wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यहेज्केल धडा 39
  • 1 “मानवपुत्रा, माझ्यावतीने गोगच्याविरुद्ध बोल. त्याला, परमेश्वर, प्रभू, पुढील गोष्टी सांगतो म्हणून सांग: ‘गोग, मेशेख आणि तुबाल यांचा तू सर्वांत महत्वाचा नेता आहेस पण मी तुझ्याविरुद्ध आहे.
  • 2 मी तुला पकडून परत आणीन. अती उत्तरेकडून मी तुला परत आणीन. इस्राएलच्या पर्वंतांशी लढण्यासाठी मी तुला परत आणीन.
  • 3 पण मी तुझ्या डाव्या हातातील धनुष्य व उजव्या हातातील बाण खाली पाडीन.
  • 4 तू इस्राएलच्या पर्वतांत मारला जाशील. लढाईत तू, तुझे सैन्य आणि तुझ्याबरोबरची राष्ट्रे यांना ठार मारले जाईल. मी तुला मांसभक्षक पक्ष्यांचे व हिंस्र प्राण्याचे भक्ष्य करीन.
  • 5 तू गावात प्रवेश करणार नाहीस. मी सांगतो, बाहेरच्या मोकळ्या रानात तुला ठार मारले जाईल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
  • 6 देव म्हणाला, “मागोगमध्ये व किनाऱ्यावर सुरक्षिपणे राहणाऱ्या लोकांमध्ये मी आग लावीन. मग त्यांना ‘मी परमेश्वर आहे’ हे समजेल.
  • 7 इस्राएलच्या माझ्या लोकांना मी माझे पवित्र नाव माहीत करुन देईन. यापुढे मी लोकांना माझ्या पवित्र नावाला बट्टा लावू देणार नाही. राष्ट्रांना कळेल की मीच परमेश्वर आहे, मीच इस्राएलमधील एकमेव पवित्र आहे.
  • 8 ती वेळ येत आहे! ते घडेलच!” परमेश्वर असे म्हणाला, “त्याच दिवसाबद्दल मी बोलत आहे.”
  • 9 “तेव्हा इस्राएलच्या गावांत राहणारे लोक त्या रानांत जातील. ते शत्रूची शस्त्रे गोळा करुन जाळतील. ते सर्व ढाली, धनुष्य बाण, दंड व भाले जाळतील. ते ह्या शस्त्रांचा उपयोग सरपण म्हणून सात वर्षे करतील.
  • 10 त्यामुळे त्यांना सरपण गोळा करावे लागणार नाही वा जंगलांत लाकडे तोडावी लागणार नाहीत. कारण ते शस्त्रांचा उपयोग सरपणाप्रमाणे करतील. त्यांना लुटू पाहणाऱ्या सैनिकांकडूनच ते मौल्यवान वस्तू काढून घेतील. त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी बळकावू पाहणाऱ्या सैनिकांकडूनच ते अशा गोष्टी घेतील.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
  • 11 देव म्हणाला, “तेव्हा मी गोगला पुरण्यासाठी इस्राएलमधील एक जागा निवडीन. मृत समुद्राच्या पूर्वेकडील, वाटसरुंच्या दरीत गोगला पुरले जाईल. मग प्रवाशांचा रस्ता अडेल. का? कारण त्या ठिकाणी गोग व त्याच्या सैन्याला पुरले जाईल. लोक त्या जागेला ‘गोगच्या सैन्याची दरी’ असे म्हणतील.
  • 12 भूमी शुद्ध करण्यासाठी, इस्राएलच्या लोकांना, सात महिने त्यांना पुरावे लागेल.
  • 13 सामान्य लोक त्या शत्रू सैनिकांना पुरतील. मी ज्या दिवशी गौरविला जाईन, त्या दिवशी इस्राएलच्या लोकांची कीर्ती होईल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
  • 14 देव म्हणाला, “त्या मेलेल्या सैनिकांना पुरण्यासाठी, कामगारांना, पूर्ण वेळचे काम द्यावे लागेल. अशा रीतीने, ते देशाला शुद्ध करतील. त्या कामगारांना सात महिने काम करावे लागेल. ते भोवताली प्रेतांचा शोध घेतील.
  • 15 ते सभोवती पाहात जातील. त्यांच्यातील एखाद्याला एखादे हाड दिसताच, तो तेथे खूण करुन ठेवेल. कबर खणणारे येऊन त्या हाडाला गोगच्या सैन्याच्या दरीत पुरेपर्यंत ती खूण तेथेच राहील.
  • 16 मृतांच्या त्या गावाला हमोनाअसे नाव दिले जाईल. अशा प्रकारे ते देश शुद्ध करतील.”
  • 17 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “मानवपुत्रा माझ्यावतीने सर्व पक्ष्यांशी व हिंस्र प्राण्याशी बोल. त्यांना सांग ‘इकडे या! भोवताली गोळा व्हा. मी तुमच्यासाठी देत असलेला बळी खा. इस्राएलच्या पर्वतांवर फार मोठा बळी दिला जाईल. या मांस खा व रक्त प्या.
  • 18 शक्तिशाली सैनिकांचे मांस तुम्ही खाल. जागातिक नेत्यांचे रक्त तुम्ही प्याल. ते एडके, मेंढ्या, बोकड व बाशानमधील पुष्ट बैलांसारखे आहेत.
  • 19 तुम्हाला हवी तेवढी चरबी तुम्ही खाऊ शकाल. पोट भरेपर्यंत रक्त तुम्ही प्याल. तुम्ही मी मारलेल्या बळीला खाल व त्याचे रक्त प्याल.
  • 20 माझ्या टेबलावर तुम्हाला खाण्यासाठी भरपूर मांस असेल. तेथे घोडे, सारथी, शक्तिशाली सैनिक आणि इतर लढवय्ये असतील.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
  • 21 देव म्हणाला, “मी जे केले, ते इतर राष्ट्रांना पाहू देईन. मग ती राष्ट्रे मला मान द्यायला लागतील. त्या शत्रूविरुद्ध वापरलेले माझे सामर्थ्य ते पाहतील.
  • 22 मग त्या दिवसापासून, इस्राएलच्या लोकांना मीच त्यांचा परमेश्वर देव असल्याचे समजून येईल.
  • 23 आणि इस्राएलच्या लोकांना कैदी म्हणून इतर देशांत का नेले गेले, हेही इतर राष्ट्रांना कळेल. त्यांना समजेल की माझी माणसेच माझ्याविरुद्ध गेली म्हणून मी त्यांच्याकडे पाठ फिरविली. त्यांच्या शत्रूंना त्यांचा पराभव करु दिला म्हणून माझे लोक लढाईत मारले गेले.
  • 24 त्यांनी पाप केले व स्वत:ला अमंगळ करुन घेतले म्हणून त्यांनी केलेल्या कर्माबद्दल मी त्यांना शिक्षा केली. मी त्यांच्याकडे पाठ फिरविली आणि त्यांना मदत करण्याचे नाकारले.”
  • 25 म्हणून परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “याकोबच्या लोकांना कैदेतून परत आणीन. इस्राएलच्या सर्व लोकांवर मी दया करीन. माझ्या पवित्र नावाबद्दल आवेशाने भावना प्रकट करीन.
  • 26 पूर्वी माझ्या विरुद्ध केलेल्या दुष्टाव्याची लोकांना लाज वाटेल. ते माझ्याविरुद्ध गेले ते सर्व विसरतील. ते त्यांच्या देशात सुरक्षितपणे राहतील. त्यांना कोणीही घाबरविणार नाही.
  • 27 इतर देशांतून मी माझ्या माणसांना परत आणीन. त्यांच्या शत्रूंच्या देशांतून त्यांना गोळा करीन. मग मी किती पवित्र आहे ते इतर पुष्कळ राष्ट्रांना कळेल.
  • 28 त्यांना कळेल की मीच त्यांचा परमेश्वर आहे. का? कारण मीच त्यांना कैदी म्हणून दुसऱ्या देशांत जायला भाग पाडले आणि मीच त्याना एकत्र गोळा करुन त्यांच्या देशात परत आणले.
  • 29 इस्राएलच्या लोकांमध्ये मी माझा आत्मा ओतीन आणि त्या नंतर मी कधीच माझ्या लोकांपासून दूर जाणार नाही.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.