wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


ईयोब धडा 3
  • 1 नंतर ईयोबने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. इयोब आपल्या जन्मदिवसाला शाप देतो
  • 2 तो म्हणाला,“मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस कायमचा नष्ट होवो. ज्या रात्री ‘तो मुलगा आहे’ असे म्हटले गेले ती रात्र कधीच आली नसती तर बरे झाले असते असे मला वाटते.
  • 3
  • 4 तो दिवस काळाकुटृ झाला असता, देवाला त्याचे विस्मरण झाले असते, त्या दिवशी उजेड पडला नसता तर फार बरे झाले असते.
  • 5 तो दिवस मृत्यूसारखा काळा होवो. ढगही त्या दिवशी लपले असते आणि काळ्या ढगांनी प्रकाशाला घाबरवले असते तर बरे झाले असते असे मला वाटते.
  • 6 अंधाराने त्या रात्रीला ठेवून घ्यावे. दिनदर्शिकेतून ती रात्र नष्ट होवो. तिचा अंर्तभाव कुठल्याही महिन्यात होऊ नये.
  • 7 त्या रात्रीतून काहीही निर्माण होऊ नये. आनंददायी आवाज त्या रात्री ऐकू न येवोत.
  • 8 जादुगाराने शापवाणी उच्चारावी आणि माझ्या जन्मदिवसाला शापावे. ते लिव्याथानाला चेतविण्यास सदैव तत्पर असतात.
  • 9 त्या दिवसाचे पहाटेचे तारे काळे होवोत. त्या रात्रीला पहाटेच्या प्रकाशाची वाट बघू दे पण तो प्रकाश कधीही न येवो. सूर्याचे पाहिले किरण तिला कधीही न दिसोत.
  • 10 का? कारण त्या रात्रीने माझ्या जन्माला अटकाव केला नाही. ही संकटे बघण्यापासून तिने मला परावृत केले नाही.
  • 11 मी जन्माला आलो तेव्हाच का मरुन गेलो नाही? मी जन्मत:च का मेलो नाही?
  • 12 माझ्या आईने मला आपल्या मांडीवर का घेतले? तिने मला स्तनपान का दिले?
  • 13 मी जर जन्मत:च मेलो असतो तर आता मी अगदी शांत असतो. पूर्वी होऊन गेलेल्या राजेलोकांच्यात आणि विद्वानांच्यामध्ये मी झोपी गेलो असतो आणि विश्रींती घेतली असती तर किती बरे झाले असते.
  • 14 त्या लोकांनी आपल्यासाठी प्रासाद आणि शहरे बांधली परंतु आता ती ओसाड आणि उध्वस्त झाली आहेत.
  • 15 ज्या राजांनी आपली थडगी वा घरे सोन्या रुप्यांनी भरली त्यांच्या बरोबरच माझेही दफन झाले असते तर बरे झाले असते.
  • 16 मी जन्मत:च मेलेले आणि जमिनीत पुरले गेलेले मूल का झालो नाही? दिवसाच्या प्रकाशाचा किरणही न पाहिलेले मूल मी असतो तर बरे झाले असते.
  • 17 वाईट लोक थडग्यात गेल्यानंतरच त्रास देण्याचे थांबवितात. आणि जे लोक दमलेले असतात त्यांना थडग्यात विश्रांती मिळते.
  • 18 थडग्यात कैद्यांनाही विसावा मिळतो. तेथे त्यांना रक्षकांचे ओरडणे ऐकू येत नाही.
  • 19 थडग्यात, स्मशानात अनेक प्रकारचे लोक असतात, लहान थोर सर्व तेथे असतात, गुलामांचीही तेथे आपल्या मालकापासून सुटका होते.
  • 20 “दु:खी कष्टी लोकांनी का जगत राहायचे? ज्याचा आत्मा कटू आहे अशाला जीवन का द्यायचे?
  • 21 ज्याला मरायचे आहे त्याला मरण येत नाही, दु:खी माणूस गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या शोधात असतो.
  • 22 ते लोक थडगे दिसल्यावर अधिक सुखी होतील. आपली कबर मिळाली की आनंदी होतील.
  • 23 परंतु देव त्यांचे भविष्य नेहमी गुप्त ठेवतो आणि त्यांच्या भोवती संरक्षक भिंत उभारतो.
  • 24 जेव्हा खायची प्यायची वेळ होते तेव्हा मी दु:खाचा नि:श्वास टाकतो सुखाचा नाही! माझ्या तक्रारी, माझे गाऱ्हाणे पाण्यासारखे बाहेर ओतले जाते.
  • 25 काहीतरी भयानक घडणार असल्याची मला सतत धास्ती वाटत होती. आणि तेच घडले. जे भयानक घडणार आहे अशी भीती वाटत होती तेच माझ्या बाबतीत घडले.
  • 26 मी शांत होऊ शकत नाही. मी स्वस्थ राहू शकत नाही. मी विसावा घेऊ शकत नाही. मी अतिशय अस्वस्थ आहे.