wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


उत्पत्ति धडा 32
  • 1 याकोबानेही ते ठिकाण सोडले. तो प्रवास करीत असताना त्याला देवदूत भेटले.
  • 2 जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, “हा देवाचा तळ आहे.” म्हणून त्याने त्या जागेचे नाव ‘महनाइम’ ठेवले.
  • 3 याकोबाचा भाऊ एसाव सेइर नावाच्या देशात राहात होता. हा देश म्हणजे अदोमाचा डोंगराळ प्रांत होता. याकोबाने एसावाकडे निरोपे पाठवले.
  • 4 त्याने त्यांना सांगितले “तुम्ही या सर्व गोष्टी माझे स्वामी एसाव त्यांना सांगा, ‘आपला सेवक याकोब असे म्हणतो की आजपर्यंत अनेक वर्षे मी लाबानाकडे राहिलो;
  • 5 माझ्यापाशी पुष्कळ गाईगुरे, गाढवे, शेरडामेंढराचे कळप आणि दास व दासी आहेत. महराज, आपण आमचा स्वीकार करावा अशी विंनती करण्यासाठी मी आपणाकडे हा निरोप पाठवीत आहे.”‘
  • 6 निरोपे याकोबाकडे मागे आले आणि म्हणाले, “आम्ही आपला भाऊ एसाव याजकडे गेलो व त्यांस भेटलो तो आपणाला भेटावयास येत आहे; त्याच्या बरोबर चारशे माणसे आहेत.”
  • 7 त्या निरोपामुळे याकोब घाबरला. आपल्या जवळच्या लोकांच्या त्याने दोन टोळ्या केल्या. तसेच शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि उंट गाढवे यांच्याही त्याने दोन टोळ्या केल्या.
  • 8 त्याने विचार केला, “जर एसाव आला व त्याने एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी पळून जाईल व वाचवली जाईल.”
  • 9 याकोब म्हणाला, “माझे वडील अब्राहाम, इसहाक यांच्या देवा! परमेश्वरा! तू मला माझ्या देशात व माझ्या कुटुंबात परत येण्यास सांगितलेस; तसेच तू माझे कल्याण करशील असेही तू म्हणालास.
  • 10 तू माझ्यावर दया केली आहेस आणि माझ्या करिता अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेस हे मी जाणतो. मी पहिल्याच वेळी यार्देन नदी उतरुन प्रवास केला तेव्हा माझ्याजवळ एका काठी शिवाय माझ्या मालकीचे काहीही नव्हते; परंतु आता माझ्या मालकीच्या, भरपूर वस्तूंच्या व माणसांच्या पूर्ण दोन टोळ्या आहेत.
  • 11 मी तुझी प्रार्थना करतो की कृपाकरुन तू माझा भाऊ एसाव याच्यापासून मला वाचव; मला त्याची भीती वाटते, की तो येऊन आम्हा सर्वांस ठार मारील; मुलांच्या मातांनाही लेंकरासकट तो मारुन टाकील.
  • 12 परमेश्वरा! तू मला वचन दिलेस, ‘मी तुझे भले करीन; मी तुझी संतनी वाढवीन आणि ती समुद्राच्या वाळू इतकी करीन; त्याची गणती करता येणार नाही एवढी ती करीन.”
  • 13 त्या रात्री याकोब त्या ठिकाणी राहिला. त्याने एसावाला देणगी म्हणून देण्यासाठी काही गोष्टींची भेट तयार केली.
  • 14 त्याने दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशें मेंढ्या व वीस एडके,
  • 15 तसेच तीस साडणी व त्यांची बछडी, चाळीस गाई व दहा खोंड, वीस गाढवी व दहा गाढवे घेतली व एवढ्यांचे वेगवेगळे कळप केले.
  • 16 त्याने प्रत्येक कळप एकेका नोकराच्या ताब्यात दिला; मग तो नोकरांना म्हणाला, “प्रत्येक कळप वेगळा करा आणि कळपाकळपात थोडे अंतर ठेवून माझ्यापुढे चाला.”
  • 17 याकोबाने चाकरांना आज्ञा दिल्या; जनावरांच्या पहिल्याच टोळीच्या चाकराला तो म्हणाला, “जेव्हा माझा भाऊ एसाव तुझ्याकडे येईल व विचारील, ‘ही कोणाची जनावरे आहेत? तू कोठे चाललास? तू कोणाचा नोकर आहेस?’
  • 18 तेव्हा तू त्याला असे उत्तर दे, ‘ही जनावरे आपला सेवक याकोब याच्या मालकीची आहेत. याकोबाने ही स्वामी आपल्याला भेट म्हणून पाठवली आहेत आणि याकोब आमच्या पाठोपाठ येत आहे.”
  • 19 याकोबाने दुसऱ्या तिसऱ्या आणि इतर सर्व चाकरांना अशीच आज्ञा करुन अशाच प्रकारे उत्तर देण्यास सांगितले. तो म्हणाला, “तुम्हाला जेव्हा एसाव भेटेल तेव्हा तुम्ही असेच करावे.
  • 20 तुम्ही म्हणावे, ‘ही आपणाकरिता भेट आहे आणि आपला दास याकोब आमच्या मागून येत आहे.”‘याकोबाने विचार केला, “जर मी ही माणसे भेटीसह पुढे पाठवली तर कदाचित एसाव मला क्षमा करील व माझा स्वीकार करील.”
  • 21 म्हणून त्याप्रमाणे याकोबाने भेट पुढे पाठवली परंतु तो त्या रात्री तळावरच मागे राहिला.
  • 22 मग याकोब रात्रीचाच उठला. त्याने आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि अकरा मुले यांस बरोबर घेतले आणि तो यब्बोक नदीच्या उतारापाशी नदी पार करुन गेला.
  • 23 त्याने आपल्या कुटुंबातील सर्वांस नदी पार करुन पाठवले; नंतर त्याचे जे काही होते तेही सर्व त्याने नदी प करुन पलीकडे पाठवले.
  • 24 नदी उतरुन पलीकडे जाण्यात याकोब सर्वात शेवटी होता; परंतु नदी उतरुन जाण्यापूर्वी तो अद्याप एकटाच असताना एक पुरुष आला व त्याने याकोबाशी झोंबी केली. सूर्य उगवेपर्यंत त्याने त्याच्याशी झोंबी केली
  • 25 त्या माणसाने पाहिले की आपण याकोबावर मात करुन त्याचा पराभव करु शकत नाही म्हणून त्याने याकोबाच्या जांघेस स्पर्श केला तेव्हा याकोबाचा पाय जांघेच्या सांध्यातून निखळला.
  • 26 मग तो पुरुष याकोबास म्हणाला, “आता मला जपरंतु याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिलाच पाहिजेस नाहीतर मी तुला जाऊ देणार नाही.”
  • 27 तो पुरुष त्याला म्हणाला, “तुझे नाव काय आहे?”आणि याकोब म्हणाला, “माझे नाव याकोब आहे.”
  • 28 तेव्हा तो पुरुष म्हणाला, “तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नांव इस्राएल असेल. मी हे नांव तुला देत आहे कारण तू देवाशी व माणसांशी झोंबी केली आहेस आणि तू हरला नाहीस तर जिंकलास.”
  • 29 मग याकोबाने त्याला विचारले, “कृपया तुझे नाव मला सांग.”परंतु तो पुरुष म्हणाला, “तू माझे नाव का विचारतोस?” त्यावेळी तेथेच त्या पुरुषाने याकोबाला आशीर्वाद दिला.
  • 30 म्हणून याकोबाने त्या जागेचे नाव पनीएल ठेवले. याकोब म्हणाला, “ह्या ठिकाणी मी देवाला तोंडोतोंड पाहिले आहे परंतु माझा जीव वाचवला गेला.”
  • 31 मग पनीएलाहून तो पुढे निघाला तेव्हा सूर्य उगवला. याकोब आपल्या पायामुळे लंगडत चालत होता.
  • 32 म्हणून आजपर्यंत इस्राएल लोक जनावरांच्या जांघेच्या सांध्याजवळचा स्नायू खात नाहीत कारण याच स्नायूपाशी याकोबाला दुखापत झाली होती.