wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


लेवीय धडा 22
  • 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
  • 2 “अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की इस्राएल लोक ज्या वस्तू मला समर्पण करतात त्या पवित्र होतात; त्या माझ्या आहेत; म्हणून त्या याजकांनी घेऊ नयेत; त्या पवित्र वस्तू घेऊन जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही माझा मान न राखता-माझे भय न धरता-माझ्या नांवाला कलंक लावाल. मी परमेश्वर आहे!
  • 3 तुझ्या वंशजापैकी कोणी जर त्या पवित्र वस्तूना हात लावील, तर तो अपवित्र ठरेल; त्याला मजसमोरुन दूर करावे! इस्राएल लोकांनी त्या वस्तू मला अर्पण केल्या आहेत. मी परमेश्वर आहे.
  • 4 “अहरोनाच्या वंशापैकी कोणी महारोगी किंवा स्त्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत. हा नियम अशुद्ध झालेल्या प्रत्येक याजकाला लागू आहे. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपातामुळे अशुद्ध झालेला माणूस,
  • 5 किंवा जमिनीवर सरपटणाऱ्या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही इतर कारणामुळे अशुद्ध झालेल्या माणसास स्पर्श केल्यामुळे याजक अशुद्ध होईल.
  • 6 याजकाने अशा कोणालाही स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. त्याने पवित्र पदार्थ खाऊ नयेत; त्याने पाण्याने स्नान केले तरी पवित्र पदार्थ खाऊं नयेत.
  • 7 सूर्य मावळल्यावरच तो माणूस शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने पवित्र पदार्थ खावे; कारण ते त्याचे अन्न आहे.
  • 8 “आपोआप मेलेल्या किंवा जंगली जनावरांनी मारुन टाकलेल्या जनावराचे मांस याजकाने खाऊं नये, जर तो ते खाईल तर तो अशुद्ध होईल; मी परमेश्वर आहे!
  • 9 “त्यांनी माझी आज्ञा पाळावी व पवित्र पदार्थ अपवित्र होणार नाहीत याची काळजी घ्यावी; तो ते घेतील तर आज्ञाभंगाच्या पापामुळे ते मरणार नाहीत. मी परमेश्वराने त्यांना ह्या पवित्र कामासाठी वेगळे केले आहे.
  • 10 फकत याजकाच्या कुटुंबातील लोकांनी पवित्र अन्न खावे; त्याच्याकडील पाहुण्याने किंवा त्या याजकाने कामाला लावलेल्या मजुराने पवित्र अन्न खाऊ नये;
  • 11 परंतु याजकाने स्वत:चे पैसे देऊन एखादा गुलाम विकत घेतला असेल तर त्या गुलामाने व याजकाच्या घरात जन्मलेल्या त्याच्या मुलाबाळांनी त्या पवित्र अन्नातून खावे.
  • 12 याजकाच्या मुलीने याजक वंशाच्या बाहेरच्या माणसाबरोबर लग्न केले असेल तर तिने पवित्र पदार्थ खाऊ नयेत.
  • 13 याजकाची मुलगी विधवा झाली असेल किंवा तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले असेल, तिला एकही मूल झालेले नसेल व परत ती तरुणपणी होती तशीच आपल्या बापाच्या घरी राहात असेल तर मग आपल्या बापाच्या म्हणजे याजकाच्या घरातील पवित्र अन्नातून तिने खावे, परंतु याजकाच्या घरचे पवित्र अन्न फक्त त्याच्या कुटुंबातील लोकांनीच खावे.
  • 14 “एखाद्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या खाल्लेल्या पदार्थाइतकी व त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्श्याइतकी किंमत भरपाई म्हणून त्यात घालून याजकास द्यावी.
  • 15 “इस्राएल लोक परमेश्वराला अर्पणे देतात तेव्हा ती अर्पणे पवित्र होतात, म्हणून ती पवित्र अर्पणे याजकाने अपवित्र करु नयेत;
  • 16 जर याजकांनी त्यांना पवित्र अर्पणे खाण्याची परवानगी दिली तर ते स्वत:वर अपराध ओढवून घेतील. आणि त्या अपराधाबद्दल त्यांना पैसे भरावे लागतील. मी परमेश्वर त्यांना पवित्र करणारा आहे!”
  • 17 मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
  • 18 “अहरोन, त्याचे मुलगे व सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की तुम्हांइस्राएल लोकांपैकी किंवा तुम्हांमध्ये राहाणाऱ्या उपरी लोकांपैकी कोणाला आपल्या नवसाचा किंवा काही विशेष कारणासाठी स्वखुषीचा परमेश्वरासाठी यज्ञबली अर्पावयाचा असेल,
  • 19 व तो गुरे, मेंढरे किंवा बकरे ह्यापैकी असेल तर तो त्यांच्यातील नर असावा, व त्याच्यात काहीही दोष नसावा! परंतु दोष असलेली कोणतीही अर्पणे तू स्वीकारु नये; त्या अर्पणामुळे मला संतोष होणार नाही!
  • 20
  • 21 “एखाद्या माणसाला आपला नवस फेडण्यासाठी किंवा खुषीच्या अर्पणासाठी परमेश्वराला गुरांढोरातून किंवा शेरडांमेंढरातून शांत्यर्पण करावयाचे असेल तर ते दोषहीन असावे म्हणजे ते मान्य होईल.
  • 22 आंधळा, हाड मोडलेला, लुळा, वाहती जखम असलेला किंवा अंगवार मस, चाई, खरुज असा त्वचेचा रोग असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वराला अर्पू नये, किंवा परमेश्वराकरिता वेदीवर त्याचा अर्पण म्हणून होम करु नये.
  • 23 “गोऱ्हा किंवा मेंढा ह्याचा एखादा पाय आखुड-पूर्णपणे न वाढलेला किंवा प्रमाणाबाहेर लांब असेल तर तो खुषीच्या अर्पणाकरिता चालेल, पण नवस फेडण्याकरिता त्याचा स्वीकार होणार नाही.
  • 24 “ज्याचे अंड ठेचलेले, चिरडलेले किंवा फाटलेले असेल असा प्राणी परमेश्वराला अर्पण करु नये अशा गोष्टी तुम्ही तुमच्या देशात करु नयेत.
  • 25 “परमेश्वराला अर्पण करण्यासाठी म्हणून कोणतेही प्राणी तुम्ही विदेशी लोकांकडून घेऊ नये कारण त्या प्राण्यांना काही इजा झालेली असेल किंवा त्यांच्यात काही दोष असेल तर; ते प्राणी स्वीकारले जाणार नाहीत!”
  • 26 परमेश्वर मोशेला म्हणाला,
  • 27 “वासरु, कोकरु किंवा करडू जन्मल्यावर सात दिवस त्याच्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवशी व त्यानंतर ते परमेश्वराला अर्पण म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारावयास योग्य ठरेल.
  • 28 परंतु गाय व तिचे वासरु, मेंढी व तिचे कोकरु ह्या प्रमाणे एखादा प्राणी व त्याची आई ह्यांचा एकाच दिवशी वध करु नये.
  • 29 “परमेश्वराकरिता तुम्हाला उपकारस्तुतीचा यज्ञबली अर्पावयाचा असल्यास तो देवाला संतोष देईल अशाप्रकारे तुम्ही अर्पावा.
  • 30 अर्पण केलेल्या पशूचे मांस त्याच दिवशी तुम्ही खाऊन टाकावे; त्यातील काहीही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये. मी परमेश्वर आहे!
  • 31 “तुम्ही माझ्या आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्या; मी परमेश्वर आहे!
  • 32 माझ्या पवित्र नांवाचा मान राखावा-माझे भय धरावे! इस्राएल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल; मी तुम्हाला माझे पवित्र लोक केले आहे मी परमेश्वर आहे!
  • 33 मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले, आणि मी तुमचा देव झालो, मी परेशवर आहे!”