wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


शास्ते धडा 19
  • 1 त्या काळी इस्राएल लोकांवर कोणी राजा नव्हता. एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशात अगदी आडबाजूला एक लेवी राहात असे.यहूदातील बेथलहेम नगरातील एक बाई त्याची दासी म्हणून त्याच्याजवळ राहात असे.
  • 2 एकदा त्या दोघांमध्ये काही तरी वादावादी झाली आणि ती त्याला सोडून बेथलहेमला आपल्या वडीलांकडे परत गेली. तिला जाऊन चार महिने झाले.
  • 3 तेव्हा तिची समजूत घालून तिला परत आणावे या उद्देशाने तिचा नवरा तेथे जायला निघाला. एक नोकर आणि दोन गाढवे ही त्याने बरोबर घेतली होती. तिच्या वडीलांच्या घरी तो पोहोंचला त्याला आलेले पाहताच तिचे वडील आनंदाने त्याच्या स्वागताला पुढे आले.
  • 4 त्यांनी या लेवीला आपल्याकडे राहायचा आग्रह केला. तेव्हा त्यांच्या आदरातिथ्याचा स्वीकार करत तो तीन दिवस तेथे राहिला.
  • 5 चैथ्या दिवशी सकाळी लौकर उठून त्याने निघायची तयारी सुरु केली. पण मुलीचे वडील त्याला म्हणाले, “काही तरी खाऊन घ्या आणि मगच निघा.”
  • 6 सासरे जावयांनी एकत्र बसून न्याहारी केली. पुन्हा मुलीचे वडील म्हणाले, “आता आजच्या दिवस राहा, आराम करा. मग दुपारनंतर निघा.” मग दोघांची जेवणे झाली.
  • 7 लेवी जायच्या तयारीत होता पण सासऱ्याच्या आग्रहामुळे पुन्हा त्याला एक रात्र मुक्काम वाढवावा लागला.
  • 8 पाचव्या दिवशी सकाळी लौकर उठून लेवी जायला निघाला. पण पुन्हा सासरा जावयाला म्हणाला, “न्याहारी करुन घ्या ताजेतवाने व्हा दुपारपर्यंत थांबा.” मग दोघांची जेवणे झाली.
  • 9 लेवी, त्याची उपपत्नी आणि नोकर आता जायला निघाले. पण तिचे वडील म्हणाले, “आता तर अंधारुन आले आहे. दिवस मावळला. रात्री इथेच राहा आणि सकाळी लौकर उठून आपल्या मार्गाला लागा.”
  • 10 पण लेवीच्या मनातून आता तिथे मुक्काम करायचा नव्हता. आपली गाढवे आणि उपपत्नी यांच्यासह तो निघाला. वाटचाल करत तो यबूस (म्हणजेच यरुशलेम) पर्यंत आला.
  • 11 यबूसरर्यंत ते आले तेव्हा दिवस मावळत आला होता. तेव्हा नोकर आपल्या मालकाला म्हणाला, “आज रात्रीचा मुक्काम आपण या यबूसी लोकांच्या नगरात करु.”
  • 12 पण हा लेवी मालक त्याला म्हणाला, “हे शहर आपल्याला परके आहे. येथील लोक इस्राएल वंशाचे नाहीत. तेव्हा इथे राहायला नको. आपण गिबा येथे जाऊ.”
  • 13 तो पुढे म्हणाला, “चला तर, गिबा किंवा रामा यापौकी एखादे शहर गाठू त्यापौकी एका शहरात रात्र काढू.”
  • 14 आणि ते सगळे पुढे निघाले. गिबात शिरताशिरताच सूर्यास्त होत होता. गिबा हा प्रदेश बन्यामीनच्या हद्दीत येत होता.
  • 15 तेथे मुक्काम करायच्या उद्देशाने ते त्या शहराच्या भर चौकात येऊन उभे राहिले. पण कोणीच त्यांना रात्रीपुरता आसरा द्यायला पुढे आले नाही.
  • 16 एक म्हातारा माणूस तेव्हा शेतावरुन शहराकडे परतत होता. एफ्राइमच्या डोंगराळ भागात त्याचे घर होते. पण सध्या तो गिबा येथे राहात होता. (गिबा मधील लोक बन्यामीनच्या वंशातील होते.)
  • 17 या वाटसरुना पाहून त्याने विचारले, “तुम्ही कोण? कुठुन आलात? कोठे निघालात?”
  • 18 तेव्हा लेवीने उत्तर दिले, “मी यहूदा मधील बेथलहेमला गेलो होतो. आता मी परत माझ्या घराकडे चाललो आहे. पण आज रात्री कोणीही आम्हाला राहायला बोलावले नाही. एफ्राईमच्या डोंगराळ भागात अगदी एका टोकाला मी राहातो. यहूदा बेथलहेमला गेलो होतो. आता घरी निघालो आहे.
  • 19 गाढवासाठी दाणावैरण, तसेच आम्हा तिघांपुरते खायचे प्यायचे जिन्रस आमच्या जवळ आहेत. तशी आम्हाला कशाची जरुरी नाही.”
  • 20 यावर तो म्हातारा माणूस म्हणाला, “माझ्या घरी तुम्ही खुशाल मुक्कामाला येऊ शकता. काही लागले सवरले तर मी तुम्हाला देईन. पण या चौकात मात्र रात्रीचे राहू नका.”
  • 21 आणि त्याने त्या सर्वांना आपल्या घरी नेले. गाढवांना वैरण दिले. या तिघांनी हातापाय धुतले आणि थोडेफार खाऊन घेतले.
  • 22 हे सगळे मजेत गप्पगोष्टी करत बसले आहेत तितक्यात गावातल्या काही वाह्यात गुंडांनी घराभोवती गर्दी केली. दार वाजवायला सुरुवात केली. म्हाताऱ्या घरमालकावर ते ओरडू लागले. “तुझ्याकडच्या पाहुण्याला बाहेर काढ. लैगिक मौजमजेसाठी तो आम्हाला हवा आहे.” असा एकच ओरडा त्यांनी चालवला.
  • 23 म्हाताऱ्याने बाहेर येऊन गुंडांना विनवले, “अरे बाबांनो असे भलते सलते करु नका. तो आज माझा पाहूणा आहे. असले दुष्ट पाप करु नका.
  • 24 घरात माझी मुलगी आहे ती अजून कुमारी आहे. मी तिला व ह्या माणसाच्या उपपत्नीला बाहेर काढून तुमच्या स्वाधीन करतो. त्यांचे तुम्हाला काय हवे ते करा, परंतु या माणसाबरोबर असले भयंकर पाप करु नका.”
  • 25 पण ती माणसे काही केल्या ऐकेनात. शेवटी लेवीने आपल्या उपपत्नीला बाहेर काढले आणि त्यांच्या हवाली केले. त्या गुंडांनी रात्रभर तिला छळले. तिच्यावर बलात्कार केला आणि पहाटे तिला तिथेे टाकून निघून गेले.
  • 26 पहाटे ती कशीबशी त्या घरात आपल्या धन्याजवळ आली आणि पुढच्या दारशीच पडली उजाडेपर्यंत ती तशीच तिथे होती.
  • 27 सकाळी लेवी जायच्या तयारीसाठी म्हणून लवकर उठला. बाहेर पडायला म्हणून त्याने दार उघडले तर बाहेर ती पडली होती. तिचा हात उंबरठ्यावर पडला होता. ती त्याच्या दारात पडलेली त्याची उपपत्नी होती.
  • 28 “चल ऊठ, आता जायचे आहे” असे तो तिला म्हणाला. पण ती कुठून उत्तर देणार? ती केव्हाच गतप्राण झाली होती.त्याने तिला गाढवावर लादले आणि तो घरी निघाला.
  • 29 घरी पोहोंचल्यावर सुरीने त्याने तिचे बारा तुकडे केले इस्राएलच्या सर्व प्रदेशात त्याने ते पाठवून दिले.
  • 30 जो तो हे पाहून म्हणाला, “इस्राएलमध्ये कधीच असे घडले नव्हते. मिसर सोडल्यापासून आजतागायत असे झालेले कधीच आम्ही पाहिले नाही. तेव्हा यावर नीट विचार करुन, व चर्चा करुन. काय करायचे ते सांगा.”