- 1 परमेश्वरा, आमचे काय झाले ते लक्षात ठेव. आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर टाक.
- 2 आमचा देश परक्यांच्या हातात गेला आहे. आमची घरे परदेशीयांना दिली गेली आहेत.
- 3 आम्ही अनाथ झालो. आम्हाला वडील नाहीत. आमच्या आयांची स्थिती विधवांसारखी झाली आहे.
- 4 आम्हाला पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. आम्ही वापरत असलेल्या लाकडाला पैसे मोजावे लागतात.
- 5 आमच्या मानेवर सक्तीने जोखड ठेवले जाते. आम्ही दमून जातो. पण आम्हाला विश्रांती नाही.
- 6 पोटभर भाकरी मिळविण्यासाठी आम्ही मिसर व अश्शूर यांच्याबरोबर करार केला.
- 7 आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले. आता ते नाहीत. पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत.
- 8 गुलाम आमचे राज्यकर्ते झाले. त्यांच्यापासून आम्हाला कोणीही वाचवू शकत नाही.
- 9 अन्नासाठी आम्ही जीवाची बाजी लावतो. वाळवंटात तलवारधारी माणसे असतात.
- 10 आमची कातडी भट्टीप्रमाणे तापली आहेत. भुकेमुळे आम्हाला ताप चढला आहे.
- 11 शत्रूंनी सियोनमधील स्त्रियांवर बलात्कार केला. यहुदातील गावांमधील स्त्रियांवर त्यांनी बलात्कार केले.
- 12 शत्रूंने आमच्या राजपुत्रांना फाशी दिली. त्याने आमच्यातील वृध्दांचा मान ठेवला नाही.
- 13 आमच्या तरुणांना शत्रूने गिरणीत धान्य दळायला लावले. ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले.
- 14 वृध्द आता नगरीच्या द्वारांत बसत नाहीत. तरुण गायनवादन करीत नाहीत.
- 15 आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे. आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही.
- 16 आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे. आणि वाईट गोष्टी घडल्या.
- 17 ह्या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे. आम्हाला डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही.
- 18 सियोनचे डोंगर ओसाड झाले आहेत. सियोनच्या डोंगरावर कोल्हे वावरतात.
- 19 पण परमेश्वरा, तुझी सत्ता चिरंतन आहे. तुझे राजसिंहासन चिरकाल राहील.
- 20 परमेश्वर आम्हाला कायमचा विसरला आहेस असे दिसते. तू आम्हाला दीर्घकाल सोडून गेला आहेस.
- 21 परमेश्वरा, आम्हाला तुझ्याकडे परत ने. आम्ही आनंदाने तुझ्याकडे येऊ. आमचे जीवन पूर्वीसारखे कर.
- 22 तू आमच्यावर खूप रागावला होतास! तू आमचा पूर्णपणे त्याग केलास का?
Lamentations 05
- Details
- Parent Category: Old Testament
- Category: Lamentations
विलापगीत धडा 5