wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


उत्पत्ति धडा 45
  • 1 आता मात्र अधिक वेळपर्यंत योसेफाला आपले दु:ख रोखून धरता येईना. तेव्हा तेथे हजर असलेल्या सर्व लोकां देखत तो मोठ मोठयाने रडू लागला. तो म्हणाला, “येथील इतर सर्व लोकांना येथून निघून जाण्यास सांगा.” तेव्हा तेथील सर्वजण निघून गेले; केवळ त्याचे भाऊच त्याच्यापाशी राहिले; मग योसेफाने आपली ओळख दिली.
  • 2 तो एकसारखा रडत होता. फारोच्या वाडयातील मिसरच्या लोकांनी व फारोच्या घराण्यातील लोकांनीही त्याचे रडणे ऐकले.
  • 3 मग योसेफ हूंदके देत आपल्या भावांना म्हणाला, “प्रिय भावांनो! तुमचा भाऊ योसेफ -- मीच आहे!” मग गहिंवर आवरुन योसेफ पुढे म्हणाला, “माझा बाप खुशाल आहे ना!” परंतु त्याचे भाऊ आश्चर्याने चकित झाले; ते एवढे घाबरले व गोंधळले की त्यांच्या तोंडून शब्द फुटेना!
  • 4 तेव्हा योसेफ आपल्या भावांना पुन्हा म्हणाला, “जरा इकडे माझ्याकडे या; कृपा करुन माझ्याजवळ या अशी मी विनंती करतो.” तेव्हा त्याचे भाऊ त्याच्या जवळ गेले; आणि योसेफ त्यांना म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ मीच आहे; होय! ज्या भावाला तुम्ही मिसरच्या लोकांना गुलाम म्हणून विकले तो योसेफ मीच आहे.
  • 5 आता त्याविषयी काही चिंता व काळजी करु नका; किंवा तुम्ही जे केले त्याबद्दल आपल्याला संताप करुन घेऊ नका; मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती.
  • 6 हा भयंकर दुष्काळ आता दोन वर्षे पडला आहे आणि आणखी पाच वर्षे पेरणी किंवा कापणी होणार नाही.
  • 7 अशारीतीने या देशात मी अगोदर येऊन तुमच्यासर्वांचे प्राण वाचावेत म्हणून देवाने मला तुमच्या आधी येथे पाठवले आहे.
  • 8 मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या बापासमान केले आहे; त्यामुळे मी फारोच्या घरदाराचा स्वामी आणि सर्व मिसर देशाचा प्रशासक झालो आहे.”
  • 9 योसेफ म्हणाला, “तर आता तोबडतोब माझ्या बापाकडे जाण्यास निघा; माझ्या बापाला सांगा की तुमचा मुलगा योसेफ याने तुम्हाला येणे प्रमाणे संदेश पाठवला आहे.”देवाने मला अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणजे अधिपति केले आहे. तर आता वेळ न दवडता माझ्याकडे निघून या.
  • 10 तुम्ही माझ्या जवळ गोशेन प्रांतात राहा; तुम्ही, तुमची मुले, नातवंडे तसेच तुमची शेरडेमेंढरे, गुरेढोरे असा तुम्हां सर्वांचे मी स्वगात करतो.
  • 11 येणाऱ्या दुष्काळाच्या पाच वर्षात मी तुमची सर्व प्रकारची काळजी घेईन त्यामुळे तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सर्व काही गमावण्याची वेळ येणार नाही.
  • 12 योसेफ आपल्या भावांशी बोलतच राहिला. तो म्हणाला, “मी योसेफच आहे याची आता तुम्हाला खात्री पटली असेल; तुमचा भाऊ बन्यामीन याला खात्री पटली आहे; त्याने मला ओळखले आहे; आणि तुमच्याशी बोलणारा मी खरोखर योसेफच आहे.
  • 13 तेव्हा मिसर देशातील माझी धनदौलत व माझे वैभव आणि तुम्ही येथे जे जे पाहिले आहे त्या संबंधी माझ्या बापाला सांगा; आता लवकर जाऊन माझ्या बापाला माझ्याकडे घेऊन या.”
  • 14 मग योसेफ आपला धाकटा भाऊ बन्यामीन याला मिठी मारुन रडला; आणि बन्यामीनही त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन रडला.
  • 15 मग योसेफाने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला; यानंतर त्याचे भाऊ त्याज बरोबर बोलू लागले.
  • 16 योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आहेत अशी बातमी फारो, त्याच्या घरची मंडळी व त्याचे सेवक यांना समजली त्यामुळे त्या सर्वांना त्याविषयी आनंद झाला.
  • 17 तेव्हा फारो योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग की तुम्हाला गरज असेल तेवढी अन्नसामग्री घेऊन कनान देशास जा;
  • 18 तसेच तुमचा बाप आणि तुमच्या घरची सर्व मंडळी यांना घेऊन माझ्याकडे या; तुम्हाला राहावयास मिसरमधील सर्वात उत्तम प्रदेश मी देईन आणि तुमच्या घरातील मंडळी, यांना आमच्या येथे असलेले उत्तम पदार्थ खावयास मिळतील.”
  • 19 मग फारो म्हणाला, “आपल्या गाड्यांपैकी सर्वात चांगल्या गाड्या तुझ्या भावांना दे व त्यांना सांग की कनान देशास जाऊन तुमचे वडील आणि तुमच्या स्त्रिया व मुले या सर्वांना गाड्यात बसवून मागे घेऊन या;
  • 20 त्यांचे सामान सुमान व जे काही असेल ते सर्व घेऊन येण्यास संकोच धरु नका असे सांग. मिसरमधील उत्तम ते आम्ही त्यांना देऊ शकतो!”
  • 21 तेव्हा इस्राएलाच्या मुलांनी तसे केले; योसेफाने त्यांना फारोने वचन दिल्याप्रमाणे सर्वात चांगल्या गाड्या दिल्या; आणि त्यांच्या प्रवासाकरिता भरपूर अन्नसामग्री दिली;
  • 22 तसेच त्याने प्रत्येक भावाला एक सुंदर पोशाख दिला; व बन्यामीनाला पाच सुंदर पोशाख आणि चांदीची तीनशे नाणी दिली.
  • 23 त्याने आपल्या बापासाठीही देणग्या पाठवल्या. मिसरमधील चांगले पदार्थ गोण्यात लादलेली दहा गाढवी आपल्या बापाकरिता परतीच्या प्रवासासाठी पाठवल्या.
  • 24 मग योसेफाने आपल्या भावांना निरोप दिला; ते निघाले तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “सरळ घरी जा आणि रस्त्यात एकमेकांशी भांडू नका.”
  • 25 अशा रीतीने त्याचे भाऊ मिसर सोडून कनान देशास आपल्या बापाकडे गेले.
  • 26 त्यांनी आपल्या बापास सांगितले, “बाबा! बाबा! तुमचा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे आणि तो अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणजे प्रमुख अधिकारी आहे.” हे ऐकून त्यांच्या बापाला भोवळ आली.त्यांच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसेना!
  • 27 परंतु त्यांनी त्याला योसेफाने सांगितलेल्या सर्व गोष्टी कळवल्या; मग योसेफाने त्या सर्वांना मिसरला घेऊन जाण्यासाठी पाठवलेल्या चांगल्या गाड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या जीवात जीव आला व त्याला फारच फार आनंद झाला;
  • 28 इस्राएल म्हणाला, “आता मात्र तुमच्यावर माझा विश्वास बसला आहे की माझा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे; आता मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन भेटेन!”