wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यशया धडा 65
  • 1 परमेश्वर म्हणतो, “माझ्याकडे सल्ला मागण्याकरिता न आलेल्या लोकांनाही मी मदत केली. जे मला शोधत नव्हते, त्यांनाही मी सापडलो. माझे नाव धारण न करणाऱ्या राष्ट्रबरोबर मी बोललो. मी म्हणालो, ‘मी येथे आहे! मी येथे आहे!’
  • 2 “माझ्या विरूध्द गेलेल्या लोकांना स्वीकारायच्या तयारीत मी उभा राहिलो. ते माझ्याकडे येतील म्हणून मी त्यांची वाट पाहत होतो. पण ते त्यांच्या वाईट मार्गाप्रमाणेच जगत राहिले. त्यांच्या मनांत आले ते त्यांनी केले.
  • 3 ते लोक माझ्यासमोर असे वागून मला राग आणतात. ते त्यांच्या खास बागांत होमार्पण अर्पण करतात आणि धूप जाळतात.
  • 4 ते थडग्यांजवळ बसून मृतांकडून संदेश येण्याची वाट पाहतात? एवढेच नाही तर, ते मृत शरीरांजवळ राहतात. ते डुकराचे मांस खातात. त्यांचे काटे आणि सुऱ्या कुजलेल्या मांसाने माखून घाण झाल्या आहेत.
  • 5 “पण हे लोक दुसऱ्या लोकांना सांगतात, ‘माझ्याजवळ येऊ नकोस. मी तुला शुध्द केल्याशिवाय मला शिवू नकोस.’ ते लोक माझ्या डोळ्यांत जाणाऱ्या धुराप्रमाणे आहेत. त्यांचा अग्नी सतत जळत असतो.”
  • 6 “हे बघा, हा हिशेब चुकता केलाच पाहिजे. हा हिशेब, तुम्ही पापे करून अपराध केल्याचे दाखवितो. हा हिशेब चुकता केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि तुम्हाला शिक्षा करून मी हा हिशेब चुकता करीन.
  • 7 “तुमची आणि तुमच्या वडिलांची पापे सारखीच आहेत.” परमेश्वर म्हणतो, “त्यांनी डोंगरावर धूप जाळून ही पापे केली. त्या टेकड्यांवर त्यांनी माझी अप्रतिष्ठा केली म्हणून मी त्यांना प्रथम शिक्षा केली. त्यांना मिळायला हवी होती तीच शिक्षा मी त्यांना दिली.”
  • 8 परमेश्वर म्हणतो, “द्राक्षांत जेव्हा नवा रस भरतो, तेव्हा लोक तो पिळून काढून घेतात, पण ते द्राक्षांचा संपूर्ण नाश करीत नाहीत. कारण ती द्राक्षे अजून उपयोगात येऊ शकतात. मी माझ्या सेवकांच्या बाबतीत असेच करीन. मी त्यांना संपूर्णपणे नष्ट करणार नाही.
  • 9 मी याकोबच्या (इस्राएलच्या) काही लोकांना ठेवीन. यहूदातील काही लोकांना माझा डोंगर मिळेल. माझे सेवक तेथे राहतील. तेथे राहण्यासाठी मी लोकांची निवड करीन.
  • 10 मग शारोन दरी मेंढ्यांचे चरण्याचे कुरण होईल. अखोरची दरी गुरांचे विसाव्याचे ठिकाण होईल. ह्या सर्व गोष्टी, माझ्या लोकांसाठी मला शोधणाऱ्या लोकांसाठी होतील.
  • 11 “पण तुम्ही परमेश्वराचा त्याग केला म्हणून तुम्हाला शिक्षा होईल. माझ्या पवित्र डोंगराला तुम्ही विसरला. तुम्ही गादाची पूजा करायला सुरवात केली. तुम्ही मनीवर खोट्या देवावर विसंबता.
  • 12 पण मी तुमचे भविष्य ठरवितो. आणि मी तुम्हाला तलवारीने मारायचे ठरविले आहे. तुम्ही सर्व मारले जाल का? कारण मी तुम्हाला बोलाविले आणि तुम्ही मला ओ द्यायचे नाकारले. मी तुमच्याशी बोललो पण तुम्ही माझे ऐकले नाही. मी ज्यांना पापे म्हणतो, त्या गोष्टी तुम्ही केल्या. मला आवडत नसलेल्या गोष्टी करायचे तुम्ही ठरविले.”
  • 13 तेव्हा, परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला, “माझ्या सेवकांना खायला मिळेल, पण तुम्ही पापी भुकेले राहाल. माझ्या सेवकांना पाणी मिळेल, पण तुम्ही तहानलेले राहाल. माझे सेवक सुखी होतील, पण तुम्ही लज्जित व्हाल.
  • 14 माझ्या सेवकांच्या हृदयांत चांगुलपणा असल्याने ते सुखी होतील. पण तुम्ही दुष्ट प्रवृत्तीचे लोक रडाल, कारण तुमच्या हृदयांत वेदना असतील, तुमचा तेजोभंग होईल, आणि तुम्ही खूप दु:खी व्हाल.
  • 15 माझ्या सेवकांना तुमची नावे शिव्यांसारखी वाटतील.” परमेश्वर, माझा प्रभू, तुम्हाला ठार मारील तो त्याच्या सेवकांना मात्र नव्या नावाने बोलावील.
  • 16 आता लोक भूमीचे आशीर्वाद मागतात. पण भविष्यात ते खऱ्या देवाचे आशीर्वाद मागतील. लोक आता शपथ घेताना भूमीच्या बळावर विश्वास टाकतात. पण पुढील काळात ते खऱ्या देवावर विश्वास ठेवतील का? कारण पूर्वीचे सर्व त्रास विसरले जातील. माझ्या लोकांना पुन्हा कधीही त्या त्रासांची आठवण येणार नाही.
  • 17 “मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करीन. लोक भूतकाळाची आठवण ठेवणार नाहीत. त्यांना त्यातील एकही गोष्ट आठवणार नाही.
  • 18 माझे लोक सुखी होतील. ते अखंड आनंदात राहतील का? मी जे निर्माण करीन त्यामुळे असे होईल. मी यरूशेमला आनंदाने भरून टाकीन आणि त्यांना सुखी करीन.
  • 19 “मग यरूशलेमबरोबर मलाही आनंद होईल. मी माझ्या लोकांबरोबर सुखी होईन. त्या नगरीत पुन्हा कधीही आक्रोश व दु:ख असणार नाही.
  • 20 तेथे पुन्हा कधीही अल्पायुषी मुले जन्माला येणार नाहीत. त्या नगरीत कोणीही माणूस अल्प वयात मरणार नाही. आबालवृध्द दीर्घायुषी होतील. शंभर वर्षे जगणाऱ्याला तरूण म्हटले जाईल. पण पापी माणूस जरी शंभर वर्षे जगला तरी त्याच्यावर खूप संकटे येतील.
  • 21 “त्या नगरीत घर बांधणाऱ्याला त्या घरात राहायला मिळेल. आणि द्राक्षाचा मळा लावणाऱ्याला त्या मळ्यातील द्राक्षे खायला मिळतील.
  • 22 एकाने घर बांधायचे व त्यात दुसऱ्याने राहायचे किंवा एकाने द्राक्ष मळा लावायचा व दुसऱ्याने त्या मळ्यातील द्राक्षे खायची असे तेथे पुन्हा कधीही होणार नाही. माझे लोक वृक्षांएवढे जगतील. मी निवडलेले लोक, त्यांनी स्वत: तयार केलेल्या गोष्टींचा, आनंद लुटतील.
  • 23 स्त्रियांना बाळंतपणाचा त्रास कधीच होणार नाही. बाळंतपणात काय होईल ह्याची त्यांना भिती वाटणार नाही. परमेश्वर माझ्या सर्व लोकांना व त्यांच्या मुलांना आशीर्वाद देईल.
  • 24 त्यांनी मागण्या आधीच त्यांना काय पाहिजे ते मला समजेल. आणि त्यांचे मागणे पुरे होण्याआधीच मी त्यांना मदत करीन.
  • 25 लांडगे आणि कोकरे, सिंह आणि गुरे एकत्र जेवतील. माझ्या पवित्र डोंगरावरील कोणाही माणसाला जमिनीवरचा साप घाबरविणार नाही. अथवा चावणार नाही. “परमेश्वराने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या.