- 1 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा. त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.
- 2 इस्राएल, म्हण “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
- 3 याजकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
- 4 परमेश्वराची उपासना करणाऱ्या लोकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
- 5 मी संकटात होतो म्हणून परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
- 6 परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून मी घाबरणार नाही. लोक मला त्रास देण्यासाठी काहीही करु शकणार नाहीत.
- 7 परमेश्वर मला मदत करणारा आहे. माझ्या शत्रूंचा पराभव झालेला मी बघेन.
- 8 परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.
- 9 परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे तुमच्या नेत्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.
- 10 बऱ्याच शत्रूंनी मला घेरले होते. परंतु परमेश्वराच्या शक्तीमुळे मी माझ्या शत्रूंचा पराभव केला.
- 11 शत्रूंनी मला पुन्हा पुन्हा घेरले, मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.
- 12 शत्रूंनी मला मधमाशांच्या थव्याप्रमाणे घेरले होते. परंतु त्यांचा पटकन् जळून जाणाऱ्या झुडपाप्रमाणे लवकरच नाश झाला. मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.
- 13 माझ्या शत्रूने माझ्यावर हल्ला केला आणि माझा जवळ जवळ सर्वनाश केला परंतु परमेश्वराने मला मदत केली.
- 14 परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे. परमेश्वर मला वाचवतो.
- 15 चांगल्या लोकांच्या घरात चाललेला विजयोत्सव तुम्ही ऐकू शकता. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचे दर्शन घडवले.
- 16 परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.
- 17 मी जगेन आणि मरणार नाही आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन.
- 18 परमेश्वराने मला शिक्षा केली परंतु त्याने मला मरु दिले नाही.
- 19 चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा. मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.
- 20 ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.
- 21 परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो. तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
- 22 इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता तो कोनाशिला झाला.
- 23 हे परमेश्वराने घडवून आणले आहे आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते.
- 24 आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे. आपण आज मौज करु आणि सुखी होऊ.
- 25 लोक म्हणाले, “परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपला उध्दार केला.
- 26 परमेश्वराचे नाव घेऊन येणाऱ्या माणसाचे स्वागत करा. “याजकांनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या घरी आम्ही तुझे स्वागत करतो.”
- 27 परमेश्वर देव आहे आणि तो आपला स्वीकार करतो. बळी देण्यासाठी कोकराला बांधून ठेवा आणि त्याला वेदीच्या कोपऱ्यावर न्या.
- 28 परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो.
- 29 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव टिकणारे आहे.
Psalms 118
- Details
- Parent Category: Old Testament
- Category: Psalms
स्तोत्रसंहिता धडा 118