wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यिर्मया धडा 15
  • 1 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, मोशे आणि शमुवेल जरी यहूदासाठी विनवणी करण्याकरिता माझ्याकडे आले असते तरी यहूदाची मला दया येणार नाही. यहूदाच्या लोकांची मला कीव वाटणार नाही. त्या लोकांना माझ्यापासून दूर ठेव. त्यांना निघून जाण्यास सांग.
  • 2 ते लोक कदाचित् तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जाऊ?’ तेव्हा तू त्यांना माझा पुढील संदेश दे परमेश्वर म्हणतो,‘काही लोकांना मी मरणासाठी निवडले आहे, ते मरतीलच. काही लोकांची निवड मी लढाईत मरण्यासाठी केली आहे, त्यांना तसेच मरण येईल. काहीना मी उपासमारीने मरण्यासाठी निवडले आहे; ते अन्नावाचून मरतील. काहीची निवड मी देशोधडीला लावण्यासाठीच केली आहे; त्यांना परदेशात कैदी म्हणून पाठविले जाईल.’
  • 3 मी त्यांच्यावर ‘चार प्रकारचे संहारक सोडीन.’ हा परमेश्वराचा संदेश आहे. ‘मी त्यांना मारण्यासाठी तलवारधारी शत्रू पाठवीन. त्यांची शवे खेचून नेण्यासाठी मी कुत्र्यांना पाठवीन. त्यांची प्रेते खाण्यासाठी मी पक्षी व हिंस्र प्राणी सोडीन.
  • 4 पृथ्वीवरच्या सर्व लोकांना, एखाद्या भयंकर गोष्टीसाठी देण्याचे उदाहरण म्हणून मी यहूदाच्या लोकांचा उपयोग करीन. मनश्शेने यरुशलेममध्ये जे काय केले, त्यासाठी मी यहूदातील लोकांना शिक्षा करीन. कारण मनश्शे हा हिज्कीया राजाचा मुलगा व यहूदाचा राजा होता.’
  • 5 “यरुशलेम नगरी, तुझ्याबद्दल कोणालाही वाईट वाटणार नाही. कोणीही दु:खाने आक्रोश करणार नाही. तुझे कसे काय चालले आहे याची कोणीही विचारपूस करणार नाही.
  • 6 यरुशलेम, तू मला सोडून गेलीस!” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “तू पुन्हा पुन्हा माझा त्याग केलास म्हणून मी तुला शिक्षा करीन. तुझा नाश करीन. तुझी शिक्षा पुढे ढकलण्याचा आता मला वीट आला आहे.
  • 7 मी माझ्या खुरपणीने यहूदाच्या लोकांना वेगळे काढीन आणि देशाच्या सीमेबाहेर पसरवून देईन माझे लोक सुधारले नाहीत म्हणून मी त्यांचा नाश करीन. मी त्यांच्या मुलांना घेऊन जाईन.
  • 8 पुष्कळ स्त्रिया विधवा होतील. समुद्रातील वाळूच्यापेक्षा त्यांची संख्या जास्त असेल. भर मध्यान्ही मी संहारक आणीन. यहूद्यांच्या तरुण मुलांच्या आयांवर तो हल्ला करील. मी यहूदामधील लोकांना क्लेश देईन आणि त्यांच्यात घबराट निर्माण करीन. लवकरच मी हे घडवून आणीन.
  • 9 जे कोणी संहारातून बचावले असतील. त्यांना शत्रू हल्ला करुन आपल्या तलवारींनी ठार मारेल. एखाद्या स्त्रीला जरी सात मुले असतील, तरी ती सर्व मरतील. त्या दु:खाने ती एवढा आक्रांत करील की अशक्त होऊन तिला श्वास घेणे कठीण होईल. ती उदास होईल व गोंधळून जाईल. दु:खाने तिला दिवसा, उजेडीही अंधार पसरल्यासारखे वाटेल.”
  • 10 माते, तू मला (यिर्मयाला) जन्म दिलास याचा मला खेद वाटतो. वाईट गोष्टीबद्दल सर्व देशावर दोषारोप व टीका करणे माझ्यासारख्याला भाग पडते. काहीही देणे घेणे नसताना, मला प्रत्येकजण शिव्याशाप देतो.
  • 11 खरे म्हणजे परमेश्वरा, मी तुझी चांगली सेवा केली. संकटाच्या वेळी मी शत्रूंबद्दल तुझ्याकडे विनवणी केली.
  • 12 “यिर्मया, लोखंडाच्या तुकड्याचे कोणीही शतशा तुकडे करु शकत नाही, हे तुला माहीत आहे. येथे लोखंड वा पोलाद हा शब्द मी उत्तरेकडून येणाऱ्या पोलादासाठी वापरत आहे. तसेच कोणीही काशाचे पण तुकडे तुकडे करु शकत नाही.
  • 13 यहूदाच्या लोकांकडे बरीच संपत्ती आहे ती संपत्ती मी दूसऱ्या लोकांना देईन. ती त्या लोकांना विकत घ्यावी लागणार नाही. मीच ती त्यांना देईन. का? कारण यहूदाच्या लोकांनी खूप पापे केली. यहूदाच्या प्रत्येक भागात त्यांनी पापे केली.
  • 14 यहूदातील लोकांनो, मी तुम्हाला तुमच्या शत्रूचे गुलाम करीन. तुम्हाला अनोळखी असलेल्या प्रदेशात तुम्ही गुलाम व्हाल. मी खूप रागावलो आहे. माझा राग प्रखर अग्नीसारखा आहे. त्यात तुम्ही जाळले जाल.”
  • 15 परमेश्वरा, तू मला जाणतोस माझी आठवण ठेव व माझी काळजी घे. लोक मला दुखवत आहेत त्यांना योग्य ती शिक्षा कर. त्या लोकांशी तू संयमाने वागतोस. पण त्यांना संयम दाखविताना, माझा, मी तुझ्यासाठी भोगत असलेल्या दु:खाचा परमेश्वरा विचार कर.
  • 16 मला तुझा संदेश मिळाला व मी तो खाल्ला (आत्मसात केला.) तुझ्या संदेशाने मला खूप आनंद झाला. तुझ्या नावाने ओळखले जाण्यात मला आनंद वाटतो कारण तुझे नावच ‘सर्वशक्तिमान परमेश्वर’ असे आहे.
  • 17 लोकंाच्या हसण्याखिदळण्यात आणि जल्लोशांत मी कधीच सामील झालो नाही. माझ्यावर तुझा प्रभाव असल्याने मी एकटाच बसून राहिलो. आजूबाजूला असलेल्या दुष्टाईबद्दल तू माझ्यात क्रोध भरलास.
  • 18 पण तरीसुद्धा मी दुखावला का जातो? माझ्या जखमा भरुन येऊन बऱ्या का होत नाहीत, ते मला समजत नाही. देवा, मला वाटते तू बदललास पाणी आटून गेलेल्या झऱ्याप्रमाणे तू झालास. ज्यातून पाणी वाहायचे थांबले आहे अशा प्रवाहाप्रमाणे तू झालास.
  • 19 मग परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, तू बदललास आणि माझ्याकडे परत आलास, तर मी शिक्षा करणार नाही. मगच तू माझी सेवा करु शकतोस वायफळ बडबड न करता, महत्वाचे तेवढेच बोललास, तर तू माझे शब्द बोलू शकतोस. यहूदातील लोकांनी बदलावे व तुझ्याकडे परत यावे. यिर्मया! पण तू मात्र त्यांच्यासारखा होऊ नकोस.
  • 20 त्या लोकांना तू काश्याची भिंत वाटशील, एवढा मी तुला बलवान करीन. ते तुझ्याविरुद्ध लढतील, पण ते तुझा पराभव करु शकणार नाहीत. का? कारण मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला मदत करीन आणि तुझे रक्षण करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
  • 21 “त्या दुष्ट लोकांपासून मी तुझे रक्षण करीन. ते लोक तुला घाबरवितात. पण त्यांच्यापासून मी तुला वाचवीन.”