wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यिर्मया धडा 50
  • 1 बाबेल व खास्दी ह्यंच्यासाठी परमेश्वराने पुढील संदेश दिला हा संदेश देवाने यिर्मयामार्फत दिला.
  • 2 “सर्व राष्ट्रांत घोषणा कर! झेंडा उंच उभारुन संदेश दे. माझा सगळा संदेश दे आणि सांग ‘बाबेल काबीज केला जाईल. बेल दैवताची फजिती होईल. मरदोख घाबरुन जाईल. बाबेलच्या मूर्तींची विटंबना केली जाईल. त्या भयभीत होतील.’
  • 3 उत्तरेकडचे राष्ट्र बाबेलवर चढाई करील. ते राष्ट्र बाबेलचे ओसाड वाळवंट करील. तेथे कोणीही राहणार नाही. माणसे व प्राणी, दोघेही, तेथून पळ काढतील”
  • 4 परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी इस्राएलचे व यहूदाचे लोक एकत्र येतील. ते एकत्र येऊन रडतील, आणि एकत्रितपणेच त्यांच्या परमेश्वर देवाचा शोध घेतील.
  • 5 ते सियोनची वाट विचारतील, व ते त्या दिशेने चालायला सुरवात करतील. लोक म्हणतील, ‘चला, आपण स्वत: परमेश्वराला जाऊन मिळू या, अखंड राहणारा एक करार करु या. आपण कधीही विसरणार नाही असा करार करु या.’
  • 6 “माझे लोक चुकलेल्या मेंढराप्रमाणे आहेत. त्यांच्या मेंढपाळांनी (नेत्यांनी) त्यांना चुकीच्या मार्गाने नेले. त्यांना डोंगर टेकड्यांतून भटकायला लावले. ते त्यांच्या विश्रांतीची जागा विसरले.
  • 7 ज्यांना माझे लोक सापडले, त्यांनी त्यांना दुखवले, आणि ते शत्रू म्हणाले, ‘आम्ही काहीही चूक केली नाही.’ त्या लोकांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले. परमेश्वरच खरा त्यांचे विश्रांतिस्थान होता. त्यांच्या वडिलांनी परमेश्वर देवावरच विश्वास ठेवला.
  • 8 “बाबेलपासून दूर पळा खास्द्यांची भूमी सोडा कळपाच्या पुढे चालणाऱ्या एडक्याप्रमाणे व्हा.
  • 9 मी उत्तरेकडून खूप राष्ट्रांना एकत्र आणीन. ते बाबेलविरुद्ध लढायला सज्ज होतील. उत्तरेकडचे लोक बाबेल काबीज करतील. ते बाबेलवर बाणांचा वर्षाव करतील. ते बाण, युद्धावरुन रिकाम्या हाताने कधीच न परतणाऱ्या, सैनिकांप्रमाणे असतील.
  • 10 शत्रू खास्द्यांची सर्व संपत्ती घेतील. सैनिक त्यांना पाहिजे ते लुटून नेतील.” परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या.
  • 11 “बाबेल, तू आनंदी व उल्हसित आहेस तू माझी भूमी घेतलीस. धान्यात शिरलेल्या गायीप्रमाणे तू नाचतेस. तू आनंदाने घोड्याप्रमाणे खिंकाळतेस.
  • 12 “आता तुझी आई खजील होईल. तुला जन्म देणारी ओशाळवाणी होईल. बाबेल सर्व राष्ट्रांत क्षुद्र ठरेल. ती म्हणजे ओसाड, निर्जन वाळवंट होईल.
  • 13 परमेश्वर आपला क्रोध प्रकट करील, म्हणून तेथे कोणीही राहणार नाही. बाबेल संपूर्ण निर्जन होईल.“बाबेल जवळून जाणारा प्रत्येकजण भयभीत होईल. बाबेलचा असा वाईट रीतीने नाश झालेला पाहून ते हळहळतील.
  • 14 “बाबेलविरुद्ध लढण्यास सज्ज व्हा. धनुर्धाऱ्यांनो बाबेलवर बाणांचा वर्षाव करा. त्यात कमतरता करु नका. बाबेलने परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे.
  • 15 बाबेलला वेढा घातलेल्या सैनिकांनो जयघोष करा. बाबेलने शरणागती पत्करली आहे. तिची तटबंदी व बुरुज पाडले आहेत. परमेश्वर त्यांना योग्य तीच शिक्षा करीत आहे. तिच्या लायकीप्रमाणे, तुम्ही राष्ट्रांनी तिला शिक्षा द्यावी. तिने जसे इतर राष्ट्रांशी वर्तन, केले, तसेच तिच्याशी करा.
  • 16 बाबेलमधील लोकांना धान्य पेरु देऊ नका. त्यांना पीक काढू देऊ नका. बाबेलच्या सैनिकांनी खूप कैद्यांना त्यांच्या शहरात आणले. पण आता शत्रू सैनिक आले आहेत, त्यामुळे कैदी आपापल्या घरी परत जात आहेत. ते आपल्या देशांकडे धाव घेत आहेत.
  • 17 “सर्व देशभर पसरलेल्या मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे इस्राएल आहे. सिंहाने पाठलाग करुन दूर पळवून लावलेल्या मेंढराप्रमाणे इस्राएल आहे. त्यांच्यावर प्रथम हल्ला करणारा सिंह म्हणजे अश्शूरचा राजा आणि त्याची हाडे मोडणारा अखेरच सिंह म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होय.”
  • 18 म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी लवकरच बाबेलच्या राजाला व त्याच्या देशाला शिक्षा करीन. अश्शुरच्या राजाला केली तशीच बाबेलच्या राजाला मी शिक्षा करीन.
  • 19 “मी इस्राएलला त्याच्या भूमीत परत आणीन. कर्मेलच्या डोंगरावर व बाशानच्या भूमीत वाढलेले धान्य तो खाईल व तृप्त होईल. एफ्राईम व गिलाद येथील टेकड्यांवर तो चरेल.”
  • 20 परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी, लोक, इस्राएलचे अपराध शोधण्याचे कसून प्रयत्न करतील. पण अपराध असणारच नाही. लोक यहूदाची पापे शोधण्याचे प्रयत्न करतील. पण त्यांना एकही पाप सापडणार नाही. का? कारण मी इस्राएलमधील व यहूदातील काही वाचलेल्या लोकांचे रक्षण करीन आणि त्यांनी पाप केले असले तरी त्यांना क्षमा करीन.”
  • 21 परमेश्वर म्हणतो, “मराथाईमवर हल्ला करा. पकोडच्या लोकांवर चढाई करा. त्यांच्यावर हल्ला करा. त्यांना ठार करा. त्यांचा संपूर्ण नाश करा. माझ्या आज्ञेप्रमाणे करा.
  • 22 “युध्दाचा खणखणाट सर्व देशातू ऐकू जाऊ शकेल. तो मोठ्या नाशाचा आवाज असेल.
  • 23 बाबेलला ‘सर्व जगाचा हातोडा’ असे म्हटले गेले. पण आता ‘हातोड्याचे तुकडे तुकडे झाले आहेत इतर राष्ट्रापेक्षा बाबेलचा सर्वाधिक नाश झाला आहे.
  • 24 बाबेल, मी तुझ्यासाठी सापळा रचला, आणि तुला समजण्याआधीच तू पकडला गेलास. तू परमेश्वराविरुद्ध लढलास, म्हणून तू सापडलास व पकडला गेलास.
  • 25 परमेश्वराने आपले कोठार उघडले आहे. त्यांच्या क्रोधाची हत्यारे परमेश्वराने बाहेर आणली आहेत. खास्द्यांच्या देशात सर्वशक्तिमान परमेश्वर देवाला काम करायचे असल्याने त्याने ती हत्यारे बाहेर काढली आहेत.
  • 26 दूरवरुन बाबेलवर चालून या. तिची धान्याची कोठारे फोडा. बाबेलचा संपूर्ण नाश करा. कोणालाही जिवंत सोडू नका. धान्याच्या राशीप्रमाणे प्रेतांच्या राशी घाला.
  • 27 बाबेलमधल्या सर्व तरुण बैलांना (पुरुषांना) ठार करा. त्यांची कत्तल होऊ द्या. त्यांच्या पराभवाची वेळ आली आहे. त्यांचे फार वाईट होईल. ही त्यांच्या शिक्षेची वेळ आहे.
  • 28 लोक बाबेलमधून बाहेर धावत आहेत. ते त्या देशातून सुटका करुन घेत आहेत. ते सियोनला येत आहेत. परमेश्वराच्या कृत्याबद्दल ते प्रत्येकाला सांगत आहेत. बाबेलला योग्य अशी शिक्षा परमेश्वर करीत असल्याबद्दल ते सांगत आहेत. बाबेलने परमेश्वराचे मंदिर उद्ध्वस्त केले म्हणून आता परमेश्वर बाबेलचा नाश करीत आहे.
  • 29 “धनुर्धाऱ्यांना बोलवा. त्यांना बाबेलवर हल्ला करायला सांगा. त्यांना शहराला वेढा घालायला सांगा. कोणालाही पळू देऊ नका. तिने केलेल्या दुष्कृत्यांची परतफेड करा. तिने इतर राष्ट्रांशी जसे वर्तन केले, तसेच तिच्याशी करा. बाबेलने परमेश्वराला मान दिला नाही. इस्राएलच्या पवित्र परमेश्वराशी तिने उध्दटपणा केला. म्हणून बाबेलला शिक्षा करा.
  • 30 बाबेलच्या तरुणांना रस्त्यांत ठार केले जाईल. त्याच दिवशी तिचे सर्व सैनिक मरतील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
  • 31 “बाबेल, तू फार गर्विष्ठ आहेस, आणि मी तुझ्या विरुद्ध आहे” आमचा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगतो. “मी तुझ्या विरुद्ध आहे, आणि तुझी शिक्षेची वेळ आली आहे.
  • 32 गर्विष्ठे बाबेल अडखळून पडेल आणि तिला उठायला कोणीही मदत करणार नाही. तिच्यातील गावांत मी आग लावीन. ती आग तिच्याभोवतालच्या प्रत्येकाला भस्मसात करील.”
  • 33 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “इस्राएल व यहूदा येथील लोक गुलाम झाले आहेत. शत्रूने त्यांना पकडून नेले व तो इस्राएलला सोडणार नाही.
  • 34 पण परमेश्वर त्या लोकांना परत आणेल. त्याचे नाव आहे ‘सर्वशक्तिमान परमेश्वर देव’ तो समर्थपणे त्या लोकांचे रक्षण करील. त्यामुळे त्या देशाला विश्रांती मिळू शकेल. पण बाबेलच्या लोकांना विश्रांती मिळणार नाही.”
  • 35 देव म्हणतो, “तलवारी, बाबेलवासीयांना ठार कर. बाबेलमधील राजाच्या अधिकाऱ्यांना व ज्ञानी लोकांना ठार कर.
  • 36 तलवारी, बाबेलच्या याजकांना आणि खोट्या संदेष्ट्यांना ठार मार, ते मूर्ख माणंसांसारखे होतील. बाबेलच्या सैनिकांना ठार मार, ते सैनिक भीतीने गर्भगळीत झाले आहेत.
  • 37 तलवारी, बाबेलचे घोडे व रथ नष्ट कर. दुसऱ्या देशांतून आणलेल्या भाडोत्री सैनिकांना मार. ते सैनिक अतिशय घाबरलेल्या स्त्रियांप्रमाणे भयभीत होतील. तलवारी, बाबेलच्या संपत्तीचा नाश कर. ती संपत्ती लुटली जाईल.
  • 38 तलवारी, बाबेलच्या पाण्याला झळ पोहोचव, तेथील सर्व पाणी सुकून जाईल. बाबेलमध्ये पुष्कळ मूर्ती आहेत त्या मूर्ती बाबेलचे लोक मूर्ख असल्यांचे दर्शवितात म्हणून त्या लोकांचे वाटोळे होईल.
  • 39 “पुन्हा कधीही बाबेलमध्ये मनुष्यवस्ती होणार नाही. जंगली, कुत्रे, शहामृग, आणि वाळवंटातील इतर प्राणी तेथे राहतील. पण कोणीही मनुष्याप्राणी तेथे पुन्हा कधीही राहणार नाही.
  • 40 देवाने सदोम, गमोरा आणि त्या भोवतालच्या गावांचा संपूर्ण नाश केला. ती ठिकाणे आता निर्जन झाली आहेत. त्याचप्रमाणे, बाबेलमध्येही कोणी राहणार नाही, आणि तेथे कोणीही वस्ती करायला जाणार नाही.
  • 41 “पाहा! उत्तरेकडून लोक येत आहेत. ते एका शक्तिशाली राष्ट्रांतून येत आहेत. सर्व जगातील पुष्कळ राजे एकत्र येत आहेत.
  • 42 त्यांच्या सैन्यांजवळ धनुष्यबाण व भाले आहेत. ते सैनिक क्रूर आहेत. त्यांच्याजवळ दया नाही. ते घोड्यांवर स्वार होऊन येतात. त्या घोड्यांच्या टापांचा आवाज समुद्राच्या गर्जनेप्रमाणे असतो. ते आपापल्या जागा घेऊन लढाईसाठी उभे ठाकतात. बाबेल नगरावर हल्ला करण्यासाठी ते सज्ज आहेत.
  • 43 बाबेलच्या राजाने ह्या सैन्याबद्दल ऐकले, आणि तो फारच घाबरला. भीतीने त्याचे हातपाय गळून गेले. प्रसून्न होणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याला कष्ट झाले.”
  • 44 परमेश्वर म्हणतो, “कधीतरी, यार्देन नदीजवळच्या दाट झुडुपांतून सिंह येईल, व तो शेतांतील गोठ्यांमध्ये जाईल. मग सर्व गुरे दूर पळून जातील. मी त्या सिंहासारखाच असेन. बाबेलच्या भूमीपासूनच मी बाबेलला हुसकून लावीन. ह्यासाठी मी कोणाची निवड करावी बरे? कोणीही माझ्यासारखा नाही. मला आव्हान देणाराही कोणी नाही. म्हणून मीच हे करीन. मला पळवून लावण्यास कोणीही मेंढपाळ येणार नाही. मी बाबेलच्या लोकांचा पाठलाग करीन.”
  • 45 बाबेलसाठी परमेश्वराने काय बेत केला आहे तो ऐका. खास्द्यांसाठी परमेश्वराने काय करायचे निश्र्च्ति केले आहे ते ऐका. बाबेलच्या कळपातील (लोकांतील) लहान मुलांना शत्रू फरपटत नेईल. मग बाबेलच्या कुरणांचा संपूर्ण नाश होईल. ह्या घटनेमुळे बाबेलला धक्का बसेल.
  • 46 बाबेल पडेल, आणि त्यामुळे पृथ्वी हादरेल राष्ट्रांतील लोक बाबेलचा आक्रोश ऐकतील.