wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यशया धडा 1
  • 1 आमोजचा मुलगा यशया ह्याला पुढीलप्रमाणे देवाचा दृष्टान्त झाला आणि यहूदा व यरूशलेम येथे पुढे घडणाऱ्या गोष्टी देवाने यशयाला दाखविल्या उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया या यहूदी राजांच्या काळात घडून येणाऱ्या गोष्टी यशयाने पाहिल्या.
  • 2 हे स्वर्गा आणि हे पृथ्वी, परमेश्वर काय म्हणतो ते ऐका. परमेश्वर म्हणतो,“मी माझ्या मुलांचे पालनपोषण केले त्यांना लहानाचे मोठे केले. पण तीच मुले माझ्यावर उलटली.
  • 3 गाय आपल्या मालकाला ओळखते. गाढवालासुध्दा, आपला मालक आपल्याला कोठे खायला देणार ते, कळते. पण इस्राएल लोक मला जाणत नाहीत. माझ्या लोकांना काही समजत नाही.”
  • 4 इस्राएल हे राष्ट्र पापांनी भरले आहे. अन्याय, दुष्कृत्ये ह्यांचा बोजा त्यांच्यावर पडला आहे. पापी कुटुंबातील दुर्वर्तनी मुलांप्रमाणे इस्राएल लोक वागत आहेत. त्यांनी परमेश्वराचा त्याग केला आहे. इस्राएलच्या पवित्र देवाचा त्यांनी अपमान केला आहे. त्यांनी त्याचा त्याग केला व त्याला एखाद्या परक्या माणसाप्रमाणे वागवले.
  • 5 देव म्हणतो, “मला तुम्हाला सतत शिक्षा का करावी लागावी? मी तुम्हाला शिक्षा केली तरी तुम्ही सुधारत नाही. तुम्ही माझ्याविरूध्द बंड करीतच राहता. सध्या प्रत्येकाचे डोके व हृदय कमकुवत झाले आहे.
  • 6 तुमच्या पायापासून डोक्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर जखमा, घाव व वाहते व्रण आहेत. त्या वाहत्या व्रणीची तुम्ही काळजी घेतली नाही. तुमच्या जखमा तेल सोडून नरम केल्या नाहीत आणि त्यावर पट्टीही बांधली नाही.
  • 7 “तुमच्या देशाचा नाश झाला आहे. तुमची शहरे जाळली गेली आहेत. तुमच्या शत्रूंनी तुमचा देश काबीज केला आहे. सैन्यांनी एखादा देश उद्ध्वस्त करावा तशी तुमची भूमी झाली आहे.
  • 8 सीयोनची मुलगी (यरूशलेम) द्राक्षांच्या बागेतील रिकाम्या खोपटाप्रमाणे झाली आहे. तिची अवस्था काकडीच्या शेतातील जुन्या घराप्रमाणे झाली आहे. शत्रूने पराभूत केलेल्या नगराप्रमाणे ती दिसते.”
  • 9 सर्व शक्तिमान परमेश्वराने काही लोकांना जिवंत ठेवले नसते तर सदोम अथवा गमोरा ह्या शहरांप्रमाणे आपला संपूर्ण नाश झाला असता.
  • 10 सदोमच्या नेत्यांनो, परमेश्वराचा संदेश ऐका गमोराच्या लोकांनो, देवाच्या शिकवणुकीकडे लक्ष द्या.
  • 11 देव म्हणतो, “तुम्ही माझ्यापुढे सतत यज्ञबलि का करता? मला तुमच्या मेंढ्यांच्या, वासरांच्या चरबीच्या, आणि बैल, कोकरे आणि बकऱ्यांच्या यज्ञबलिंचा आता वीट आला आहे.
  • 12 तुम्ही माझ्या दर्शनाला येता तेव्हा माझ्या अंगणातील प्रत्येक गोष्ट तुडविता. असे करायला तुम्हाला कोणी सांगितले?
  • 13 “माझ्यासाठी निरर्थक यज्ञबलि देणे थांबवा. माझ्यापुढे जळणाऱ्या धुपाचा मला वीट आला आहे. चंद्रदर्शन शब्बाथ व सुटी यांच्या निमित्ताने होणाऱ्या मेजवान्या मला आवडत नाहीत. धार्मिक सभेत तुम्ही करीत असलेली दुष्कृत्ये मला अजिबात पसंत नाहीत.
  • 14 तुमच्या मासिक सभा व मेळावे यांची मला मनापासून घृणा वाटते. ह्या सभांचे मला ओझे झाले आहे. मी ह्याला कंटाळलो आहे.
  • 15 “प्रार्थना करण्यासाठी उचललेल्या तुमच्या हाताकडे मी लक्ष देणार नाही. तुम्ही कितीही प्रार्थना केली तरी ऐकणार नाही. का? कारण तुमचे हातरक्ताने माखले आहेत.
  • 16 “शुचिर्भूत व्हा. स्वच्छ व्हा. तुमची दुष्कृत्ये थांबवा. मला वाईट गोष्टी बघायच्या नाहीत. चुकीचे वागू नका.
  • 17 चांगल्या गोष्टी करायला शिका. दुसऱ्यांशी न्यायाने वागा. जे दुसऱ्यांना क्लेष देतात त्यांना शासन करा. अनाथ मुलांना मदत करा. विधवांना साहाय्य करा.”
  • 18 परमेश्वर म्हणातो, “या, आपण या गोष्टींची चर्चा करू या. तुमची पातके कितीही काळीकुट्ट (शब्दश: शेंदरासारखी लाल) असली तरी ती धुता येतील आणि तुम्ही हिमाप्रमाणे पांढरेशुभ्र व्हाल. जरी तुमची पापे लाल असली तरी तुम्ही शुभ्र लोकरीसारखे व्हाल.
  • 19 “तुम्ही माझे म्हणणे ऐकाल तर ह्या देशातील चांगल्या वस्तू तुम्हाल प्राप्त होतील.
  • 20 माझे म्हणणे न ऐकणे हे माझ्याविरूध्द जाण्यासारखे होईल आणि शत्रू तुमचा नाश करेल.”स्वत: परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या.
  • 21 देव म्हणतो, “यरूशलेमेकडे पाहा. ही नगरी माझ्यावर श्रध्दा ठेवणारी आणि माझ्या मताप्रमाणे वागणारी होती. आताच तिला असे वारांगनेप्रमाणे वागायला काय झाले? आता ती माझ्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही. यरूशलेमला प्रामणिक बनवली पाहिजे. यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनी देवाच्या इच्छेप्रमाणे राहिले पाहिजे. पण सध्या तेथे खुनी लोक राहतात.
  • 22 “चांगुलपणा हा चांदीसारखा असतो. पण तुझ्या चांदीला काहीही मोल राहिलेले नाही. तुझ्या द्राक्षरसात (चांगुलपणात) पाणी मिसळल्याने तो पातळ झाला आहे.
  • 23 तुझे सत्ताधीश बंडखोर व चोरांचे साथीदार झाले आहेत. तुझे सगळे सत्ताधीश लाच मागतात. चुकीच्या गोष्टी करण्यासाठी ते पैसे घेतात. लोकांना फसविण्यासाठी ते पगार घेतात. ते अनाथ मुलांना मदत करीत नाहीत आणि विधवांच्या गरजांकडे लक्ष देत नाहीत.”
  • 24 यामुळे प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा सामर्थ्यवान ईश्वर म्हणतो, “माझ्या शत्रूंनो, मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही मला जास्त त्रास देऊ शकणार नाही.
  • 25 चांदी स्वच्छ करण्यासाठी लोक एक रसायन वापरतात. मी तसेच करीन आणि तुझी दुष्कृते धुवून काढीन. मी तुझ्यातील सर्व निरर्थक गोष्टी काढून टाकीन.
  • 26 सुरूवातीला होते त्याप्रमाणे मी न्यायाधीश नेमीन. पूर्वीप्रमाणेच मंत्री नेमीन मग तुला सर्वजण ‘चांगली व निष्ठावंत नगरी म्हणतील.”‘
  • 27 देव कल्याण करणारा आहे आणि तो योग्य त्याच गोष्टी करतो. म्हणूनच सीयोनचा व जे त्याला शरण येतील अशा लोकांचा, देव उध्दार करेल.
  • 28 पण सर्व गुन्हेगारांचा आणि पापी लोकांचा नाश होईल. (हे लोक परमेश्वराचे ऐकणारे नाहीत.)
  • 29 भविष्यात, ज्या ओकच्या झाडांची लोक पूजा करतात व ज्या खास बागांमध्ये जाऊन मूर्तींची पूजा करतात, त्या झाडांची व बागांची लोकांना लाज वाटेल.
  • 30 असे होण्याचे कारण तुम्ही त्या पाने गळून जाणाऱ्या ओकच्या झाडांप्रमाणे किंवा पाणी नसल्याने सुकत चाललेल्या बागांप्रमाणे व्हाल.
  • 31 बलाढ्य माणसे लहानशा वाळलेल्या लाकडाच्या ढलपीप्रमाणे होतील. त्यांची कर्मे आग लावणाऱ्या ठिणगीसारखी असतील. ती बलाढ्य माणसे व त्यांची कर्मे ह्यांना एकदमच आग लागेल आणि ती आग कोणीही विझवू शकणार नाहीत.