wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


उत्पत्ति धडा 34
  • 1 दीना ही लेआ व याकोब यांची मुलगी होती. एके दिवशी ती त्या देशाच्या स्त्रियांना पाहाण्यास बाहेर गेली.
  • 2 तेव्हा त्या देशाचा राजा हमोर याचा मुलगा शखेम याने दीनाला पाहिले आणि तो तिला बळजबरीने घेऊन गेला व तिच्या बरोबर निजून त्याने तिला भ्रष्ट केले.
  • 3 शखेमाचे दीनावर प्रेम जडले आणि तिने त्याच्याशी लग्न करावे म्हणून त्याने तिची मनधरणी केली.
  • 4 शखेमाने आपल्या बापास सांगितले, “कृपा करुन ही मुलगी मला मिळवून द्या; मला तिच्याशी लग्न करावयाचे आहे.”
  • 5 आपल्या मुलीशी त्या मुलाने भयंकर वाईट कर्म करुन तिला भ्रष्ट केले हे याकोबास समजले परंतु त्याची सर्व मुले गुरांढोरांबरोबर रानात होते म्हणून ते घरी येईपर्यंत त्याने या बाबतीत काहीही केले नाही.
  • 6 त्याच वेळी इकडे शखेमाचा बाप हमोर संबंधीत बोलणी करण्यासाठी याकोबाकडे गेला.
  • 7 नगरात जे काही घडले त्या विषयीची बातमी याकोबाच्या मुलांनी शेतात ऐकली तेव्हा त्यांचा राग भयंकर भडकला, इतका की ते रागाने वेडे झाले, कारण याकोबाच्या मुलीशी केलेल्या वाईट कर्मामुळे शखेमाने इस्त्राएलाची अब्रू घेतली होती; म्हणून मग ते सगळे भाऊ शेतातून घरी आले.
  • 8 परंतु हमोर त्या भावांशी बोलला. तो म्हणाला, “माझा मुलगा शखेम दीनाशी लग्न करावयास फार आतुर झाला आहे.
  • 9 ह्या लग्नामुळे तुमच्या आमच्यामध्ये विशेष करार झाल्याचे दिसून येईन. मग त्यामुळे आमचे पुरुष तुमच्या स्त्रियांशी व तुमचे पुरुष आमच्या स्त्रियांशी लग्ने करु शकतील.
  • 10 तसेच त्यामुळे तुम्ही ह्याच देशात आमच्या बरोबर राहूं शकाल; येथील जमीनजुमला विकत घेऊन येथे वतन मिळविण्यास व येथेच व्यापार उदीम करण्यास तुम्हाला मोकळीक मिळेल.”
  • 11 शखेम देखील याकोबाशी व दीनाच्या भावांशी बोलला; तो म्हणाला, “कृपा करुन माझा स्वीकार करा; तुम्ही जे काही करण्यास मला सांगाल ते मी जरुर करीन;
  • 12 तुम्ही मला फक्त दीनाशी लग्न करण्यास परवानगी द्या मग तुम्हाला पाहिजे ते म्हणजे रीतीप्रमाणे बायको साठी द्यावयाचे ते किंवा तुम्ही जे काही मागाल ते मी जरुर देईन.”
  • 13 याकोबाच्या मुलांनी शखेम व त्याचा बाप यांच्याशी खोटेपणाने वागावयाचे ठरवले. आपल्या बहिणीला भ्रष्ट केल्यामुळे ते भाऊ अद्याप संतापाने वेडे झाले होते.
  • 14 तेव्हा ते भाऊ त्याला म्हणाले, “आम्ही तुला आमच्या बहिणीशी लग्न करु देणे शक्य नाही कारण अद्याप तुझी सुंता झालेली नाहीं. आमच्या बहिणीने तुझ्याशी लग्न करणे चुकीचे, अनीतीचे व कलंक लावणारे होईल;
  • 15 पण तू जर एवढी एक गोष्ट करशील तर मग आम्ही तुला तिच्याशी लग्न करु देऊ: ह्या नगरातील सगळ्या पुरुषांची आमच्या प्रमाणे सुंता झाली पाहिजे;
  • 16 मग तुमचे पुरुष आमच्या स्त्रियांशी व आमचे पुरुष तुमच्या स्त्रियांशी लग्न करु शकतील आणि मग आपण सर्व एक राष्ट्र होऊ.
  • 17 पण जर तुम्ही सुंता करावयास नकार द्याल तर मग मात्र आम्ही दीनाला घेऊन जाऊ.”
  • 18 ह्या करारामुळे हमोर व शखेम यांना फार आनंद झाला.
  • 19 दिनाच्या भावांनी जे सांगितले ते लवकर करण्यास शखेमाला तर फारच उत्साह व आनंद वाटला.शखेम त्यांच्या घराण्यात सर्वांत आदरणीय होता.
  • 20 हमोर व शखेम त्या नगरातील वेशीपाशी गेले व नगरातील लोकांशी बोलले. ते म्हणाले,
  • 21 “ह्या इस्राएल लोकांची आपल्याशी मैत्रीचे संबंध ठेवावयाची खरोखरच इच्छा आहे. त्यांना आपणामध्ये आपल्या देशात राहू द्यावे. व व्यापार करु द्यावा. त्यांनी आमच्याशी शांततेने राहावे असे आपल्यालाही वाटते; आपल्या सर्वांना पुरेल एवढा आपला देश मोठा आहे. त्यांच्या स्त्रियांशी लग्ने करण्यास आपणास मोकळीक आहे आणि आपल्या स्त्रिया त्यांना लग्नात देण्यात आपल्यालाही आनंद आहे.
  • 22 परंतु त्यांची एक अट पूर्ण करण्याचे आपण सर्वांनी कबूल केले पाहिजे; ती म्हणजे आपण सगळ्या पुरुषांनी या इस्राएल लोकांप्रमाणे सुंता करुन घेण्याचे मान्य केले पाहिजे.
  • 23 जर हे आपण करु तर मग त्यांची शेरडेमेंढरे गुरेढोरे व संपत्ती आपल्याला मिळाल्याने आपण श्रीमंत होऊ; म्हणून आपण त्यांच्याशी असा करार केला पहिजे मग ते आपल्या बरोबर येथेच वस्ती करुन राहतील.”
  • 24 तेव्हा वेशीतून येणाऱ्या सर्वांनी हे ऐकले व हमोर आणि शखेम यांचे म्हणणे मान्य केले; आणि त्यावेळी तेथील सर्व पुरुषांनी सुंता करुन घेतली.
  • 25 तीन दिवसानंतर सुंता केलेले लोक जखमांच्या वेदनांनी बेजार झालेले असताना, याकोबाची दोन मुले शिमोन व लेवी यांना माहीत होते की ते लोक आता दुर्बल व कमकुवत असणार म्हणून मग ते नगरात गेले व त्यांनी तेथील सर्व पुरुषांना ठार मारले.
  • 26 दीनाच्या त्या दोन भावांनी शिमोन आणि लेवी यांनी हमोर व त्याचा मुलगा शखेम यांनाही ठार मारले. नंतर दीनाला शखेमाच्या घरातून बाहेर काढून ते तिला घेऊन तेथून निघाले.
  • 27 नंतर याकोबाची सर्व मुले नगरात गेली आणि त्यांनी तेथील सर्व चीज वस्तू लुटल्या, कारण त्यांच्या बहिणीला शखेमाने भ्रष्ट केल्याने त्यांच्या रागाचा पारा अद्याप खूपच चढलेला होता.
  • 28 तेव्हा त्यांनी त्या लोकांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे, गाढवे इत्यादी सर्व जनावरे आणि घरातील व शेतातील सर्व वस्तू लुटल्या;
  • 29 तसेच त्यांनी तेथील लोकांच्या मालकीची धनदौलत, मालमत्ता व सर्व चीजवस्तू आणि त्यांच्या बायका व मुलेबाळे देखील घेतली.
  • 30 परंतु याकोब, शिमोन व लेवी यांना म्हणाला, “तुम्ही मला खूप त्रास देऊन संकटात टाकले आहे; आता या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी माझा द्वेष करतील व माझ्या विरुद्ध उठतील; आपण थोडकेच लोक आहोत. या देशातील सर्वलोक एकत्र होऊन आपल्या विरुद्ध जर लढावयास आले तर मग माझ्याजवळच्या आपल्या सर्वांचा माझ्याबरोबर नाश केला जाईल.”
  • 31 परंतु ते भाऊ म्हणाले, “आम्ही त्या लोकांना आमच्या बहिणीशी एखाद्या वेश्येप्रमाणे वागू द्यावे काय? नाही, कदापि नाही! त्या लोकांनी आमच्या बहिणीशी असे वागणे चुकीचे व अनीतीचे होते!”