यावर विशेष प्रकारचे तेल ओतून त्यांना आभिषेक करून त्यांना पवित्र कर म्हणजे मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील.
  • 42 “त्यांच्यासाठी सणाच्या कापडाचे चोळणे कर म्हणजे कमरेपासून मांडीपर्यंत त्यांचे अंग झाकलेले राहील.
  • 43 आणि अहरोन व त्याचे मुलगे ज्या ज्या वेळी दर्शनमंडपात पवित्रस्थानापुढे याजक म्हणून सेवा करण्यास जातील त्या त्या वेळी त्यांनी हे चोळणे घातलेच पाहिजेत; तसे न केल्यास, दोषी ठरुन ते मरतील; अहरोनाला व त्याच्यानंतर त्याच्या वंशाला हा कायमचा नियम आहे.”