wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


लेवीय धडा 7
  • 1 “दोषार्पणाविषयी जे नियम आहेत, ते हे: हे अर्पण परमपवित्र आहे.
  • 2 ज्या जागीं होमबलीचा वध करावयाचा त्याच जागी दोषार्पणाच्या बळीचा वध करावा, आणि याजकाने त्या बळीचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.
  • 3 “त्याची सर्व चरबी याजकाने अर्पावी; त्याचे चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी,
  • 4 दोन्ही गुरदे, त्यंच्यावरील कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्येतचा काळजावरील चरबीचा पडदा,
  • 5 ह्या सर्वाचा याजकाने होम करावा; हे परमेश्वरासाठी होमार्पण आहे. हेच दोषार्पण होय.
  • 6 “याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला हे दोषार्पण बळी खाण्याचा अधिकार आहे; ते परमपवित्र आहे म्हणून ते पवित्र स्थानींच बसून खावे.
  • 7 दोषार्पण पापार्पणसारखेच आहे; त्या दोघांचे विधि एकच आहेत; जो याजक ह्या होमबलीच्याद्वारे प्रायश्चित करील त्याचा त्या अर्पणावर हक्क राहील.
  • 8 प्रायश्चित करणाऱ्या याजकाचा त्या बळीच्या कातड्यावरही अधिकार असेल.
  • 9 भटृत भाजलेले कढईत किंवा तव्यावर तळलेले सर्व अन्नार्पण, ते अर्पण करणाऱ्या याजकाचे होईल.
  • 10 प्रत्येक तेल मिश्रित किंवा कोरडे अन्नार्पण ते अर्पण करणाऱ्या याजकाचे-अहरोनाच्या मुलांचे आहे; त्या सर्वाचा त्यांच्यावर सारखाच अधिकार आहे.
  • 11 “परमेश्वरासाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधि असा:
  • 12 त्याला तो शांत्यर्पणाचा यज्ञ उपकारस्तुतीसाठी करावयाचा असेल तर त्याने तेलात मळलेल्या, बेखमीर पोळया तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या मैद्याच्या तळलेल्या पोळया शांत्यर्पणाच्या यज्ञासोबत अर्पाव्या.
  • 13 शांत्यर्पण हे देवाकरिता शांत्यर्पणाच्या यज्ञासारखेच आहे म्हणून त्यासोबत त्याने खमीर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या
  • 14 ह्या प्रत्येक अर्पणातून परमेश्वरासाठी एक एक पोळी अर्पावी; शांत्यर्पणाचे रक्त शिंपडणाऱ्या याजकाटचा त्या पोळीवर हक्क आहे.
  • 15 शांत्यर्पणासाठी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस त्याने अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; त्यातील काहीही सकाळपर्यत ठेवू नये.
  • 16 “यज्ञबलीचे अर्पण स्वखुशीचे किंवा नवसाचे असेल तर ज्या दिवशी तो ते अर्पील त्या दिवशी त्याने ते खावे आणि जर त्यातून काही उरले तर ते त्याने दुसऱ्या दिवशी खावे.
  • 17 परंतु त्या यज्ञबलीचे काही मांस तिसऱ्या दिवसापर्यत उरले तर ते अग्नीत जाळूत टाकावे.
  • 18 शांत्यर्पणाच्या यज्ञबलीच्या मांसातून तिसऱ्या दिवशी मांस जर तो खाईल तर परमेश्वराला ते आवडणार नाही, व तो ते अर्पण मान्य करणार नाही; ते अर्पण अमंगळ होईल; त्या पापाबद्दल भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेस तो स्वत: जबाबदार राहील.
  • 19 “त्याचप्रमाणे ज्या मांसाला कोणत्याही अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते कोणी खाऊ नये; ते अग्नीत जाळून टाकावे. शुद्ध असणाऱ्यानेच शांत्यर्पण खावे;
  • 20 परंतु जर कोणी अशुद्ध असून परमेश्वराला अर्पिलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस खाईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
  • 21 “एखादा माणूस जर एखाद्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करील मग ती अशुद्धता माणसाची, पशूची किंवा दुसऱ्या कोणत्या अमंगळ पदार्थाची असो, तर तो अशुद्ध होईल आणि परमेश्वराला अर्पण केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे जर तो मांस खाईल तर त्याला स्वजनातून बाहेर टाकावे.”
  • 22 परमेश्वर मोशेला म्हणाला,
  • 23 “इस्राएल लोकांना असे सांग: तुम्ही बैलाची मेंढराची किंवा बकऱ्याची चरबी खाऊ नये.
  • 24 मेलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी तुम्ही इतर कामासाठी वापरू शकता पण ती मुळीच खाऊ नये.
  • 25 परमेश्वरला अर्पिलेल्या पशूची चरबी जर कोणी खाईल तर त्याला स्वजनातून बाहेर टाकावे.
  • 26 “तुम्ही कोठेही राहात असला तरी आपल्या घरात पक्ष्याचे किंवा जनावराचे रक्त तुम्ही कधीही खाऊ नये.
  • 27 जर कोणी कोणतेहि रक्त खाईल तर त्याला स्वजनातून बाहेर टाकावे.”
  • 28 परमेश्वर मोशेला म्हणाला,
  • 29 “इस्राएल लोकांना असे सांग: जर कोणी परमेश्वरासमोर आपल्या शांत्यर्पणाचा यज्ञबली अर्पील तर त्याने त्या अर्पणातून काही भाग परमेश्वराकडे आणावा.
  • 30 त्याने आपल्या हाताने परमेश्वरासाठी अर्पणे आणावी; त्याने चरबी व ऊर याजकाकडे आणावा; ते ऊर परमेश्वरासमोर ओवाळले जाईल; हे ओवाळणीचे अर्पण होय.
  • 31 मग याजकाने त्या चरबीचा होम करावा परंतु ऊर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा होईल.
  • 32 तसेच तुम्ही आपल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीची उजवी मांडीही समर्पित केलेला अंश म्हणून याजकाला द्यावी.
  • 33 अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त व चरबी अर्पील त्याचा त्या मांडीवर हक्क असावा.
  • 34 मी परमेश्वर इस्राएल लोकांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी काढून घेऊन अहरोन याजक व त्याचे मुलगे ह्यांना दिली आहे; हा इस्राएल लोकांकडून त्यांना मिळणारा नेहमीचा हिस्सा आहे. इस्राएल लोकांनी हा निरंतरचा विधी म्हणून पिढ्यान्पिढ्या पाळावा.”
  • 35 परमेश्वरा करिता अर्पिलेल्या अर्पणातून हे भाग अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना देण्यात आलेले आहेत; जेव्हा जेव्हा ते याजक म्हणून परमेश्वराची सेवा करतात तेव्हा तेव्हा त्या समर्पणातून ते भाग त्यांना मिळावेत. देवाची सेवा करणारे याजक म्हणून ज्या दिवशी त्यांची नेमणूक करण्यात आली त्याच दिवसापासून असे ठरले आहे.
  • 36 परमेश्वराने ज्या दिवशी त्यांना अभिषेक केला त्या दिवशी त्याने इस्राएल लोकांकडून हा भाग त्यांना मिळावा अशी आज्ञा दिली म्हणून पिढ्यान्पिढ्या हा त्यांचा कायमचा हक्क ठरला आहे.
  • 37 होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकाच्या समर्पणाच्या वेळेच अर्पण आणि शांत्यर्पण ह्या विषयींचे विधि असे;
  • 38 इस्राएल लोकांनी परमेश्वराकरिता काय काय अर्पणे आणावीत ह्या विषयी त्याने त्यांना सीनाय रानात आज्ञा दिली त्यावेळी त्याने मोशेला ह्याप्रमाणे सीनाय पर्वतावर हे विधीनियम लावून दिले.