wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यहेज्केल धडा 17
  • 1 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला.
  • 2 “मानवपुत्रा, इस्राएलच्या लोकांना पुढील कहाणी सांग व त्यांना त्याचा अर्थ विचार.
  • 3 त्यांना सांग:मोठे पंख असलेला एक प्रचंड गरुड (नबुखद्नेस्सर) लबानोनला आला. त्याला खूप पिसे होती व त्यावर ठिपके होते.
  • 4 त्याने मोठ्या गंधसरुचा शेडा (लबानोन) तोडून कनानला आणला. व्यापाऱ्यांच्या गावात त्याने एक फांदी लावली.
  • 5 मग त्या गरुडाने कनानमधील काही बीज (लोक) सुपीक जमिनीत नदीकाठी पेरले.
  • 6 बीज अंकुरले आणि द्राक्षवेल तरारली. ती वेल उत्तम होती. ती उंच नव्हती, पण तिचा विस्तार मोठा होता. तिला फांद्या फुटल्या व लहान वेलीचा वाढून मोठा वेल झाला.
  • 7 मग मोठे पंख असलेल्या, दुसऱ्या मोठ्या गरुडाने हा वेल पाहिला. त्या गरुडला खूप पिसे होती. ह्या नव्या गरुडाने आपली काळजी घ्यावी, असे द्राक्षवेलीला वाटत होते. म्हणून तिने आपली मुळे गरुडाकडे वळविली. तिच्या फांद्या त्याच्या दिशेने पसरल्या. ज्या मळ्यात ती वेल लावली होती, त्या मळ्यापासून फांद्या वाढून दूर गेल्या. नव्या गरुडाने आपल्याला पाणी द्यावे असे द्राक्षवेलीला वाटले.
  • 8 ती द्राक्षवेल सुपीक मळ्यात लावली होती. तिच्या जवळपास पुष्कळ पाणी होते. तिला खूप फांद्या फुटून चांगली फळे धरु शकली असती. ती एक उत्तम वेल झाली असती.”
  • 9 परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला: “ती वेल यशस्वी होईल असे तुम्हाला वाटते का? नाही! नवा गरुड तो उपटून टाकील. पक्षी तिची मुळे तोडेल व तो सर्व द्राक्षे खाऊन टाकील. मग कोवळी पाने सुकून गळून पडतील. ती वेल सुकत जाईल. तिला मुळापासून उपटण्यास बळकट हातांची व सामर्थ्यवान राष्ट्रांची गरज लागणार नाही.
  • 10 जेथे लावली आहे तेथेच ती वेल चांगली वाढेल का? नाही! पूर्वेच्या गरम वाऱ्याने ती सुकेल व मरेल. जेथे लावली तेथेच ती मरेल.”
  • 11 परमेश्वराचा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला,
  • 12 “इस्राएलच्या लोकांना ह्या गोष्टीचा अर्थ समजावून सांग. ते नेहमीच माझ्याविरुद्ध जातात. त्यांना पुढील गोष्टी सांग. पहिला गरुड म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होय. तो यरुशलेमला आला आणि त्याने राजाला व इतर नेत्यांना आपल्याबरोबर बाबेलला नेले.
  • 13 मग नबुखद्नेस्सरने राजघराण्यातील एका माणसाबरोबर करार केला. त्याने त्याच्याकडून सक्तीने वचन घेतले. त्या माणसाने नबुखद्नेस्सराशी निष्ठेन राहण्याचे वचन दिले. नबुखद्नेस्सरने मग त्याला यहूदाचा नवा राजा केला. मग त्याने यहूदातील सर्व सामर्थ्यवान पुरुषांना यहूदापासून दूर नेले.
  • 14 त्यामुळे यहूदा हे दुर्बल झाले आणि ते नबुखद्नेस्सराविरुद्ध बंड करु शकले नाही. यहूदाच्या नव्या राजाबरोबर नबुखद्नेस्सरने केलेला करार लोकांना सक्तीने पाळावा लागला.
  • 15 पण शेवटी कसेही करुन ह्या नव्या राजाने नबुखद्नेस्सराविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केलाच. त्याने आपले दूत पाठवून मिसरकडे मदत मागितली त्यांना पुष्कळ घोडे व सैनिक मागितले. यहूदाचा नवा राजा ह्यात यशस्वी होईल, असे तुम्हाला वाटते का? नव्या राजाकडे करार मोडून शिक्षेतून सुटका करुन घेण्याइतके सामर्थ्य आहे, असे तुम्हाला वाटते का?”
  • 16 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी माझ्या प्राणाची शपथ घेऊन सांगतो की नवा राजा बाबेलमध्येच मरेल. नबुखद्नेस्सरने ह्या माणसाला यहूदाचा नवा राजा केले. पण त्या माणसाने नबुखद्नेस्सरला दिलेले वचन मोडले. त्याने कराराकडे दुर्लक्ष केले.
  • 17 आणि मिसरचा राजा यहूदाच्या नव्या राजाचे रक्षण करु शकणार नाही. तो कदाचित् मोठे सैन्य पाठवील, पण मिसरची प्रचंड शक्ती यहूदाला वाचवू शकणार नाही. नबुखद्नेस्सरचे सैन्य नगरी हस्तगत करण्यासाठी मातीचे रस्ते व भिंती बांधील खूप लोक मरतील.
  • 18 पण यहूदाच्या राजाला पळून जाता येणार नाही. का? कारण त्याने कराराकडे दुर्लक्ष केले. नबुखद्नेस्सरला दिलेले वचन त्याने मोडले.”
  • 19 परमेश्वर, माझा प्रभू, अशी प्रतिज्ञा करतो, “माझ्या प्राणाशपथ मी यहूदाच्या राजाला शिक्षा करीन. का? कारण त्याने माझ्या ताकिदींकडे लक्ष दिले नाही. त्याने आमचा करार मोडला.
  • 20 मी सापळा रचीन व त्यात तो पकडला जाईल. मग मी त्याला बाबेलला आणून शिक्षा करीन. तो माझ्याविरुद्ध गेला म्हणून मी त्याला शिक्षा करीन.
  • 21 मी त्याच्या सैन्याचा नाश करीन. त्याचे चांगले सैनिक मी नष्ट करीन. वाचलेल्या लोकांना मी वाऱ्यावर सोडून देईन. मग तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. आणि मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या.”
  • 22 परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,“उंच गंधसरुची एक फांदी मी तोडून घेईन. शेड्याची डहाळी मी घेईन आणि मी स्वत: उंच पर्वतावर ती लावीन.
  • 23 “मी स्वत:, ती फांदी, इस्राएलच्या उंच पर्वतावर लावीन. मग त्या फांदीचा वृक्ष होईल. त्याला फांद्या फुटून फळे येतील. तो एक सुंदर गंधसरुचा वृक्ष असेल. त्याच्या फांद्यांवर खूप पक्षी बसतील. त्याच्या सावलीला खूप पक्षी राहतील.
  • 24 “मग दुसऱ्या झांडाना समजेल की मी उंच वृक्ष जमीनदोस्त करतो आणि लहान झांडांचे उंच वक्ष करतो. मीच हिरवीगार झाडे सुकवून टाकतो, व सुकलेल्या झाडांना पालवी फुटवितो. मी परमेश्वर आहे. मी बोलतो, तेच करतो.”