wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


उत्पत्ति धडा 37
  • 1 याकोब कनान देशात वस्ती करुन राहिला; येथेच त्याचा बापही राहिला होता.
  • 2 याकोबाच्या वंशाचा हा वृत्तान्त आहे.योसेफ सतरा वर्षांचा उमदा तरुण होता. शेळ्यामेढ्यांचा सांभाळ करणे हे त्याचे काम होते. आपल्या भावांबरोबर (म्हणजे आपल्या बापाच्या बायका बिल्हा व जिल्पा यांच्या मुलांबरोबर) तो हे काम करीत असे; त्या भावांनी केलेल्या वाईट गोष्टीविषयी त्याने आपल्या बापाला सांगितले.
  • 3 इस्राएल (याकोब) सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने योसेफाला एक विशेष सुंदर पायघोळ झगा दिला होता.
  • 4 आपला बाप आपल्या इतर भावांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांना दिसले म्हणून ते योसेफाचा द्वेष करु लागले. यासेफाशी चांगल्या रीतीने बोलणे देखील त्यांनी सोडून दिले.
  • 5 एकदा योसेफास एक विशेष स्वप्न पडले; नंतर त्याने ते स्वप्न आपल्या भावांना सांगितले; त्यानंतर तर त्याचे भाऊ त्याचा अधिक द्वेष करु लागले.
  • 6 योसेफ, म्हणाला, “मला असे स्वप्न पडले.
  • 7 आपण सर्वजण शेतात गव्हाच्या पेंढ्या बांधण्याचे काम करीत होतो; तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुम्हा सर्वांच्या पेंढ्या तिच्या भोवती गोलाकार उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढिला खाली वाकून नमन केले.”
  • 8 हे ऐकून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “याचा अर्थ तू आमचा राजा होऊन आमच्यावर राज्य करणार असे तुला वाटते काय?” त्याच्या त्यांच्याविषयीच्या या स्वप्नामुळे तर त्याचे भाऊ आता त्याचा अधिकच द्वेष करु लागले.
  • 9 नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “मला आणखी एक स्वप्न पडले; सूर्य चंद्र व अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केलेले पाहिले.”
  • 10 योसेफाने आपल्या बापालाही या स्वप्नाविषयी सांगितले; परंतु त्याच्या बापाने त्याबद्दल टीका करुन म्हटले, “असले कसले रे स्वप्न आहे हे? तुझी आई, तुझे भाऊ व मी आम्ही भूमीपर्यंत लवून तुला नमन करु असे तुला वाटते काय?”
  • 11 योसेफाचे भाऊ त्याचा हेवा करीतच राहिले; परंतु योसेफाच्या बापाने या गोष्टी संबंधी खूप विचार केला आणि या गोष्टींचा काय अर्थ असावा या विषयी आश्चर्य करीत त्याने ते विचार आपल्या मनात ठेवले.
  • 12 एके दिवशी योसेफाचे भाऊ आपल्या बापाची मेंढरे चारावयास शखेम येथे गेले.
  • 13 याकोब योसेफाला म्हणाला, “तुझे भाऊ शखेम येथे आपल्या मेंढाराबरोबर आहेत; तू तेथे जा.”योसेफ म्हणाला, “बर, मी जातो.”
  • 14 योसेफाचा बाप म्हणाला, “शखेमाला जा; आणि तुझे भाऊ सुखरुप आहेत का?; व माझी मेंढरे ठीक आहेत का ते पाहा व मागे येऊन मला त्यांच्या संबंधी सांग.” अशा रीतीने योसेफाच्या बापाने त्याला हेब्रोन दरीतून शखेमास पाठवले.
  • 15 शखेमाजवळ योसेफ वाट चुकला; तो शेतात इकडे तिकडे भटकताना एका माणसाला आढळला त्या माणसाने त्याला विचारले, “तू कोणाला शोधत आहेस?”
  • 16 योसेफाने उत्तर दिले, “मी माझ्या भावांना शोधत आहे; आपल्या मेंढरांबरोबर ते कोठे आहेत ते आपण मला सांगू शकाल का?”
  • 17 तो माणूस म्हणाला, “ते अगोदरच येथून गेले आहेत; आपण दोथानास जाऊ असे त्यांस बोलताना मी ऐकले.” म्हणून मग योसेफ आपल्या भावांमागे गेला व ते त्याला दोथानात सांपडले.
  • 18 योसेफाच्या भावांनी योसेफाला दुरुन येताना पाहिले आणि कट करुन त्याला ठार मारण्याचे ठरवले.
  • 19 ते एकमेकांस म्हणाले, “हा पाहा, एकामागे एक स्वप्ने पडणारा योसेफ इकडे येत आहे.
  • 20 आता आपल्याला शक्य आहे तोंवर याला आपण ठार मारुन टाकावे त्याचे शरीर एका कोरड्या खाड्यात फेकून देऊ आणि त्याला कोणाएका हिंस्र पशूने मारुन टाकले असे आपल्या बापाला सांगू; मग त्याची स्वप्ने काही कामाची नाहीत हे आपण त्याला दाखवून देऊ.”
  • 21 परंतु रऊबेनास योसेफाला वाचवावयाला पाहिजे होते; म्हणून रऊबेन म्हणाला, “आपण त्याला ठार मारू नये;
  • 22 त्याला काहीही इजा न करता, त्याला आपण एखाद्या खाड्यात टाकून देऊ;” आपल्या भावांच्या हातातून सोडवून योसेफाला वाचवावयाचे व त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावयाचे असा रऊबेनाचा बेत होता.
  • 23 योसेफ त्याच्या भावजवळ येऊन पोहोंचला तेव्हा त्यांनी त्याच्यावर हल्ला केला; त्यांनी त्याचा विशेष सुंदर पायघोळ झगा फाडून टाकला.
  • 24 नंतर त्यांनी त्याला एका खोल कोरड्या खाड्यात टाकून दिले.
  • 25 योसेफ खाड्यात असताना त्याचे भाऊ भाकरी खावयास बसले. त्यांनी वर नजर करुन पाहिले तेव्हा त्यांना दुरुन एक उंटांचा तांडा दिसला; ते आपल्या, उंटांवर मसाल्याचे अनेक पदार्थ व वनस्पती इत्यादी भारी किंमतीचे पदार्थ लादून गिलादाहून मिसरकडे चालले होते.
  • 26 तेव्हा यहूदा म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारुन आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा?
  • 27 आपण त्याला जर ह्या इश्माएली व्यापाऱ्यांना विकून टाकले तर आपल्याला अधिक लाभ होईल; आणि आपल्या स्वत;च्या भावाला ठार मारल्याचा दोषही आपणावर येणार नाहीं;” इतर भावांना हे म्हणणे पटले.
  • 28 ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खाड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांस वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफास मिसर देशास घेऊन गेले.
  • 29 इतका वेळपर्यंत रऊबेन आपल्या भावाबरोबर तेथे नव्हता, म्हणून त्यांनी योसेफाला विकून टाकल्याचे त्याला माहीत नव्हते; रऊबेन त्या खाड्याकडे परत गेला तेव्हा त्यात त्याला योसेफ दिसला नाही; तेव्हा त्याला अतिशय दु:ख झाले; अतिशोकामुळे त्याने आपली वस्त्रे फाडली;
  • 30 तो शोक करीत आपल्या भावांकडे जाऊन म्हणाला, “बधूनो, आपला धाकटा भाऊ योसेफ खाड्यात नाही, हो! तर आता मी काय करु!”
  • 31 त्या भावांनी एक तरुण बकरा मारुन त्याचे रक्त योसेफाच्या सुंदर पायघोळ झग्याला लावले.
  • 32 नंतर तो रक्ताने भरलेला झगा आपल्या बापाला दाखवून ते म्हणाले, “आम्हाला हा झगा सांपडला; हा झगा योसेफाचा आहे की काय?”
  • 33 त्यांच्या बापाने तो झगा पाहिला आणि तो योसेफाचाच आहे हे ओळखले! तेव्हा त्याचा बाप म्हणाला, “होय! मुलांनो, हा त्याचाच झगा आहे! हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकले असावे. माझा मुलगा योसेफ याला हिंस्त्र पशूने खाऊन टाकले आहे यात संशय नाही.”
  • 34 याकोबाला आपल्या मुलाबद्दल अतिशय दु:ख झाले, एवढे की त्याने आपली वस्त्रे फाडली आणि कंबरेस गोणताट गुंडाळले आणि कितीतरी दिवस आपल्या मुलासाठी शोक केला.
  • 35 याकोबाच्या सर्व मुलांनी व मुलीनीं त्याचे सांत्वन करण्यास खूप प्रयत्न केला खरा परंतु तो कधीही समाधान पावला नाही; तो म्हणाला, “मी मरेपर्यंत माझ्या मुलासाठी शोक करीत राहीन व अधोलोकात माझ्या मुलाकडे जाईन.” असा त्याच्या बापाने योसेफाकरिता अतिशय शोक केला.
  • 36 त्या मिद्यानी व्यापाऱ्यांनी योसेफास मिसर देशात नेऊन पोटीफर नांवाचा फारो राजाचा अधिकारी, गारद्यांचा सरदार होता त्यास विकून टाकले.