wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


स्तोत्रसंहिता धडा 107
  • 1 परमेश्वराला धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
  • 2 परमेश्वराने ज्याचा उध्दार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत. परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले.
  • 3 परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले. त्याने त्याना पूर्व - पश्चिम, उत्तर - दक्षिण या दिशांतून आणले.
  • 4 त्यांतले काही वाळवंटात फिरले. ते राहाण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही.
  • 5 ते खूप भुकेले आणि तान्हेले होते आणि अशक्त होत होते.
  • 6 नंतर त्यांनी परमेश्वराला मदती साठी हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले.
  • 7 देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला.
  • 8 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या.
  • 9 देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो. देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो.
  • 10 देवाची काही माणसे कैदी होती आणि काळ्याकुटृ तुंरुंगात गजांच्या आडबंद होती.
  • 11 का? कारण ते देवाने सांगितलेल्या गोष्टीं विरुध्द भांडले. त्यांनी परात्पर देवाचा उपदेश ऐकायला नकार दिला.
  • 12 त्या लोकांनी केलेल्या गोष्टींबद्दल देवाने त्यांचे आयुष्य कठीण केले. ते अडखळले आणि पडले. त्यांना मदत करायला तेथे कुणीही नव्हते.
  • 13 ते लोक संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटापासून वाचवले.
  • 14 देवाने त्यांना त्यांच्या अंधार कोठडीतूनबाहेर काढले, ज्या दोराने त्यांना बांधले होते तो दोर देवाने तोडला.
  • 15 त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी ज्याअद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या.
  • 16 देव आपल्याला आपल्या शत्रूंचा पराभव कायला मदत करतो. देव त्यांचे तांब्याचे दरवाजे मोडू शकतो. देव त्यांच्या दरवाज्यावरचे लोखंडीगज तोडू शकतो.
  • 17 पापयुक्त जीवन पध्दतीमुळे काही लोक मूर्ख बनतात आणि अपराधी भावनेमुळे त्यांना पीडा होते.
  • 18 त्या लोकांनी खायचे नाकारले आणि ते जवळ जवळ मेले.
  • 19 ते संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना संकटातून वाचवले.
  • 20 देवाने आज्ञा केली आणि त्यांना बरे केले, म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले.
  • 21 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल व तो लोकांसाठी करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या.
  • 22 परमेश्वराने जे काही केले त्याबद्दल त्याला धन्यवाद म्हणून बळी अर्पण करा. परमेश्वराने केलेल्या गोष्टी आनंदाने सांगा.
  • 23 काही लोक बोटीतून समुद्रापार जातात. त्यांचे व्यवसाय त्यांना महासागरापार घेऊन गेले.
  • 24 त्या लोकांनी परमेश्वर काय करु शकतो ते पाहिले. त्याने समुद्रावर ज्या अद्भुत गोष्टी केल्या त्या त्यांनी पाहिल्या.
  • 25 देवाने आज्ञा केली आणि जोराचा वारा वाहायला लागला, लाटा उंच उंच जायला लागल्या.
  • 26 लाटांनी त्यांना खूप उंच आकाशापर्यंत उंच नेले आणि खोल समुद्रात खाली टाकले. वादळ इतके भयंकर होते की लोकांचे धैर्य नाहीसे झाले.
  • 27 ते अडखळत होते आणि प्यायलेल्या माणसासारखे पडत होते. खलाशी म्हणून असलेले त्यांचे कसब निरुपयोगी होते.
  • 28 ते संकटात सापडले म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना संकटापासून वाचवले.
  • 29 देवाने वादळ थांबवले. त्याने लाटांना शांत केले.
  • 30 समुद्र शांत झाला म्हणून खलाशी आंनदित झाले. देवाने त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी आणून पोहोचवले.
  • 31 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या.
  • 32 देवाची मोठ्या सभेत स्तुती करा. वयोवृध्द प्रमुख एकत्र येतात तेव्हा त्याची स्तुती करा.
  • 33 देवाने नदीचे वाळवंटात रुपांतर केले. देवाने झऱ्यांचे वाहाणे बंद केले.
  • 34 देवाने सुपीक जमिनीचे क्षारयुक्त ओसाड जमिनीत रुपांतर केले. का? कारण त्या ठिकाणी वाईट लोक राहात होते.
  • 35 देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले. देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले.
  • 36 देवाने भुकेल्या लोकांना चांगल्या प्रदेशातून नेले आणि त्यांनी तिथे राहाण्यासाठी शहर वसवले.
  • 37 त्या लोकांनी त्यांच्या शेतात बी पेरले त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्षं पेरली आणि त्यांना चांगले उत्पन्न आले.
  • 38 देवाने त्या लोकांना आशीर्वाद दिला. त्यांचे कुटुंब वाढले. त्यांच्या जवळ खूप जनावरे होती.
  • 39 अरिष्टे आणि संकटे यांमुळे त्यांची कुटुंब लहान आणि अशक्त राहिली.
  • 40 देवाने त्यांच्या प्रमुखाला लज्जित केले आणि ओशाळवाणे वाटायला लावले आणि त्याला खाली पाहायला लावले. देवाने त्यांना रस्ते नसलेल्या वाळवंटातून हिंडायला लावले.
  • 41 पण नंतर देवाने त्या गरीब लोकांची संकटातून मुक्तता केली आणि आता त्यांची कुटुंब मेंढ्यांच्या कळपासारखी मोठी आहेत.
  • 42 चांगले लोक हे बघतात आणि आनंदी होतात. पण दुष्ट लोक ते बघतात आणि काय बोलावे ते त्यांना सुचत नाही.
  • 43 जर एखादा माणूस शहाणा असला तर त्याला या गोष्टी आठवतील नंतर त्याला देवाचे प्रेम म्हणजे खरोखर काय ते कळून येईल.