wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यिर्मया धडा 26
  • 1 यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या पाहिल्याच वर्षी परमेश्वराकडून हा संदेश आला. यहोयकीम हा योशीया राजाचा मुलगा होता.
  • 2 परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात उभा राहा आणि परमेश्वराच्या मंदिरात उपासना करण्यास येणाऱ्यांना हा संदेश दे. मी तुला सांगितलेले सर्व यहूदातील सगळ्या लोकांना सांग. माझ्या संदेशातील कोणताही भाग गाळू नकोस.
  • 3 कदाचित् ते ऐकतीलही आणि माझ्या संदेशाचे पालन करतील. पापी जीवन जगण्याचे ते कदाचित् सोडून देतील. त्यांचे परिवर्तन झाल्यास, त्यांना शिक्षा करण्याच्या माझ्या बेतांबद्दल मीही कदाचित् पुनर्विचार करीन. त्यांनी खूप वाईट कृत्ये केली. त्याबद्दल त्यांना शिक्षा करण्याची योजना मी आखत आहे.
  • 4 तू त्यांना सांग ‘परमेश्वर काय म्हणतो ते ऐका: मी तुम्हाला माझी शिकवण दिली. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्याच पाहिजेत आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागलेच पाहिजे.
  • 5 माझ्या सेवकांनी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही ऐकल्याच पाहिजेत. (संदेष्टे माझे सेवक आहेत) मी पुन्हा पुन्हा माझे सेवक पाठविले. पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही.
  • 6 तुम्ही माझे ऐकले नाही तर मी माझे यरुशलेममधील मंदिर शीलोमधील माझ्या पवित्र तंबूप्रमाणेकरीन दुसऱ्या शहरांवर अरिष्ट यावे असे वाटणाऱ्या लोकांना यरुशलेम जरुर आठवेल.”
  • 7 परमेश्वराच्या मंदिरातील यिर्मयाचे हे बोलणे याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सगळ्या लोकांनी ऐकले.
  • 8 परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे, यिर्मयाने, परमेश्वराने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सांगितली, नंतर याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि लोकांनी यिर्मयाला धरले. ते म्हणाले, “अशा भयंकर गोष्टी सांगितल्याबद्दल तू मरशील!
  • 9 परमेश्वराच्या नावावर अशा भयंकर गोष्टी सांगण्याचे धाडस तू कसे काय करु शकतोस! शिलोच्या मंदिराप्रमाणे ह्या मंदिराचा नाश होईल, असे म्हणण्याचे साहस तू कसे काय करु शकतोस. यरुशलेम निर्जन वाळवंटाप्रमाणे होईल असे तू कसे काय म्हणू शकतोस!” परमेश्वराच्या मंदिरात सर्व लोक यिर्मयाभोवती जमले.
  • 10 यहूदातील राज्यकर्त्यांना ही सर्व हकिगत कळली, म्हणून ते राजवाड्यातून बाहेर आले व देवाच्या मंदिरात गेले. तेथे ते नव्या प्रवेशद्वाराजवळ आपापल्या स्थानांवर बसले. ‘नवे प्रवेशद्वार’ परमेश्वराच्या मंदिरात जाण्याचे दार होते.
  • 11 नंतर याजक व संदेष्टे राज्यकर्त्यांशी व लोकाशी बोलले. ते म्हणाले “यिर्मयाला ठार करावे. यरुशलेमबद्दल तो वाईट भविष्यकथन करतो तुम्ही त्याचे बोलणे ऐकलेच आहे.”
  • 12 मग यिर्मया यहूदाच्या राज्यकर्त्यांशी व इतर लोकांशी बोलला तो म्हणाला, “ह्या नगरीबद्दल व ह्या मंदिराबद्दल ह्या गोष्टी सांगण्यासाठी परमेश्वरानेच मला पाठविले. तुम्ही ऐकलेला प्रत्येक शब्द परमेश्वराच्या तोंडचा आहे.
  • 13 तुम्ही तुमची वागणूक बदला. तुम्ही सत्कृत्ये करायला सुरवात केलीच पाहिजे. तुम्ही परमेश्वराचे, तुमच्या देवाचे ऐकलेच पाहिजे. तुम्ही असे वागलात, तर परमेश्वराचे हृदयपरिवर्तन होईल. त्याने सांगितलेल्या वाईट गोष्टी तो करणार नाही.
  • 14 माझ्याबद्दल म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुम्हाला योग्य व बरोबर वाटेल ते करा.
  • 15 पण तुम्ही मला ठार मारलेत, तर एका गोष्टीची खात्री बाळगा. निरपराध माणसाला मारल्याबद्दल तुम्ही अपराधी ठराल. तुम्ही ह्या नगरीला आणि तिच्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसालाही अपराधी बनवाल. परमेश्वराने खरोखरीच मला तुमच्याकडे पाठविले आहे. तुम्ही ऐकलेला संदेश खरेच परमेश्वराकडूनच आलेला आहे.”
  • 16 मग राज्यकर्ते व सर्व लोक बोलले, त्या लोकांनी याजकांना व संदेष्ट्यांना सांगितले, “यिर्मयाला अजिबात मारु नका. त्याने आपल्याला सांगितलेल्या गोष्टी परमेश्वराकडून आपल्या देवाकडून येतात.”
  • 17 नंतर काही वडीलधारी (नेते) उभे राहिले. ते सर्व लोकांना उद्देशून म्हणाले,
  • 18 “संदेष्टा मीखा हा मोरष्टचा राहणारा होता. हिज्कीया यहूदाचा राजा असताना मीखा संदेष्टा होता. मीखाने यहूदाच्या लोकांना पुढील गोष्टी सांगितल्या.सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “सियोनेचा नाश होईल सियोन नांगरलेले शेत होईल. यरुशलेम दगडांची रास होईल. मंदिर असलेल्या टेकडीवर रान माजेल.”
  • 19 “हिज्कीया यहूदाचा राजा होता. पण हिज्कीयाने मीखाला ठार मारले नाही. यहूदातील कोणीही मीखाला ठार मारले नाही. हिज्कीयाला परमेश्वराबद्दल आदर होता, हे तुम्हाला माहीतच आहे. त्याला परमेश्वराला प्रसन्न ठेवण्याची इच्छा होती. हिज्कीया यहूदाचे वाईट करील असे परमेश्वराने सांगितले होते. पण हिज्कीयाने परमेश्वराची करुणा भाकली आणि परमेश्वराचे हृदयपरिवर्तन झाले. परमेश्वराने त्या वाईट गोष्टी घडू दिल्या नाहीत. आपण जर यिर्मयाला इजा केली, तर आपण स्वत:वरच खूप संकटे ओढवून घेऊन ती आपलीच चूक ठरेल.”
  • 20 पूर्वी आणखी एकाने परमेश्वराचा संदेश ऐकविला होता. त्याचे नाव उरीया तो शमायाचा मुलगा होता. उरीया किर्याथ यारीमचा रहिवासी होता. त्याने ह्या नगरीच्या विरोधात आणि या भूमीच्याही विरोधात, यिर्मयाप्रमाणेच गोष्टी सांगितल्या होत्या.
  • 21 राजा यहोयाकीम, त्याचे सैन्याधिकारी व यहूदातील नेते ह्यांनी उरीयाला संदेश देताना ऐकले. ते रागावले. यहोयाकीम राजा उरीयाला मारु इच्छित होता. हे उरीयाला कळले. तो घाबरला व मिसर देशात पळाला.
  • 22 पण यहोयाकीम राजाने एलनाथान नावाच्या माणसाबरोबर आणखी काही माणसे देऊन त्यांना मिसरला पाठविले. एलनाथान अखबोरचा मुलगा होता,
  • 23 त्या माणसांनी उरीयाला मिसरहून परत आणले. ते त्याला यहोयाकीम राजाकडे घेऊन गेले. यहोयाकीमने उरीयाला तलवारीने मारण्याचा हुकूम दिला. नंतर गरीब लोकांच्या दफनभूमीत त्याचे प्रेत फेकण्यात आले.
  • 24 पण अहीकाम या प्रतिष्ठित व्यक्तीने यिर्मयाला पाठिंबा दिला अहीकाम शाफानचा मुलगा होता. त्याने यिर्मयाला याजक व संदेष्टे यांच्यापासून वाचविले.