wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


ईयोब धडा 19
  • 1 नंतर ईयोबने उत्तर दिले:
  • 2 “तुम्ही मला किती वेळ त्रास देणार आहात? आणि शब्दांनी मला मोडणार आहात?
  • 3 तुम्ही आतापर्यंत दहा वेळा माझा अपमान केला आहे. तुम्ही माझ्यावर हल्ला करता तेव्हा अजिबात लाज, शरम बाळगीत नाही.
  • 4 “मी पाप केले असेल तर तो माझा प्रश्र आहे. तुम्हाला त्याचा उपद्रव होत नाही.
  • 5 तुम्ही माझ्यापेक्षा चांगले आहात एवढेच तुम्हाला दाखवायचे आहे, माझी संकटे माझ्या चुकीमुळेच निर्माण झाली आहेत असे तुम्ही (उगीचच) म्हणता.
  • 6 परंतु देवानेच माझ्यावर अन्याय केला आहे. त्यानेच मला पकडण्यासाठी सापळा रचला.
  • 7 ‘त्याने मला दुखवले’ असे मी ओरडतो. पण मला उत्तर मिळत नाही. मी मदतीसाठी जोरात ओरडलो तरी न्यायासाठी असलेले माझे रडणे कुणाला ऐकू येत नाही.
  • 8 मी पुढे जाऊ नये म्हणून देवाने माझ्या मार्गात अडथळा आणला. त्याने माझा मार्ग अंधारात लपविला.
  • 9 देवाने माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवली. त्याने माझ्या डोक्यावरचा मुकुट काढून घेतला.
  • 10 माझा सर्वनाश होईपर्यंत देव मला चाऱ्ही बाजूंनी झोडपतो. एखादे झाड मुळासकट उपटून काढावे त्याप्रमाणे त्याने माझ्या आशा उपटून नेल्या.
  • 11 त्याचा क्रोध मला जाळीत आहे. तो मला त्याचा शत्रू म्हणतो.
  • 12 देव त्याचे सैन्य माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतो. ते माझ्याभोवती मोर्चा उभारतात. ते माझ्या डेऱ्याभोवती छावणी टाकतात.
  • 13 “देवाने माझ्या भावांना माझा द्वेष करायला भाग पाडले. माझ्या सर्व मित्रांमध्ये मी परका झालो आहे.
  • 14 माझे नातलग मला सोडून गेले. माझे मित्र मला विसरले.
  • 15 माझ्या घरी येणारे पाहुणे आणि माझ्या दासी मला परका आणि परदेशातला समजतात.
  • 16 “मी माझ्या नोकराला बोलावतो पण तो उत्तर देत नाही. मी मदतीसाठी याचना केली तरी माझा नोकर उत्तर देणार नाही.
  • 17 माझी बायको माझ्या श्वासाच्या वासाचा तिरस्कार करते. माझे भाऊ माझा तिरस्कार करतात.
  • 18 लहान मुलेदेखील मला चिडवतात. मी त्यांच्याजवळ जातो तेव्हा ते माझ्याबद्दल वाईटसाईट बोलतात.
  • 19 माझे जवळचे मित्रदेखील माझा तिरस्कार करतात. माझे ज्यांच्यावर प्रेम आहे ते लोक देखील माझ्याविरुध्द गेले आहेत.
  • 20 “मी इतका कृश झालो आहे की माझी कातडी हाडांवर लोबंते. आता माझ्यात जिवंतपणाचा मागमुसही उरलेला नाही.
  • 21 “माझी दया येऊ द्या. मित्रांनो, तुम्हाला माझी दया येऊ द्या! का? कारण देव माझ्यावर उलटला आहे.
  • 22 देव जसा माझा छळ करीत आहे तसा तुम्ही पण माझा छळ का करीत आहात? मला सतत त्रास देण्याचा तुम्हाला कंटाळा येत नाही का?
  • 23 “मी जे बोलतो ते कुणीतरी लक्षात ठेवून पुस्तकात लिहून ठेवावे असे मला वाटते. माझे शब्द पाषाणात कोरुन ठेवायला हवेत असे मला वाटते.
  • 24 मी जे बोलतो ते लोखंडी कलमाने शिश्यावर किंवा पाषाणावर कोरुन कायम करायला हवे असे मला वाटते.
  • 25 माझा बचाव करणारा कोणी तरी आहे याची मला खात्री आहे. तो हयात आहे हे मला माहीत आहे. आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील आणि माझा बचाव करील.
  • 26 मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन.
  • 27 मी देवाला माझ्या डोळ्यांनी बघेन. अन्य कुणी नाही, तर मी स्वत:च त्याला पाहीन. आणि त्यामुळे मी किती हुरळून गेलो आहे ते मी सांगू शकत नाही.
  • 28 तुम्ही कदाचित् म्हणाल: ‘आपण ईयोबचा छळ करु. त्याला दोषी ठरवण्यासाठी काहीतरी कारण शोधून काढू.
  • 29 परंतु तुम्हाला स्वत:लाच तलवारीची भीती वाटायला हवी का.? कारण देव दोषी माणसांना शिक्षा करतो. देव तुम्हाला शिक्षा करण्यासाठी तलवारीचा उपयोग करेल. नंतर तुम्हाला कळेल की न्यायाचीसुध्दा वेळ यावी लागते.”