wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यहोशवा धडा 1
  • 1 मोशे परमेश्वशचा सेवक होता. नूनाचा पूत्र यहोशवा मोशेचा मदतनीस होता. मोशेच्या निधनानंतर परमेश्वर यहोशवाशी बोलला. परमेश्वर म्हणाला,
  • 2 “माझा सेवक मोशे मरण पावला आहे आता तू आणि हे लोक यार्देन नदी पलीकडे जा. मी इस्राएल लोकांना देणार असलेल्या प्रदेशात तू गेले पाहिजेस.
  • 3 तुम्हाला हा प्रदेश द्यायचे मी मोशेला कबूल केले आहे. तेव्हा ज्याठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले.
  • 4 वाळवंट व लबानोन पासून फरात महानदीपर्यंतचा हित्ती यांचा सर्व प्रदेश तुमचाच होईल. तसेच येथपासून पश्चिमेकडील भूमध्य समुद्रापर्यंत म्हणजेच मावळतीपर्यंतचा देश तुमच्या हद्दीत असेल.
  • 5 मोशेला दिली तशीच तुलाही मी साथ देईन. तुला आता कोणी तुझे आयुष्य असेपर्यंत अटकाव करू शकणार नाही. मी तुला सोडणार नाही, तुला अंतर देणार नाही.
  • 6 “यहोशवा, तू खंबीर हो, हिंमत धर. या लोकांचे नेतृत्व कर म्हणजे ते तो देश घेऊ शकतील. हा देश त्यांना द्यायचे मी त्यांच्या पूर्वजांना कबूल केले आहे.
  • 7 पण आणखी एका गोष्टीबद्दल तू खंबीर आणि समर्थ असले पाहिजेस. माझा सेवक मोशे याने तुला दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळ. त्यांचे तंतोतंत पालन केलेस तर तू हाती घेतलेल्या सर्व कार्यात यशस्वी होशील.
  • 8 नियमशास्त्राच्या त्या ग्रंथात लिहिलेल्या सर्व गोष्टी नेहमी लक्षात ठेव. रात्रंदिवस त्या ग्रंथाचे मनन कर म्हणजे तुझ्या हातून त्याचे पालन होईल. असे वागलास तर अंगिकारलेल्या सर्व गोष्टीत सफल होशील.
  • 9 खंबीर आणि निर्भय राहण्याची मी तुला आज्ञा केली आहे ना? तेव्हा कचरू नकोस. परमेश्वर तू जेथे जाशील तेथे तुझ्या बरोबर आहे.”
  • 10 तेव्हा यहोशवाने लोकांमधील अधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. तो म्हणाला,
  • 11 “छावाणीतून फिरुन लोकांना अत्र वगैरेची तयारी करुन सज्ज व्हायला सांगा. तीन दीवसाच्या आत आपल्याला यार्देन नदी पार करायची आहे. परमेश्वर देव देत आहे तो देश ताब्यात घ्यायला आपण निघत आहोत.”
  • 12 मग रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या कुळांच्या या लोकांशी यहोशवा बोलला. तो म्हणाला,
  • 13 “परमेश्वराचा सेवक मोशे याने काय सांगितले त्याची आठवण करा परमेश्वर देव तुम्हाला विसाव्याचे स्थान देणार असल्याचे त्याने सांगितले. परमेश्वर तो देश तुम्हाला देणार आहे.
  • 14 यार्देन नदीच्या पूर्वेकडील ही जमीन खरे तर परमेश्वराने तुम्हाला आधीच दिली आहे. तुमच्या बायकामुलांना व जनावरांना येथेच राहू द्या. पण सर्व योध्द्यांनी सशस्त्र होऊन, आपल्या बांधवांबरोबर यार्देन पलीकडे जावे. तुम्ही युध्दाची तयारी करून तो देश घ्यायला त्यांना मदत करावी.
  • 15 तुम्हाला परमेश्वराने विसाव्याची जागा दिली आहेच. आता तुमच्या या बांधवानाही तो ती देईल. पण परमेश्वर देव देणार असलेली ती जमीन त्यांच्या ताब्यात येईपर्यंत त्यांच्या मदतीला थांबा. मग तुम्ही यार्देनच्या पूर्वेकडील या तुमच्या देशात परत येऊ शकता. परमेश्वराचा सेवक मोशे याने तो तुम्हाला दिला आहे.”
  • 16 तेव्हा लोक म्हणाले. “तू आज्ञा केली आहेस त्याप्रमाणे आम्ही वागू. तू म्हणशील तेथे आम्ही जाऊ.
  • 17 मोशेचे म्हणणे ऐकले तसेच तुझेही सर्व ऐकू परमेश्वर देवाकडे फक्त आम्ही एक मागतो. तो मोशे बरोबर राहिला तसाच तुझ्या बरोबरही राहो.
  • 18 म्हणजे एखाद्याने तुझी आज्ञा पाळायला नकार दिला किंवा तुझ्याविरूध्द बंड केले तर तो मारला जाईल. तू मात्र बलवान व खंबीर राहा.”