wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


शास्ते धडा 21
  • 1 आपल्यापैकी कोणीही बन्यामीनांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत अशी इस्राएल लोकांनी मिस्पा येथे प्रतिज्ञा केली होती.
  • 2 इस्राएल लोक मग बेथेल येथे गेले. संध्याकाळपर्यंत ते तिथे परमेश्वरासमोर बसून राहिले. दु:खाने ते मोठमोठ्यानेे ओरडत होते.
  • 3 ते म्हणाले, “परमेश्वरा. तूच आमचा इस्राएलांचा परमेश्वर आहेस. आमच्यावर हे भयंकर संकट का ओढवावे? आज आमच्यातला एक वंश का बरे नष्ट व्हावा?”
  • 4 दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एक वेदी बांधली आणि यज्ञार्पणे, शांति अर्पणे केली.
  • 5 या मेळाव्याला हजर नाही असा इस्राएलांपैकी कुठला वंश आहे का अशी चौकशी त्यांनी सुरु केली. मिस्पा येथे या मेळाव्याला जे कोणी येणार नाहीत अशांचा वध केला जाईल अशी गंभीर प्रतिज्ञा त्यांनी केली होती म्हणून त्यांनी कसोशीने हा शोध सुरु केला.
  • 6 आपल्या बन्यामीन बांधवांबद्दल त्यांना पुन्हा एकदा वाईट वाटले. ते म्हणाले, “इस्राएलांचा एक वंश आज जवळपास नष्ट झाला आहे.
  • 7 बन्यामीनांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत अशी आपण परमेश्वरासमोर प्रतिज्ञा केली आहे. मग उरलेल्या बन्यामीन पुरुषांची लग्रे व्हायची कशी?”
  • 8 पुढे ते म्हणाले, “मिस्पा येथे आज इस्राएलाच्या कोणत्या वंशाची गैरहजेरी आहे? येथे जमलेल्यात एक कोणीतरी दिसत नाहीत एवढे खरे!” मग त्यांच्या लक्षात आले की याबेश-गिलाद या शहरातून कोणीही आलेले नाही.
  • 9 त्यांनी सर्वांची मोजदाद करुन याबेश-गिलाद मधून कोणीही न आल्याची खात्री करुन घेतली.
  • 10 आणि इस्राएल लोकांनी बाराहजारांचे सैन्य याबेश-गिलादवर पाठवले. त्यांनी सैन्याला हुकूम केला, “तेथे जा आणि प्रत्येकाला तलवारीने कापून काढा अगदी बायका मुलांना सुध्दा सोडू नका.
  • 11 हे तुम्ही केलेच पाहिजे. त्यांच्यातील कोणीही पुरुष शिल्लक राहता कामा नये आणि अविवाहित कुमारिका वगळता सर्व स्त्रियांनाही ठार करा.” सैनिकांनी या आदेशाची अमलबजावणी केली.
  • 12 या बाराहजार सैनिकांना याबेश-गिलादमध्ये चारशे तरुण कुमारिका आढळल्या त्यांना त्यांनी कनानातील शिलो येथील छावणीत आणले.
  • 13 मग इस्राएल लोकांनी रिम्मोन खडकाजवळ राहात असलेल्या बन्यामीन लोकांना निरोप पाठवून शांतीचा संदेश दिला.
  • 14 त्यामुळे ते इस्राएलमध्ये परत आले. इस्राएल लोकांनी याबेश-गिलादमधील मुलींशी त्यांची लग्ने लावून दिली. पण तरीही मुली कमीच पडल्या.
  • 15 इतर वंशांपासून परमेश्वराने त्यांना अशाप्रकारे वेगळे केले म्हणून इस्राएल लोकांना या बन्यामीनांविषयी फारच वाईट वाटले.
  • 16 इस्राएलच्या वडिलधाऱ्यांना वाटले, “बन्यामीनांच्या सर्व स्त्रिया तर मारल्या गेल्या मग आता या मागे राहिलेल्या काही बन्यामीनांची लग्ने व्हायची कशी?
  • 17 त्यांचा वंश पुढे चालू राहिला पाहिजे. त्यांचे संसार पुढे चालू राहिले नाहीत तर हा इस्राएल लोकांचा वंशच खुंटेल.
  • 18 पण आपण तर आपल्या मुलींची लग्ने त्यांच्याशी लावून देऊ शकत नाही “जो कोणी आपली मुलगी बन्यामीनाला देईल तो शापित असो” अशी आपण शपथ वाहिली आहे.
  • 19 यातून एक मार्ग आहे. शिलो नगरात दरवर्षी परमेश्वराचा उत्सव असतो. तो आता आलाच आहे.” (शिलो हे नगर बेथेलच्या उत्तरेला, बेथेलहून शखेमकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेला आणि लबोनाच्या दक्षिणेला वसलेले आहे.)
  • 20 तेव्हा आपल्याला सुचलेली युक्ती वडिलधाऱ्यांनी बन्यामीन लोकांना सांगितली. ते म्हणले, “तुम्ही द्राक्षमव्व्यात लपून बसा.
  • 21 या उत्सवात शिलोच्या तरुण मुली नृत्य करायला येतील. तिकडे लक्ष ठेवा त्या आल्या की बाहेर पडा आणि यातील एकेकीला पळवा मग आपल्या प्रांतात जाऊन त्यांच्याशी लग्न करा.
  • 22 यामुलींचे बाप किंवा भाऊ आमच्याकडे तक्रारी घेऊन येतील पण आम्ही म्हणू. ‘बन्यामीनांविषयी सहानुभूती बाळगा. करु द्या त्यांना लग्न. त्यांनी मुली नेल्या खऱ्या पण युध्द तर केले नाही आपल्याशी. शिवाय यात आपली शपथ मोडायचे पापही लागत नाही. कारण मुलींना त्यांनी आपणहून नेले. आम्ही मुली देणार नाही अशी तुमची प्रतिज्ञा होती. तिला धक्कालागलेला नाही. तुम्ही कोठे आपल्या मुलींची त्यांच्याशी लग्ने लावून दिलीत? बन्यामीनांनीच त्यांना तुमच्यातून उचलून नेले. तेव्हा तुमची शपथ मोडलेली नाही.”‘
  • 23 बन्यामीनांनी तात्काळ तसे केले. मुलींचे नृत्य चाललेले असताना प्रत्येकाने स्वत:साठी एकेक मुलगी घेतली आणि आपल्या प्रांतात परतले. त्यांच्याशी लग्न केले. आपल्या प्रदेशात त्यांनी नगरे वसवली आणि तेथे ते राहू लागले.
  • 24 मग इस्राएल लोकही आपापल्या प्रदेशात, कुळात, घरोघरी परतले.
  • 25 त्या काळी त्यांच्यावर कोणी राजा राज्य करत नव्हता. त्यामुळे ज्याला जे योग्य वाटेल ते तो करी.