wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


उत्पत्ति धडा 43
  • 1 त्याकाळी कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता.
  • 2 याकोबाच्या मुलांनी मिसरहून आणलेले सगळे धान्य घरातील माणसांनी खाऊन संपल्यावर याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही पुन्हा मिसरला जा व आपल्याला खाण्यासाठी आणखी धान्य विकत आणा.”
  • 3 परंतु यहूदा याकोबास म्हणाला, “त्या देशाच्या प्रमुख अधिकाऱ्याने आम्हाला ताकीद दिली; तो म्हणाला, ‘तुम्ही जर तुमच्या धाकटया भावाला तुमच्या बरोबर माझ्याकडे आणले नाही तर मी तुमच्याशी बोलणार देखील नाहीं.’
  • 4 तेव्हा तुम्ही बन्यामीनाला आमच्याबरोबर पाठवत असाल तरच आम्ही जाऊन धान्य आणू.
  • 5 पण तुम्ही बन्यामीनाला पाठवणार नाही तर मग आम्ही धान्य आणावयास जाणार नाही. तुमच्या धाकटया भावाशिवाय तुम्ही परत मागे येऊ नका असे त्या आधिकाऱ्याने आम्हास बजावून सांगितले आहे.”
  • 6 इस्राएल (याकोब) म्हणाला, “पण तुम्हाला आणखी एक भाऊ आहे असे त्या प्रमुख अधिकाऱ्याला तुम्ही का सांगितले? आणि त्यामुळे तुम्ही मला पेचात का पाडले?”
  • 7 त्या भावांनी उत्तर दिले, “त्या प्रमुख अधिकाऱ्याने आम्हा सर्वाविषयी काळजी व चिंता दाखवून मोठया प्रेमाने व कळकळीने आपल्या घरच्या सर्वाविषयी विचारपूस केली, कारण त्याला आपल्या घरच्या सर्वाविषयी माहिती करुन घ्यावयास पाहिजे होती. त्याने आम्हाला विचारले, ‘तुमचा बाप अजून जिवंत आहे का? तुमचा एखादा भाऊ सध्या घरी आहे का?’ आम्ही तर तुसती त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आम्हाला काय माहीत की तो आमच्या भावाला त्याच्याकडे घेऊन यावयास सांगेल म्हणून.”
  • 8 मग यहुदा आपल्या बापाला म्हणाला, “बाबा बन्यामीनाला माझ्याबरोबर पाठवा. मी त्याची सगळी काळजी घेईन, कारण आम्हाला धान्य आणावयास मिसराला गेलेच पाहिजे; नाही तर आपण सर्व आपल्या मुलाबाळांसकट मरुन जाऊ.
  • 9 त्याच्या सुरक्षिततेची हमी मी घेतो; तसेच त्याची सगळी जबाबदारीही मी घेतो. मी जर त्याला परत माघारी आणू शकलो नाही तर मग तुम्ही मला जन्माचा दोषी ठरवा.
  • 10 तुम्ही आम्हाला अगोदरच जाऊ दिले असते तर आतापर्यंत धान्य आणण्याच्या आमच्या दोन फेऱ्या झाल्या असत्या.”
  • 11 मग त्यांचा बाप इस्राएल म्हणाला, “हे जर अगदी खरे असेल तर मग तुम्ही बन्यामीनाला तुमच्याबरोबर घेऊन जा; परंतु त्या प्रमुख अधिकाऱ्याकरिता आपल्या देशातून आपण मिळवलेल्या काही किंमती वस्तू, काही पदार्थ म्हणजे थोडा मध, पिस्ते, बादाम, डिंक, गंधरस वगैरे देणग्या भेट म्हणून घेऊन जा.
  • 12 यावेळी दुप्पटीपेक्षा पैसा बरोबर न्या. मागच्यावेळी तुम्ही दिलेला जो पैसा तुमच्या गोण्यामधून परत आला तोही परत घेऊन जा; कारण कदाचित त्या अधिकाऱ्याकडून काही चूक झाली असेल.
  • 13 बन्यामीनाला घेऊन त्या अधिकाऱ्याकडे परत जा.
  • 14 त्या अधिकाऱ्यापुढे तुम्ही जाऊन उभे राहाल तेव्हा सर्व समर्थ देव तुम्हाला सहाय्य करो अशी मी प्रार्थना करतो; तसेच तो बन्यामीनाला व शिमोनाला सुखरुपपणे परत मागे पाठवो यासाठी ही देवाची प्रार्थना करतो. असे घडले नाही तर मग माझ्या मुलांना गमावल्याबद्दल मी शोक करीन.”
  • 15 अशा रीतीने त्या भावांनी प्रमुख अधिकाऱ्याकरिता भेट वस्तू घेतल्या व पहिल्यावेळी घेतले होते त्याच्या दुप्पट पैसे यावेळी संगती घेतले बन्यामीनाला घेऊन ते मिसर देशाला रवाना झाले.
  • 16 मिसरमध्ये त्या भावांच्याबरोबर योसेफाने बन्यामीनास पाहिले; तेव्हा योसेफ आपल्या कारभाऱ्यास म्हणाला, “या लोकांना माझ्या घरी आण. एक चांगला पोसलेला पशू मारुन भोजन तयार कर, कारण हे सर्वजण दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.”
  • 17 तेव्हा त्या कारभाऱ्याने त्याला सांगितल्याप्रमाणे भोजनाची सर्व तयारी केली. नंतर त्याने त्या सर्व भावांना योसेफाच्या घरी नेले.
  • 18 योसेफाच्या घरी नेल्यावर ते भाऊ फार घाबरले. ते म्हणाले, “मागच्या वेळी आपल्या पोत्यात आपण दिलेले पैसे परत ठेवण्यात आले म्हणून आपणास येथे आणले आहे, त्यावरुन आपणास दोषी ठरवून ते आपली गाढवे घेतील व आपल्याला गुलाम करतील असे वाटते.”
  • 19 म्हणून मग ते भाऊ योसेफाच्या कारभाऱ्याकडे गेले.
  • 20 ते म्हणाले, “महाराज, आम्ही शपथ घेऊन खरे तेच सांगतो; मागच्या वेळी आम्ही धान्य खरेदी करण्यासाठीच आलो होतो.
  • 21 आम्ही घरी परत जाताना एका मुक्कामाच्या ठिकाणी आमची पोती उघडली तेव्हा आमच्या पोत्यात पैसे कसे आले हे आम्हाला माहीत नाही. परंतु ते सगळे पैसे तुम्हाला परत देण्यासाठी आम्ही आमच्या सोबत आणले आहेत; आणि आता यावेळी आणखी धान्य विकत घेण्यासाठी अधिक पैसे आणले आहेत.”
  • 22
  • 23 परंतु योसेफाच्या घरच्या कारभाऱ्याने उत्तर दिले, “भिऊ नका; माझ्यावर विश्वास ठेवा; तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या पोत्यात देणगी म्हणून ते पैसे ठेवले असतील. मागच्या खेपेच्या धान्याचे पैसे तुम्ही मला दिले याची मला पक्की आठवण आहे.”नंतर त्या कारभाऱ्याने शिमोनाला तुरुंगातून सोडवून घरी आणले.
  • 24 मग त्या कारभाऱ्याने त्या भावांना योसेफाच्या घरी आणले; त्याने त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिले व त्यांनी पाय धुतले. मग त्याने त्यांच्या गाढवांस वैरण दिले.
  • 25 आपण योसेफासोबत भोजन करणार आहो हे त्या भावांना समजले. तेव्हा त्यांनी दुपारपर्यंत काम करुन योसेफाला देण्याच्या भेटीची तयारी केली.
  • 26 योसेफ घरी आला तेव्हा त्या भावांनी त्याच्यासाठी आपल्या सोबत आणलेली भेट अर्पण केली व त्यांनी त्याला भूमिपर्यंत लवून मुजरा केला.
  • 27 मग योसेफाने ते सर्व बरे खुशाल आहेत ना, याची विचारपूस केली. तो म्हणाला, “तुमचे म्हातारे वडील, ज्यांच्याबद्दल तुम्ही मागे मला सांगितले, ते बरे आहेत का? ते अजून जिवंत आहेत ना!”?
  • 28 त्या भावांनी उत्तर दिले, “होय महाराज! आमचे वडील सुखरुप आहेत; ते अजून जिवंत आहेत.” आणि त्यांनी पुन्हा लवून नमन केले.
  • 29 मग योसेफाने आपला सख्खा भाऊ बन्यामीन यास पाहिले. (योसेफ व बन्यामीन यांची आई एकच होती) तो म्हणाला, “तुम्ही मला ज्याच्याविषयी सांगितले तो हाच का तुमचा भाऊ?” नंतर योसेफ बन्यामीनास म्हणाला, “मुला! देव तुझ्यावर कृपा करो!”
  • 30 मग योसेफ घाईघाईने खोली बाहेर निघून गेला. आपला प्रिय भाऊ बन्यामीन याला प्रेमाने घट्ट मिठी मारावी असे त्याला फार वाटले आणि त्याला खूप रडू आले; म्हणून गुपचूप तो आपल्या खोलीत गेला व खूप रडला.
  • 31 मग तोंड धुऊन तो परत आला; मग स्वत:स सावरुन तो म्हणाला, “आता आपण भोजनास बसू या.”
  • 32 योसेफ एकटाच एका मेजावर बसला होता. त्याचे भाऊ दुसऱ्या मेजावर एकत्र बसले; मिसरचे लोक आणखी दुसऱ्या मेजावर बसले कारण इब्री लोकांबरोबर जेवणे चुकीचे आहे असे ते मानीत.
  • 33 योसेफाचे भाऊ त्याच्या समोरील मेजावर बसले. त्यांच्या बसण्याची व्यवस्था त्यांच्या ज्येष्ठतेप्रमाणे केली असल्यामुळे ते चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले.
  • 34 वाढपी, योसेफाच्या पुढच्या मेजावरील पक्वान्ने घेऊन त्यांना वाढीत होते; परंतु त्यांनी बन्यामीनास इतरापेक्षा पांचपट अधिक वाढले. ते सर्व भाऊ योसेफाबरोबर भरपूर जेवले व मनमुराद प्यायले.