wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


ईयोब धडा 38
  • 1 नंतर परमेश्वर वावटळींतून ईयोबशी बोलला. तो म्हणाला:
  • 2 “जो मूर्खासारखा बोलत आहे तो हा अज्ञानी मनुष्य कोण आहे?
  • 3 ईयोब, स्वत:ला सावरआणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला तयार हो.
  • 4 “ईयोब, मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास? तू स्वत:ला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे.
  • 5 तू जर एवढा चलाख असशील तर जग इतके मोठे असावे हे कुणी ठरवले ते सांग. मोजायच्या दोरीने ते कुणी मोजले का?
  • 6 पृथ्वीचा पाया कशावर घातला आहे? तिची कोनशिला कुणी ठेवली?
  • 7 जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले आणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला.
  • 8 “ईयोब, जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला तेव्हा दरवाजे बंद करुन त्याला कुणी अडवला?
  • 9 त्यावेळी मी त्याला मेघांनी झाकले आणि काळोखात गुंडाळले.
  • 10 मी समुद्राला मर्यादा घातल्या आणि त्याला कुलुपांनी बंद केलेल्या दरवाजाबाहेर थोपविले.
  • 11 मी समुद्राला म्हणालो, ‘तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही. तुझ्या उन्मत्त लाटा इथेच थांबतील.’
  • 12 “ईयोब, तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला आणि दिवसाला सुरु व्हायला सांगितलेस का?
  • 13 ईयोब, तू कधी तरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडून दुष्ट लोकांना त्यांच्या लपायच्या जागेतून हुसकायला सांगितलेस का?
  • 14 पहाटेच्या प्रकाशात डोंगरदऱ्या नीट दिसतात. दिवसाच्या प्रकाशात ह्या जगाचा आकार अंगरख्याला असलेल्या घडीप्रमाणे ठळक दिसतात. ओल्या मातीवर उमटलेल्या ठशाप्रमाणे त्या जागा दिसतात.
  • 15 दुष्ट लोकांना दिवसाचा प्रकाश आवडत नाही. प्रकाश दैदीप्यमान असतो तेव्हा त्यांना त्यांच्या वाईट गोष्टी करता येत नाहीत.
  • 16 “ईयोब, सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का? समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का?
  • 17 ईयोब, मृत्युलोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का? काळोख्या जगात नेणारे दरवाजे तू कधी बघितलेस का?
  • 18 ईयोब, ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का? तुला जर हे सर्व माहीत असेल तर मला सांग.
  • 19 “ईयोब, प्रकाश कुठून येतो? काळोख कुठून येतो?
  • 20 ईयोब, तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का? तिथे कसे जायचे ते तुला माहीत आहे का?
  • 21 ईयोब, तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील. तू खूप वृध्द आणि विद्वान आहेस मी तेव्हा या गोष्टी निर्माण केल्या तेव्हा तू जिवंत होतास होय ना?”
  • 22 “ईयोब, मी ज्या भांडारात हिम आणि गारा ठेवतो तिथे तू कधी गेला आहेस का?
  • 23 मी बर्फ आणि गारांचा साठा संकटकाळासाठी, युध्द आणि लढाईच्या दिवसांसाठी करुन ठेवतो.
  • 24 ईयोब, सूर्य उगवतो त्या ठिकाणी तू कधी गेला आहेस का? पूर्वेकडचा वारा जिथून सर्व जगभर वाहातो तिथे तू कधी गेला आहेस का?
  • 25 जोरदार पावसासाठी आकाशात पाट कोणी खोदले? गरजणाऱ्या वादळासाठी कुणी मार्ग मोकळा केला?
  • 26 वैराण वाळवंटात देखील कोण पाऊस पाडतो?
  • 27 निर्जन प्रदेशात पावसाचे खूप पाणी पडते आणि गवत उगवायला सुरुवात होते.
  • 28 ईयोब, पावसाला वडील आहेत का? दवबिंदू कुठून येतात?
  • 29 हिमाची आई कोण आहे? आकाशातून पडणाऱ्या हिमकणास कोण जन्म देतो?
  • 30 पाणी दगडासारखे गोठते. सागराचा पृष्ठभागदेखील गोठून जातो.
  • 31 “ईयोब, तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का? तुला मृगशीर्षाचे बंध सोडता येतील का?
  • 32 ईयोब, तुला राशीचक्र योग्यवेळी आकाशात आणता येईल का? किंवा तुला सप्तर्षीना त्यांच्या समूहासह मार्ग दाखवता येईल का?
  • 33 ईयोब, तुला आकाशातील नियम माहीत आहेत का? तुला त्याच नियमांचा पृथ्वीवर उपयोग करता येईल का?
  • 34 “ईयोब, तुला मेघावर ओरडून त्यांना तुझ्यावर वर्षाव करायला भाग पाडता येईल का?
  • 35 तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का? ती तुझ्याकडे येऊन. ‘आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे?’ असे म्हणेल का? तुझ्या सांगण्याप्रमाणे ती तुला हवे तिथे जाईल का?
  • 36 “ईयोब, लोकांना शहाणे कोण बनवतो? त्यांच्यात अगदी खोल शहाणपण कोण आणतो?
  • 37 ईयोब, ढग मोजण्याइतका विद्वान कोण आहे? त्यांना पाऊस पाडायला कोण सांगतो?
  • 38 त्यामुळे धुळीचा चिखल होतो आणि धुळीचे लोट एकमेकास चिकटतात.
  • 39 “ईयोब, तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का? त्यांच्या भुकेल्या पिल्लांना तू अन्न देतोस का?
  • 40 ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात. ते गवतावर दबा धरुन बसतात आणि भक्ष्यावर तुटून पडतात.
  • 41 ईयोब, डोंब कावळ्याला कोण अन्न देतो? जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतात आणि अन्नासाठी चारी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवितो?